Thursday, April 19, 2012

बोलती माझ्यासवे

आज अंधारात दिसती आठवांची काजवे
जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे

पापण्यातिल बंद स्वप्ने का सुकावी ही अशी?
पालवी फुटण्यास त्यावर शिंपडावी आसवे

सोनियाच्या गणपतीला चोरले पण शांत तो
देवही हतबल जरासा जाहल्यागत जाणवे

लाचखोरीची बघावी चांगली बाजू कधी (?)
काम करती लगबगीने कर्मचारी कासवे

मी शतायुष्यी असावे शाप का देता मला
कोणता परलोक नेतो दाखवा तो हायवे

जाळल्या डिग्र्या निकामी शिक्षणाच्या काल मी
नोकर्‍या बढत्या मिळाया आड येते जानवे

राज्यकर्त्यांनी बदलली मुल्यनीती एवढी
झूठ सजले वस्त्र लेवुन सत्त्य झाले नागवे

सोड तू "निशिकांत" आता स्पष्टवक्तेपण जरा
स्वार्थ असता गुंतलेला गा तयांचे गोडवे

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३

रिमिक्सचीच गाणी


जगात शुध्द उरलय फक्त शहाळ्यातिल पाणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
अय्याश राजा नेहमीचाच नाच गाण्यात मग्न
विसर पडला कधी त्याचं झालं होतं लग्न
हताश होवुन गुलामाची वाट बघतेय राणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
खणा नारळानं अता कशी भरू ओटी?
अखूड टॉपची उंची झाली अजूनच छोटी
जुनी बाद चलनातून, नवीन तेया नाणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
विक्रीसाठी खूप खूप गजबजलेत बाजार
ईमान, शील,न्याय विकणे पसरलाय आजार
नफ्यासाठी सरसावलेत खरिददार वाणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
छाती पुढे केली होती झेलावया घाव
मागून वार केले ते माझेच होते, राव!
असा कसा देवा झाला मानव क्रूर प्राणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
अवतार घे देवा जगी खूप झालय पाप
श्रावण बाळ म्हणत नाही बापालाही बाप
ज्येष्ठांच्याच प्रक्तानी का उसास्यांच्या खाणी
वाजतायत जिकडे तिकडे रिमिक्सचीच गाणी
निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Saturday, April 14, 2012

पिरॅमीड

        

चढून गेले, त्यांचा गुदमर
दुरून मजला दिसतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

जरी तळागाळात राहतो
उंचच असते ध्येय आमुचे
ध्येय न मिळता दु:ख कशाला?
जीवन गाणे गेय आमुचे
चढून गेलो जरी पर्वती#
तोच हिमालय म्हणतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

परावलंबी नसून मी का
उगा कुणाला लगान द्यावा?
टरकावुन ती जन्म कुंडली
भाग्याचा मी लगाम घ्यावा
स्वप्न उद्याचे आज लोचनी
सळसळते मी बघतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडच्या थोडे वरती
मध्यमवर्गी वस्ती असते
गरिबीशी नाते तुटलेले
श्रीमंती आभासच असते
चक्रव्युहाच्या आत घेरला
जो तो का फरपटतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

शेळीच्या शेपटी प्रमाणे
मध्यमवर्गी जीवन असते
उडवाया माशांस निकामी
शेळीची ना लाज झाकते
मध्यमवर्गी वरी न खाली
अधांतरी तो लटकत आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडच्या टोकावरती
श्रीमंताची तुरळक वस्ती
ताठ मान अन् अबोल सारे
शिष्ट भेटती रस्तोरस्ती
एकलकोंडा समाज तेथे
आतुन जो तो कण्हतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पिरॅमीडासम समाज रचना
शाप म्हणू? वरदान म्हणू मी?
दु:ख सोबती शाश्वत असता
सुख नसता  का उगा कण्हू मी?
मृगजळ पुढती दूर सुखाचे
समाज मागे पळतो आहे
पिरॅमीडच्या पायथ्यास मी
मजेत जीवन जगतो आहे

पुण्यातील एक टेकाडी जिथे बरेच लोक सकाळी/सायंकळी फिरायला जातात.


निशिकांत देशपांडे   मो. क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--  nishides1944@yahoo.com


Monday, April 9, 2012

आरसा मी शोधला नव्हता

मलाही चेहरा माझा खरे तर भावला नव्हता
हवे ते दावणारा आरसा मी शोधला नव्हता
कहाणी काळजाची ऐकुनी त्या चारही भिंती
बिचार्‍या स्तब्ध झाल्या, तो कधी हेलावला नव्हता
गुन्हा माझा नसूनी झूठ केले पंचनामे का?
कुठेही न्याय करण्या रामशास्त्री गावला नव्हता
फुकाचे लाख सल्ले देवुनी गेले मला सारे
शोधला मीच रस्ता जो कुणीही दावला नव्हता
न मिळते मोल कष्टाचे, न विझते आग पोटाची
सुखी ते, थेंब घामाचा जयांनी गाळला नव्हता
कशासाठी हवी मैत्री जगाला, जाणती काटे
फुले नसता दिशेने या कुणी सरसावला नव्हता
अधी ठरले असावे द्रौपदीच्या वस्त्रहरणाचे
विजय देण्या जुगार्‍यांना हरी का धावला नव्हता?
कपाटे गच्च भरलेली किती मी सापळे मोजू?
अलीबाबा कधी मागे पुढारी जाहला नव्हता
तुला "निशिकांत" नव्हते का कुणी मन मोकळे करण्या?
उबेला आपुल्यांच्या जीव हा सोकावला नव्हता
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com