Monday, December 30, 2013

काळवंडली सकाळ आहे


तू गेल्याने क्षितिजावरती काळवंडली सकाळ आहे
आल्यावर तू अंधाराचा रंग भासतो दुधाळ आहे

कशास वाचू आत्मवृत्त जे एरंडाचे गुर्‍हाळ आहे?
चार सुखाचे क्षण टिपलेले पान नेमके गहाळ आहे

जरी शिवाशिव आणि सोवळे पाळत नाही कुणी तरी पण
इमानदारी अन् शुचितेचा कैक जणांना विटाळ आहे

परंपरेच्या पिंजर्‍यातली कैद शेवटी रुळून जाते
काय फायदा? ठाउक नसुनी आर्घ्य वाहतो त्रिकाळ आहे

पाय घसरता कधी मुलीचा ठार मारती पालक तिजला
हेच मुलाने करता त्यांचे धोरण दिसते मवाळ आहे

"जगा यंत्रवत पैशांसाठी" शाप लाभला नव्या पिढीला
गायन, वाचन, छंद हरवले, जीवन झाले रटाळ आहे

माय न देते वेळ मुलाला, तिचे करीअर प्रश्न केवढा?
दाया अन् पाळणाघरांचा गल्लोगल्ली सुकाळ आहे

कुठे हरवले बेसन लाडू, शंकरपाळी आणि करंज्या?
"कुछ मीठा हो कॅडबरी का" तयार आता फराळ आहे

"निशिकांता"ला देव कृपेचा प्रसाद मिळता किमया झाली
माध्यान्हीच्या उन्हात त्याच्या वाटेवरती शिराळ(*) आहे


(*) कडक उन्हात चालताना आपणास बर्‍य्यच वेळेस दिसते की कांही भागात ऊन्हात सावलीची छटा मिसळून फिके ऊन असते तर अगदी थोड्या अंतरावर कडक ऊन पण दिसते. सावलीची छटा असलेले ऊन पडण्याच्या  प्रकाराला मराठवाड्यात शिराळ पडले असे म्हणतात.


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Saturday, December 28, 2013

एकांतवास आहे


गर्दीत माणसांच्या एकांतवास आहे
परके सभोवताली, इतकाच त्रास आहे

निर्माल्य फेकलेले रमतेय भूतकाळी
इतिहास एवढासा! जेथे सुवास आहे

औलाद आज म्हणते "ते पाळतात आम्हा"
तारुण्य बादशाही वृध्दत्व दास आहे

येता घरी कवडसा, कसला प्रकाश उत्सव?
अंधार भेडसावी जो आसपास आहे

देवास शोधण्याला फिरलो, न भेटला तो
बघता मनात, कळले माझ्यात वास आहे

आयुष्य मखमलीचे जगण्यात मौज कसली?
काट्यात नांदण्याचे कौशल्य खास आहे

चर्चा सुरू नव्याने गरिबार्थ योजनांच्या
आल्या निवडणुका हा माझा कयास आहे

लाखो लवाद बसले सत्त्यास शोधण्याला
हा वेळ काढण्याचा खासा प्रयास आहे

अपुले उडून गेले "निशिकांत" का झुरावे?
शाश्वत तुझा तरी का? तू सांग श्वास आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Saturday, December 21, 2013

खंत सरली


पायरी चढलो जशी वृध्दाश्रमाची
खंत सरली आपुले घर सोडल्याची

वाटला दरवळ जगाला शक्य तेंव्हा
का व्यथा निर्मल्य आता जाहल्याची

जाहलो इतका नकोसा, त्या मुलांना
बातमी देवू नका मी वारल्याची

"ठेविले जैसे अनंते" तत्व ज्यांचे
वेदना छळते न बाजी हारल्याची

सूर्य नाही झेलला ज्याने कधीही
का अपेक्षा बाळगावी सावल्यांची?

ओठ शिवल्याने कधी का दु:ख लपते?
चेहर्‍यावर मांदियाळी भावनांची

भेद सुखदु:खात करणे टाळण्याने
वेदनाही मेजवानी या जिवाची

सुरकुत्यांचे राज्य आले पण तरीही
शायरी झरते मनातुन श्रावणाची

धबधबा "निशिकांत" होउन घे उडी तू
अल्पसंतुष्टी नको डबक्यातल्याची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishhides1944@yahoo.com

Saturday, December 14, 2013

शल्य रुतले शेवटी



सर्व गेले, वंचनांचे झुंड उरले शेवटी
मृगजळावर भाळल्याचे शल्य रुतले शेवटी

आठवांची आठवणही सोडुनी गेली मला
एकटेपण जीवनाचे सूत्र झाले शेवटी

माय का आव्हेरलेली आठवे अंतःक्षणी?
जन्म पुढचा तीच देइल, सत्त्य पटले शेवटी

कावळ्याने पिंड शिवलेला जरी असला तरी
घुटमळे आत्मा मुलातच, पाश कसले शेवटी

जज असो न्यायालयीचा, फाटका बाबा असो
स्त्रीत मादीचे, नरांना चित्र दिसले शेवटी

भाव आकाशास भिडले हे खरे असले तरी
मुल्य घटले माणसांचे हेच कळले शेवटी

तोंडओळखही नसावी नीतिमत्तेची असे
गुंड का सिंहासनावर मस्त बसले शेवटी?

चांदण्यातिल शिल्प ज्यांनी बांधले यमुनातिरी
त्या कलाकारांस शिक्षा, हात तुटले शेवटी

बेरक्या "निशिकांत"चे का नेत्र झरले शेवटी?
पाहता साक्षात मृत्त्यू, हास्य विरले शेवटी

कागदावर काय लिहिले, फाडले "निशिकांत"ने?
"शेवटी" हा शब्द योजुन शेर सुचले शेवटी

आवांतरः---
"हास्य उरले शेवटी" हा शेर हुस्ने मतला (मतल्याच्या तोंडवळ्याचा) आहे. असा शेर मतल्याच्या खाली लिहावा असा संकेत आहे. पण या शेरात शायराचे नाव आल्यामुळे हा मक्ता पण आहे. मग हा शेर नक्की कुठे लिहावा? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.


निशिकात देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 3, 2013

स्तोम इतके नाटकाचे


वावडे का या जगाला वास्तवाचे?
माजले का स्तोम इतके नाटकाचे?

घ्यावया शहरातले चौरसफुटाचे,
फुंकले खेड्यातले घर अंगणाचे

आव जो तो आणतो चांगुलपणाचा
मुल्य आकाशास भिडले मुखवट्यांचे

मातला अंधार इतका भोवताली
तेज थोडे म्लान झाले भास्कराचे

बालपण चिमटीतुनी निसटून जाता
वेदनामय पर्व आले आठवांचे

वादळे झेलीत जगल्याने कदाचित्
भय अताशा राहिले ना काहुराचे

हास्य उत्सव साजरा करण्यास मिटले,
जीवना! संदर्भ सारे वेदनांचे

चेहरा डागाळला अपुलाच असता
का उगा तुकडे करावे आरशाचे?

वाटले "निशिकांत" जे अपुले तुला ते
सज्ज झाले वार करण्या खंजिराचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, November 23, 2013

गझल तरीही जमली नाही



मोजत मात्रा वृत्त पाळले, गझल तरीही जमली नाही
वाचकांस ती आवडली पण विद्वानांना रुचली नाही

जरी कराग्रे वसे लक्ष्मी, खिशात केंव्हा दिसली नाही
तिचा राबता महालात ती झोपडीत वावरली नाही

तू दिल्यास त्या भळभळणार्‍या जखमांचीही तर्‍हा निराळी
काळाच्या मलमाने त्यांवर कधीच बसली खपली नाही

बेगम झाली जरी कुणाची, बेग़म(*)  होणे अवघड आहे
जनानखाना विश्व तिचे पण कधी कशी गुदमरली नाही?

मूठ झाकली तोवर होते मुल्य जरी सव्वालाखाचे
उघडे पडले पितळ ज्या क्षणी, बजारी पत उरली नाही

किती निर्भया आल्या गेल्या, क्षणेक आक्रोशाच्या लाटा
जरी कायदे झाले, त्यांची फरपट कांही सरली नाही

मैत्री होता फेसबुकवरी, रोमँटिक गप्पाही झाल्या
ती होती ती; का तो होता? बाब एवढी कळली नाही

बेमानीला राजप्रतिष्ठा, अस्त पावली इमानदारी
लाकुडतोड्या ! तुझी कहाणी मुलांस मी सांगितली नाही

पिऊन मृगजळ घसा जरासा ओला केला "निशिकांता"ने
आभासी या ओलाव्याची साथ कधीही सुटली नाही


(*) बेग़म= दु:खविरहीत, आनंदी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Wednesday, November 13, 2013

मृगजळ जरा प्यायलो


उगाच मृगजळ जरा प्यायलो
भास, कुणाला तरी भावलो

एक कटाक्षाने ओझरत्या
स्वप्नांच्या दुनियेत हरवलो

संस्कारांचे टाळत ओझे
हवे नेमके तसाच घडलो

पाप धुवाया नकोच गंगा
पश्चातापे दग्ध जाहलो

झोतामध्ये कधीच नव्हतो
आड स्वतःच्या स्वतःच दडलो

काळाच्या ओघात पोहणे
जमले नही, मागे पडलो

नाराजी का कोणावरती?
पडलो, उठलो अन् सावरलो

सुरकुतलेल्या सायंकाळी
आठवणींनी गुलमोहरलो

"निशिकांता"च्या आत्मचरित्री
एकच मिसरा "सुखात जगलो"


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, November 9, 2013

आता सुरू नव्याने ( तरही )


ध्येयास गाठल्याचा नुसताच भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

खेडे नकोनकोसे, शहरी विकास झाला
अन् पार मारुतीचा आता भकास झाला

नेता गुन्हा करोनी मोकाट मस्त फिरतो
फर्जीच पंचनामा, जुजबी तपास झाला

गरिबार्थ योजनांना, खाती किती गिधाडे !
अन् आम आदमीला, निर्जळ उपास झाला

शब्दात मांडण्याला आहे असे कितीसे?
लिहिण्या कथा, पुरेसा अर्धा समास झाला

आजी घरात नाही, बाळास पाळणाघेर
एकत्र नांदण्याचा केंव्हाच र्‍हास झाला

फुटली जशी गुन्ह्याला वाचा, तिच्या शिलाला
डागाळण्या किती तो ओंगळ प्रयास झाला !

भांडून दूर झाले पत्नी, पती परंतू
त्यांचा गुन्हा नसोनी गुदमर मुलांस झाला

घरचे नकोच जेवण, बर्गर, पिझा हवासा
पाश्चात्त्य संस्कृतीचा वावर झकास झाला

"निशिकांत" पाडसांना लावू नकोस माया
उडता पिले मलाही भरपूर त्रास झाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com







Sunday, November 3, 2013

उपकार केले


सोबती राहून ना व्यवहार केले
वेदनांनी केवढे उपकार केले

नभसख्याची लागता चाहुल, धरेने
केवढे रोमांचुनी श्रंगार केले !

पातिव्रत्त्याला जिथे पावित्र्य होते
लग्न ना करता सुरू संसार केले

बाटली घटना किती आंबेडकरजी !
लोकशाहीशी कुणी व्यभिचार केले?

राज्य, नेत्यांनॉ! दिले ज्यांनी कराया
त्याच जनतेला तुम्ही लाचार केले

वाचले पण पाहिले नाहीच देवा
दानवांचे तू कधी संहार केले

द्यावया प्रतिमेस देवांच्या झळाळी
निर्मुनी खलनायकावर वार केले

भीक का देता उगा आरक्षणाची?
वाट खडतर, चालणे स्वीकार केले

भ्रष्ट का "निशिकांत" तू झालास इतका?
पालकांनी हेच का संस्कार केले?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

बहरायला सुरवात केली ( तरही )


दरवळाने मुग्धतेवर मात केली
तू कधी बहरायला सुरवात केली?

मी तुला माझी खुशी निर्यात केली
वेदना तू धाडल्या, आयात केली

लावली कुलुपे घराला, आत मी पण
तू मनाची लूट हातोहात केली

जाणले श्वसात तुजविन अर्थ नाही
जीवनाची सांगता प्याल्यात केली

"आम जनतेचे भले"  हा देत नारा
राज्यकर्त्यांनीच वाताहात केली

स्थान इतिहासात नाही मज म्हणोनी
नोंद नावाची गझल मक्त्यात केली

थुंकलो तोंडावरी प्रस्थापितांच्या
बंडखोरीची जरा रुजुवात केली

जो बळी तो कान पळतो सत्त्य हे पण
व्यर्थ मी तक्रार दरबारात केली

शांतता "निशिकांत"ला कोठे मिळेना
सोय त्याची शेवटी थडग्यात केली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Monday, October 28, 2013

आयुष्याला दळतो आहे ( तरही )


दु:ख लपवुनी खोल अंतरी हसतो आहे
अजून माझ्या आयुष्याला दळतो आहे

समर्पणाने देव पावतो असे ऐकले
निसंग होवुन विठ्ठलास आळवतो आहे

दुर्दम्याची आस मनाला अशी लगली !
मृगजळ पुढती मागे मागे पळतो आहे

शास्त्र, पुराणे, वेद कोळुनी प्याल्यावरती
अता कुठे मी मला जरासा कळतो आहे

आव आणला काळिज आहे निगरगट्ट पण
निरोप घेउन जाता, मागे वळतो आहे

दु:ख विसरण्या, जरी वसवले नवीन घरटे
आठवणींनी घाव जुना भळभळतो आहे

नकोय मुक्ती, पुनर्जन्म दे हीच विनंती
पुन्हा मिळावे मातृप्रेम, कळवळतो आहे

फुले कागदी, सुगंध नकली तरी कसा हा
भ्रमिष्ट होवुन भ्रमर भोवती फिरतो आहे?

"निशिकांता"ला नका दाखवू भय मृत्त्यूचे
जगता जगता चितेविना मी जळतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, October 24, 2013

सदैव दरवळ


तुझ्या भोवती सदैव दरवळ
भ्रमराला का म्हणशी "जा पळ !"

तुझ्या चाहुलीनेही कातळ
रोमांचित, पांघरतो हिरवळ

राम असा का? उठले वादळ
आश्रमातली सरली वर्दळ

नेत्यांनी मांडलाय गोंधळ
अंबे अमुच्या हाती संबळ

सोफ्यावरती बसून चर्चा
केल्याने का होते चळवळ ?

नवीन बाराखडी शीक तू
वाचाया नेत्रीचे ओघळ

खाकीशी दोस्ती गुंडांची
सभ्य कापती भिऊन चळचळ

वठून जाता कुठे हरवली?
वृक्षाच्या पानांची सळसळ

गंगा म्हणते कुठून आणू ?
पाप धुवाया पाणी निर्मळ

एल्गाराची करा तयारी
वांझोट्या गप्पा का निष्फळ ?

"निशिकांता"ची टिचभर खळगी
भरताना उडते तारांबळ


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, October 19, 2013

ओरडावे लागते (तरही )


शस्त्रसंधी जर हवी तर युध्द व्हावे लागते
"शांतता पाळा" असे का ओरडावे लागते?

दानपेटीतून ईश्वर राव लोका पावतो
आम जनतेलाच खडतर तप करावे लागते

सूर दोघांचा न जमता नांदले एकत्र का?
संस्कृती आहे अशी की गुदमरावे लागते

संपला वनवास जेंव्हा, राम करतो राज्य अन्
जानकीला अग्निदिव्यातून जावे लागते

हे धनाढ्यांनो ! सुखाची जाणण्या किंमत खरी
वेदना अन् आसवांना अनुभवावे लागते

कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता उंची जरा
टेकडीला त्या हिमालय नाव द्यावे लागते

भंग करण्या तप ऋषीचे मेनकेला धाडले
आज विश्वामित्र कसले ! स्त्रीस भ्यावे लागते

का टिका प्रस्थापितांनो बोचरी करता अशी?
शायराला नवशिक्या समजून घ्यावे लागते

का अशा "निशिकांत" ताना आर्त शेवटच्या क्षणी?
देव पावो वा न पावो आळवावे लागते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides144@yahoo.com



Tuesday, October 8, 2013

आठवणींशी खेळत असतो


का स्वप्नांची तुझ्याच पाने चाळत असतो?
झोप मोडता आठवणींशी खेळत असतो

तुझ्या घराच्या सभोवती रेंगाळत असतो
सैरभैर नजरेने तुज धुंडाळत असतो

प्राक्तनात जे आहे ते कुरवाळत असतो
दु:खाच्याही बिछायतीवर लोळत असतो

दु:ख दडवतो, नकोस समजू सुकल्या जखमा
शांत वरूनी अंतरात रक्ताळत असतो

शहारणे, भिजंणे, मोहरणे मला न ठावे
तू नसताना ओला श्रावण पोळत असतो

मनी रितेपण, रिताच प्याला हाती उरतो
भान हरवुनी लडखडतो, ठेचाळत असतो

जरी बेगडी, हास्य फुलोरा फुलवायाचा.
आव आणतो, खोल मनी भेगाळत असतो

एकच उरतो ऋतू शेवटी वार्धक्याचा
वसंतातही कणाकणाने वाळत असतो

"निशिकांता"ला व्यसन एवढे दु:खाचे की,
मीठ आपुल्या जखमांवर तो चोळत असतो


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com








Friday, October 4, 2013

येथे सुवास आहे


नाहीस तू, तुझा पण येथे सुवास आहे
माझे म्हणून जगणे देवा झकास आहे

पंढरपुरी विठूचा म्हणतात वास आहे
दिंडीत भास होतो तो आसपास आहे

पोटास जाळण्याची चिंता पुरून उरते
म्हणतात देश अपुला करतो विकास आहे

आहे भणंग इतका मागे पुढे न कोणी
माझीच सावली पण अंधूक भास आहे

एकास गाठल्यावर नवखेच ध्येय दिसते
तृप्तीविनाच माझा चालू प्रवास आहे

भोगेन दु:ख माझे धावा नकोच देवा
मृत्त्यू करेल सुटका माझा कयास आहे

तू सत्त्य तेच सखये लिहिलेस आत्मवृत्ती
माझी तयात जागा कोरा समास आहे

ओढाळ या मनाचे कोडे, असून राजा
पण का गुलाम इतका राणीस खास आहे

"निशिकांत" सोड आशा फसव्या फिक्या सुखांची
राज्यात वेदनांच्या अपुली मिजास आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, October 2, 2013

लागले उमजावयाल (मतला बंद गझल)


ओठ शिवले, नेत्र आता लागले बोलावयाला
अंतरीचे गूढ सारे लागले उमजावयाला

का अशी धजलीस तारा आपुल्या तोडावयाला?
नाटकी ढंगात का सरसावशी जोडावयाला?

रोज का कबरीवरी येशी दिवा लावावयाला?
वेळ गेली, प्रेम का येतेस  तू दावावयाला?

कौरवांना आजच्या का सांगता बदलावयाला?
चांगलेपण फासती ते चेहरा लिंपावयाला

शक्य नसुनी हस्तरेषा कष्टलो बदलावयाला
प्राक्तनी जे तेच पात्री, बैसलो जेवावयाला

बाटले घर, ज्या क्षणी आली सुखे नांदावयाला
वेदना गंगाजळासम, घेतल्या शिंपावयाला

चेहर्‍यावर डाग इतके, ना जमे झाकावयाला
चीड येउन लागले ते आरसे फोडावयाला

तृप्तता इतकी! न उरले मागणे मागावयाला
विठ्ठला आलोय चरणी शीष मी टेकावयाला

घट्ट होती वीण पण का लागली उसवावयाला?
बेगडी "निशिकांत नाती, शीक तू विसरावयाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, September 15, 2013

कुठला प्रकार आहे?



नगदीत "ना" तुझी अन् "हो" का उधार आहे?
हा प्रेम दावण्याचा कुठला प्रकार आहे?

तू नेहमी शिकारी अन् मी शिकार आहे
घायाळ होत जगणे जडला विकार आहे

बाहूत एवढा मी असतोय धुंद तुझिया
मृत्त्यू खुणावतो पण देतो नकार आहे

रागावणे, अबोला मी झेलतो खुशीने
नक्की तुझ्या मनीही ओली कपार आहे

चुचकारले सुखाला वश ते कधी न झाले
दु:खास हासण्याची विणतो किनार आहे

का कर्मकांड करुनी फाल प्राप्त होत असते?
सूर्यास अर्घ्य पण मी देतो त्रिवार आहे

बुजवावयास भेगा, कसला करू गिलावा?
दोघात फार मोठी पडली दरार आहे

कळपात श्वापदांच्या जगलो निवांत होतो
शेजार माणसांचा मोठा जुगार आहे

भक्तास शोधताना याचक विठूस दिसले
स्वार्थात अंध जो तो जगतो भिकार आहे

"निशिकांत" ओळखावे पंखातल्या बळाला
भाग्यावरी तुझी का इतकी मदार आहे?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, September 14, 2013

पुन्हा एकदा जगावयाचे



पहाट झाली पर्व संपले अंधाराचे

ऋतू बहरले पुन्हा एकदा जगावयाचे

बारा महिने तुझ्या भोवती वसंत असतो
आठवणींना तुझ्या लाभले गंध फुलांचे

तुझी लागता चाहुल फुलतो मनी फुलोरा
भेटीपेक्षा स्वप्न आवडे अभासाचे

नैराश्याचे मळभ दाटले, पण तू येता
पुन्हा लागलो स्वप्न रंगवू संसाराचे

रंग गुलाबी जिकडे तिकडे दिसू लागले
वेड नव्याने मला गुलाबी सहवासाचे

तुझ्या सोबती बघेन आता स्वप्न मखमली
पुरे जाहले जीवन जगणे निवडुंगाचे

ओठी आता हास्य फुलू दे नको शुष्कता
थंड दवांनी आयुष्य सारे भिजवायाचे

होकारने तुझ्या, अडचणी सरून गेल्या
दोघे लिलया पेलू ओझे आकाशाचे

"निशिकांता"च्या गजलातुन ती मुक्त वावरे
व्यसन लागले शब्दांनाही सौंदर्याचे.


निशिकांत देशपांडे. मो क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Monday, September 9, 2013

श्वास मोकळा


श्वास मोकळा तुझ्यासवे मी उडता उडता
आयुष्याची मरगळ जाते बघता बघता

तू असताना बारा महिने श्रावण रिमझिम
मोहरते मी मनी उमलते भिजता भिजता

तू येण्याची चाहुल येता, सुस्त दिवसही
पटकन सरतो दर्पणापुढे सजता सजता

मनात माझ्या तूच नांदसी, तू नसताना
अंतरात मी म्हणून बघते उठता बसता

आनंदाचा डोह जाहले जीवन माझे
गुदमर नाही मस्त वाटते बुडता बुडता

हट्ट कशाला जन्मकुंडल्या जुळवायाचा?
जुळून गेले नाते अपुले जुळता जुळता

चकोरास हा प्रश्न छळे, का कधी न त्याची
वाट पहावी चंद्रानेही ढळता ढळता?

शाश्वत असते दु:ख जीवनी प्रत्येकाच्या
नको भांडवल उगाच त्याचे जगता जगता

"निशिकांता" चल ध्येय एवढे ऊंच आहे की
हात असूदे हाती माझ्या चढता चढता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com








Sunday, September 8, 2013

मनात हलके झंकारावे


सप्तसुरांचे सुरेल गाणे मनात हलके झंकारावे
मैफिल माझी, तुला तरीही नजरकडांनी धुंडाळावे

तुझ्यासवे का वाटे ओल्या मातीलाही गंधाळावे?
नमी असोनी, काळजात का तू नसताना भेगाळावे?

पुरे जाहले थेर गुरूंचे आश्रम सारे गुंडाळावे
ज्ञान सांगती, स्त्रीस पाहता, आस जागते कवटाळावे

नका विचारू या वयातही असा कशाने पाय घसरला
झुळझुळ वाहे प्रेम तुझे पण पात्राने का शेवाळावे?

तुझ्या सोबती सुवर्णक्षण हे जगता झालो धुंद एवढा!
जरा थबकुनी काळानेही या वळणावर रेंगाळावे

आयुष्याचे वस्त्र शोभते सुखदु:खाची किनार असता
आनंदाला मिठीत घ्यावे, वेदनेसही कुरवाळावे

मार्ग काढण्या संकटातुनी ज्याचा त्यानी यत्न करावा
संध्यापात्री पाणी घेउन व्यर्थ देव का खंगाळावे?

सीमोलंघन कुठी राहिले? विजय कोणता मिळवत असतो?
दसर्‍यादिवशी परंपरेने तरी पतीला ओवाळावे

लेखाजोखा आयुष्याचा सर्वज्ञानी विठूस ठावे
"निशिकांता" का माथा टेकुन दु:ख एवढे पाल्हाळावे?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, September 3, 2013

वापराया लागलो


शब्द विद्रोही अताशा वापराया लागलो
वादळाचे गीत ओठी गुणगुणाया लागलो

मूठ माझी बंद होती लाखमोलाची तरी
चावडीवर लक्तरांना वाळवाया लागलो

आव असतो ध्येय मोठे गाठण्याचा नेहमी
शोधण्या उंदीर डोंगर पोखराया लागलो

रोजच्या त्या मेजवान्या, पंचतारांकित सजा
मौज झुणका भाकरीची अनुभवाया लागलो

शक्य नसते पण तरीही वास्तवाला झाकतो
क्रीम लावत सुरकुत्यातुन मुक्त व्हाया लागलो

माळ कवड्यांची गळा अन् ढोंग अंबेचा उदो
जोगव्याने भूक माझी भागवाया लागलो

अंधश्रध्दा, पिंपळावर भूत असते अंगणी
जाग येता रामरक्षा पुटपुटाया लागलो

ठेपला येऊन मृत्त्यू पण सुटेना मोह का?
जे न येते साथ तेही आवराया लागलो

अंत का "निशिकांत" व्हावा जीवनाचा हा असा?
राहिल्या इच्छा अधूर्‍या घुटमळाया लागलो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Sunday, September 1, 2013

दडवली वादळवारे


कैक उसासे मनी कोंडले ओघळणारे
शांत चेहर्‍याआड दडवली वादळवारे

बेफिकिरीने हत्ती चाले चाल आपुली
जीव तोडुनी विरोधात का देता नारे?

इंद्रपुरीच्या चौकाचौकामधे भेटले
राजघराण्याचेच नगारे वाजवणारे

आश्रमातही सखा राहिला राम न आता
स्त्रियांभोवती गिधाड असते भिरभिरणारे

दरबाराला नवरत्नांचा रुतबा होता
अता राहिले लबाड मंत्री बडबडणारे

कवचकुंडले स्त्रीस लाभता वार्धक्याची
नराधमांचे भय ना उरते थरथरणारे

जीवन आहे जुगार मोठा, अंतक्षणाला
असेल कोणी का गंगाजल पाजवणारे?

शब्द वेचुनी भावपूर्ण लिहिल्या गझलांना
हवे आपुले चाल लावुनी गुणगुणणारे

"निशिकांता"ला सख्या विठ्ठलाच्या चरणावर
शीष ठेवता अनुभव आले सुखावणारे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, August 24, 2013

जीवन जगलो

जीवन जगलो
जगता शिकलो

अपुले दिसता
गाली हसलो

खाचा खळगे
तुडवित फिरलो

अश्रू संगे
मी ओघळलो

शुन्याहुनही
छोटा उरलो

गझलांचा मी
वेडा बनलो

जगणे होता
मी मावळ्लो

ललना मृगजळ
पुरता फसलो

चंचल नेत्री
अडकुन बसलो

येते म्हणता
मी मोहरलो

माझ्यापासुन
मीच हरवलो

मोहर गळता
मी गहिवरलो

"निशिकांता" चल
खूप बहकलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Wednesday, August 21, 2013

आठवणींची किनार आहे


सुवर्णयुग जे निघून गेले परतणार का दुबार आहे?
बरे जाहले आयुष्याला आठवणींची किनार आहे

बघता बघता चढाव सरला पुढे जीवनी उतार आहे
वार्धक्याला नकारणे हा जुना मानवी विकार आहे

होकाराची जिथे अपेक्षा तिथेच मिळतो नकार आहे
सांग जीवना कसे जगावे? विचित्र सारा प्रकार आहे

वसूल करता नगदीमध्ये मते जनांची सतांधानो !
आश्वासनपूर्तीचे खाते अजून का मग उधार आहे?

खुनी चोरटे संसदेत का? न्यायपालिका विचारते पण,
"भुंकाभुंकी जरा करू या" विपक्षासवे करार आहे

उमेदवारी मुलांस अपुल्या राजकारणी देउन म्हणती
नवरक्ताला वाव द्यायचा रुजू लागला विचार आहे

कुठे लपावे आमजनांनी? जिवंत असता चोंच मारुनी
मास खावया वखवखलेले गिधाड करते शिकार आहे

दहशतवादी म्हणे जिहादी ! कान फुंकले शेजार्‍याने
स्वदेश वाटे नर्क तयांना, स्वर्ग दुबाई कतार आहे

आम आदमी तयार देवा ! लिलावात विकण्यास स्वतःला
पोट भराया दोन भाकरी, किती मागणी सुमार आहे

नकोस तू "निशिकांत" रंगवू स्वप्न गुलाबी भविष्यातले
मध्यमवर्गी जन्मलास तू, जगावयाचे टुकार आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Saturday, August 10, 2013

खंत नाही


जीवघेण्या वेदनांचा अंत नाही
आपुल्यांनाही जराशी खंत नाही

रामही वैतागला असता जगी या
कैक रावण भोवती, हनुमंत नाही

शोधली वंदन कराया माणसे पण
व्यर्थ! दिसला एक प्रतिभावंत नाही

सहप्रवासी स्पर्श करता तिज कळाले
बैसला भगव्यात तोही संत नाही

गंध, रूपाचे फुलाच्या काय सांगू?
काल ताजे आज शोभीवंत नाही

जे करावे ते भरावे न्याय इथला
माफ करणारा जगी भगवंत नाही

घाम गाळुन भाकरी अन् शांत निद्रा
कोण म्हणतो? हा खरा श्रीमंत नाही

आरसाही का असा पदभ्रष्ट झाला
दावले प्रतिबिंब तंतोतंत नाही

होरपळ "निशिकांत" आहे खूप बाकी
भोगले जे दु:ख ते अत्त्यंत नाही


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Thursday, August 8, 2013

तक्रार कशाला?


काट्यांशी जर असेल मैत्री रुतण्याची तक्रार कशाला?
जीवन खडतर तरी गुलाबी स्वप्नांशी व्यवहार कशाला?

अंथरुणाचे माप घेउनी पसरायाला पाय शिकावे
पगार आहे कमी म्हणोनी पैशांचा अपहार कशाला?

नाते गायत्री मंत्राशी तुटले, संध्या ठाउक नाही
व्यर्थ जानवे घालुन करता मौंजीचे संस्कार कशाला?

जिवंत असता किंमत नव्हती, मृतात्म्यास आश्चर्य वाटते
तसवीरीला हार घालुनी होतो हा सत्कार कशाला?

जनतेला का षंढ समजता? ताळ्यावर या सत्तांधांनो
रान पेटता नका विचारू "पुकारला एल्गार कशाला?"

ऐषारामी जीवन जगलो सुखे भोगली, अता विसरलो
जवाएवढे दु:ख भेटता जीवनभर चित्कार कशाला?

कुणी निघाले पुण्य कमवण्या, कुणी निघाले पाप जाळण्या
सत्कर्माने इष्ट साधते देवाचा आधार कशाला?

हात जयांचे बरबटलेले, तेच कायदे तयार करती
आम आदमी टाहो फोडी "दिल्लीचा दरबार कशाला?"

"निशिकांता"ची प्रिया लाजरी व्यक्त जाहली नजरेमधुनी
जरी अबोली, तुला पाहिजे शब्दांतुन होकार कशाला?


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Tuesday, August 6, 2013

पुन्हा बहरली


इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकली
जुनी आपुली प्रीत अंतरी पुन्हा बहरली

आठवणींचा एक कवडसा मनात येता
भळभळणारी जुनी वेदना हळूच हसली

ज्यांच्यांसाठी उरात होती कपार ओली
त्या आपुल्यांची मना वाळवी सदैव डसली

स्पष्ट बोलण्या, तोंडपुजेपण झुगारल्याने
आयुष्याची घडी एवढी का विसकटली?

गावाकडची वाट जरी काटेरी आहे
तुडवुन जाता कळतिल तिथले भाव मखमली

गंगेकाठी पाप कधी का धुतले जाते?
मनी नांदतो भ्रम मोक्षाची वाट गवसली

गैर वाटते? शिवू नका ना, मर्जी तुमची
टिका कशाला, मदिरा कोणी किती रिचवली?

दिवसाकाठी रोज लढाई जगण्यासाठी
ऐपत नसुनी स्वप्नांसोबत रात्र सजवली

जगास नाही, विठूस दिसता भाव मनीचा
"निशिकांता"वर ईशकृपेची धार बरसली


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Monday, July 29, 2013

लुप्त का मांगल्य झाले?


पुस्तकातिल माणसांचे लुप्त का मांगल्य झाले
अन् लुटेरे, देशबुडवे का असे बहुमुल्य झाले?

गाव होता हा तसाही भ्याड सत्कर्मी सशांचा
चार कोल्हे दहशतीने राहिले, ऋषितुल्य झाले

धर्म बुडतो रोज येथे, ना कुणी अवतार घेई
तेहतिस कोटींतले का मंद ते जाज्वल्य झाले?

हस्तक्षेपांनीच खाकी यंत्रणा दुर्बल बनवली
प्रश्न पडतो, चोरट्यांना प्राप्त का प्राबल्य झाले?

स्वर्थ बघुनी राजकारण, अर्थकारण खेळल्याने
काल जे साफल्य होते, आज ते वैफल्य झाले

 मी चरावे, तू चरावे रीत आपण पाळली पण
चार वेडे सत्यवादी तेच मोठे शल्य झाले

माय मेली त्या क्षणाला पोरका झालो मला मी
हरवले, नाही मिळाले, शोधुनी वात्सल्य झाले

लावला जगण्यास मी जो अर्थ होता, व्यर्थ होता
जन्मण्याचे फक्त मरणाने खरे साफल्य झाले

छंद का "निशिकांत" नाही कोणता जोपासला तू?
फक्त शिकणे पोट भरण्याचे, कला कौशल्य झाले


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Monday, July 22, 2013

प्रीत जपावी


नजर कधी नजरेस भिडावी
डोळ्यांमधली प्रीत जपावी

पुरे जाहले स्वप्न पाहणे
आता थोडी झोप उडावी

चिंब व्हावया मन आसुसले
मनभावन बरसात पडावी

अशीच केंव्हा तरी कुठे का?
भेट आपुली रोज घडावी

उष्ण श्वास अन् रोमांचांनी
रात्र आपुली धुंद सजावी

तुझी सुरावट, माझ्या कविता
मैफिल रंगतदार बनावी

जरी वेगळे, दोघांच्याही
स्वप्ने नयनी एक असावी

शिकार झालो तुझी, वाटते
पुन्हा एकदा शिकार व्हावी

आठवणींचा नकोच गुंता
विसरायाची रीत नसावी

आयुष्याच्या सायंकाळी
हीच टवटवी मनी टिकावी

"निशिकांता"ला तुला बघोनी
कधी रुबाई, गझल सुचावी


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, July 21, 2013

पुन्हा पुन्हा हे सांगत आहे



लेखाजोखा आयुष्याचा पुन्हा पुन्हा हे सांगत आहे
नको उदासी, वेदनेतही छटा सुखाची नांदत आहे

नका विचारू धवल यशाची शिखरे का मी चढू न शकलो
पोट जाळण्या लढता लढता जगणेही पण कसरत आहे

गप्प गप्प का देव अताशा मंदिरातला? कयास माझा
संस्थानाच्या विश्वस्तांची देवावरती दहशत आहे

वळचणीत का शुचित्व पडले? चंगळवादी जगी कळेना
पाप दौडते, पांगुळ्गाडा पुण्य घेउनी चालत आहे

वटपूजेची, सावित्रीची टवाळखोरी फॅशन झाली
बिनलग्नाचा प्रपंच करणे नव्या पिढीला संमत आहे

पाच पांडवांनो सांगा ना ! वंश बुडाला का हो तुमचा?
धृतराष्ट्राची आज पिलावळ धांगडधिंगा घालत आहे

पालनकर्ते, रक्षणकर्ते कायद्यांस का असे तोडती?
बलात्कारली कुणी निर्भया, कुणी मारली इशरत आहे

ज्ञान, यज्ञ अन् योग, प्रवचने साधकांस का कधी लाभली?
संपदेस योगी बाबांच्या खूप अताशा बरकत आहे

"निशिकांता" चल क्षितिजावरती  विश्व नवे शोधू या जेथे
नवीन गिल्ली दांडू, नवखा डाव खेळण्या फुरसत आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, July 18, 2013

खेळ पैशाचेच सारे


खेळ पैशाचेच सारे
बंद कंगालांस दारे

पाप वाजवते नगारे
पुण्य लपवाया भुयारे

लाचखोरांच्या पुढे का
कायदे झाले बिचारे?

पांडवांची हार झाली
कौरवांचे चंद्र तारे

भाववाढीच्या झळांनी
पेटले पोटी निखारे

शुय हाती, शेत नुसते
सात बाराचे उतारे

बावरी मुग्धा उबगली
वृध्दही करती इशारे

एक बस "हम दो"स आता
जास्त झाले "दो हमारे"**

माफ कर म्हणता अहंला
का तुझ्या फुटले धुमारे?

रंगलो भवसागरी पण
मागते मन का किनारे?

ओढतो "निशिकांत" ईश्वर
संपदा नाना प्रकारे


** हा शेर "हम दो हमारे दो" या जुन्या घोष वाक्याच्या संदर्भात वाचावा.


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com











Tuesday, July 16, 2013

विकलो होतो


उपकाराच्या ओझ्याखाली दबलो होतो
कर्ज फेडण्या बाजरी मी विकलो होतो

लिलाव होणे आयुष्याचा टळू न शकले
लिहून खाते नादारीचे थकलो होतो

मृगजळ पुढती पाठलाग मी करता करता
शुन्यासंगे दोस्ती करण्या शिकलो होतो

कधीच नव्हती हाव मनाला सन्मानाची
परिस्थितीच्या रेट्यापुढती झुकलो होतो

आनंदाचे स्वप्नही कधी पडले नाही
तरी कधी मी माझ्यावरती हसलो होतो

मैत्री माझी वेदनांसवे घट्ट एवढी!
काट्यांवरती शांत शांतसा निजलो होतो

सूर्य मला का म्हणता? मी तर लपून जगलो
उगवायाच्या अधीच मी मावळलो होतो

नोंद न झाली जगात माझी, जणू काय मी
अनंतात मरण्याचाआधी विरलो होतो

दैव मागणे "निशिकांता"ला जमले नाही
प्राक्तनात जे मुकाट देवा जगलो होतो


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, July 12, 2013

हिरवा हिरवा ओला श्रावण


ग्रिष्म वावरे घरात माझ्या ऊन अंगणी असते रणरण
तुझ्या भोवती सखे नांदतो हिरवा हिरवा ओला श्रावण

समोर मी पण तुझा चेहरा कसे दावते विचित्र दर्पण?
सये एकटा धुंद मी, तुझ्या आठवणींची नसते चणचण

तुळसीपत्रे लाख ठेवली हलवायांच्या घरावरी पण
देव विचारी "पुण्य कमवण्या तुझे काय तू केले अर्पण?

शासनकर्ते जसे लागले लुटावयाला देश आपुला
दाद मागण्या कोठे जावे? शेत खाउनी बसले कुंपण

जिवंत असता पुसले नाही माय बिचारी मेल्यावरती
बनून श्रावण बाळ, उरकले क्रियाकर्म अन् क्षेत्री तर्पण

नका विचारू पुण्य कमवुनी किती बांधले कनवटीस म्या
चोविस घंटे पोट भराया राबराबतो जळतो कणकण

पुरे जाहले कौतुक आता रामाचे अन् वनवासाचे
माझे जीवनही वनवासी सभोवताली लाखो रावण

देवा भूवर धाडुन गंगा सोय पाहिली पाप्यांची तू
डुबकी घेता पाप धुवोनी गंगा त्यांचे करते रक्षण

ऐकुन प्रवचन नकोस लेखू कमी स्वतःला तू "निशिकांता"!
सांगतात जे तयास जमले कधीच नाही तसे आचरण


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Tuesday, July 9, 2013

भाव नाही


शोषितांच्या आसवांना भाव नाही
भूक पोटी नांदते पण हाव नाही

झोपड्या गिळूनी उभ्या श्रीमंत वस्त्या
मूळचा तो आठवातिल गाव नाही

मी जसा आहे तसा लोकांस दिसतो
आणला मोठेपणाचा आव नाही

संसदेच्या परतलो दारातुनी मी
सज्जनांना, ऐकले, शिरकाव नाही

घर जळाले कालच्या दंग्यात माझे
जाळणार्‍यांना सजेचे नाव नाही

पूर सालाबाद येतो, तोंड देण्या
दूरगामी ठोस का प्रस्ताव नाही?

राज्यकर्त्यांची मला कळते न खेळी
खेळलेला मी कधी तो डाव नाही

कायद्यांच्या पुस्तकातुन चूक शिकलो
"न्याय दरबारी कुणीही राव नाही

गाव माझे ओस पडले पण तरीही
घेतली शहराकडे मी धाव नाही

हो कलंदर आज तू "निशिकांत" थोडा
सभ्यतेला आज कोठे वाव नाही


निशिकां देशपांडे. मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com


Monday, July 8, 2013

थकलो आता. ( जुल्काफिया गजल )


आयुष्याचे खेळ खेळुनी थकलो आता
तुझा जीवना भार वाहुनी पिचलो आता

यत्न करोनी ध्येय असे का मृगजळ ठरले?
अपूर्ण स्वप्ने उरी घेउनी निजलो आता

श्रावणधारा कुठे बरसती? मला न ठावे
वांझोटे नभ, आस लाउनी वठलो आता

खयाल ताजे, मनात उर्मी गजल लिहावी
शब्द नेमके शोधधोधुनी शिणलो आता

ज्यांचा कोणी जगात नसतो तूच तयांचा
तुझी ईश्वरा वाट पहुनी विटलो आता

सदैव वर्दळ आठवणींची सखे एवढी!
दार मनाचे घट्ट लाउनी बसलो आता

नकोनकोसा कोपर्‍यासही अता घराच्या
उपेक्षिताचे भोग भोगुनी खचलो आता

इतिहासाने नोंद कशाला घ्यावी माझी?
मक्त्यामध्ये नाव घालुनी उरलो आता

"निशिकांता"ला अता कशाला औषध गोळ्या?
जगावयाचा नाद सोडुनी सरलो आता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, July 4, 2013

शोधून आलो


मंदिरे मी पालथी घालून आलो
व्यर्थ देवाला तिथे शोधून आलो

लावला शेंदूर दगडाला जरासा
एक नवखा देव मी निर्मून आलो

पाहुनी वर्चस्व बडव्यांचे तिथे, मी
मंदिराच्या पायर्‍या उतरून आलो

संकटांना तोंड देण्या मार्ग सोपा
देव मी पाण्यामधे बुडवून आलो

मंदिराची कोनशीला बसवणार्‍या
नीच नेत्याला शिव्या देवून आलो

वृक्षतोडीने जरी दुष्काळ पडला
"ईश्वरी हा कोप" समजाउन आलो

मानतो देवास मी, पण यत्न करुनी
कर्मकांडाला जरा गाडून आलो

मी खडा घासातला प्रस्थापितांच्या
अंधश्रध्देला तडे पाडून आलो

सोडली अर्ध्यात का "निशिकांत" वारी
भाविकामध्ये विठू पाहून आलो


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, June 22, 2013

यत्न करतो आजही


मी तुला विसरावयाचा यत्न करतो आजही
शक्य नाही ते कराया युध्द लढतो आजही

तू जशी गेलीस सखये, ग्रिष्म आहे सोबती
मी ऋतू गंधाळण्याची वाट बघतो आजही

सागराला का असावी ओढ चंद्राची अशी?
पौर्णिमेला भेट घडणे योग नसतो आजही

दार केले बंद माझ्या मी मनाचे पण तरी
आठवांचा झोत तुझिया आत घुसतो आजही

कृष्ण नाही, फक्त दिसतो कौरवांचा राबता
काय व्हावे द्रौपदींचे? प्रश्न उरतो आजही

अंधश्रध्दा एवढी की संकटे येता क्षणी
सामना करतो न आम्ही, देव पुजतो आजही

कलियुगातिल मयसभेची आखणी केली कुणी?
दुष्ट हसतो, सत्त्यवादी आत पडतो आजही

का दिल्या गरिबांस फसव्या योजना, अश्वासने ?
मोकळ्या पोटी भुकेचा डोंब जळतो आजही

सोसल्या "निशिकांत" का तू भाववाढीच्या झळा?
भाव नसतो माणसाला, स्वस्त विकतो आजही


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Thursday, June 20, 2013

लागल्यागत वाटते



भूक नवख्या चेहर्‍याची लागल्यागत वाटते
वास्तवाचे शल्य आता टोचल्यागत वाटते

रंगरंगोटी करोनी आज सजलो मी असा !
आरशातिल चेहर्‍याला जाणल्यागत वाटते

कागदांच्या मी फुलांचा ताटवा केला उभा
धूर्त भ्रमरांना इथे पण कोंडल्यागत वाटते

मी रवंथाची कला शिकलो हुबेहुब एवढी
भूक माझी पेटलेली भागल्यागत वाटते

ताट देवाच्या पुढे जे, घेउनी मी जेवतो
पण तरी नैवेद्य देवा पावल्यागत वाटते

का उगा वारीत जावे, काय त्या पंढरपुरी?
भक्त दिसता विठ्ठलाला भेटल्यागत वाटते

राज्यकर्त्याची कधी जर सावली पडली तरी
शोधतो गंगा, मनाला बाटल्यागत वाटते

ठेवले तिरडीवरी ते प्रेत का हसते असे ?
त्यास जगण्याची लढाई संपल्यागत वाटते

का तुझ्या "निशिकांत" हाती कुंचला अंतःक्षणी
जीवनाचे रंग विटके जाहल्यागत वाटते


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Friday, June 14, 2013

आभास आहे


चांदणे आभास आहे
हाच माझा त्रास आहे

स्वप्न पडते जे पहाटे
सत्त्य कसले? भास आहे

दूध का प्यावे? जरी तो
वासरांचा घास आहे

वेदनांच्या मी ऋतूला
मानतो मधूमास आहे

कायद्यांना तोडणारा
उच्चभ्रू हमखास आहे

लाचखोरी धर्म झाला
सत्त्य का बकवास आहे?

वाळल्या झाडास आता
भोगणे वनवास आहे

सत्त्यवादी का बिचारा
भोगतो उपहास आहे?

लागल्यावर ठेच धरली
विठ्ठलाची कास आहे

वाहिली देवा फुले पण
ओंजळीला वास आहे

भक्तिचा "निशिकांत" तुझिया
लेखणीला ध्यास आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, June 10, 2013

मनोमनी सावरलो होतो


स्वप्न पाहता विरहाचे मी आत जरा घुसमटलो होतो
जाग येउनी स्वप्न भंगता मनोमनी सावरलो होतो

सुटकेचा नि:श्वास टाकला शत्रूंनीही मी मेल्यावर
दुष्ट तयांचे डाव उधळण्या पुरून त्यांना उरलो होतो

पैलू नाही कधी पाडले यत्न करोनी आयुष्याला
चाकोरी अन् परंपरांच्या प्रभावात मी घडलो होतो

मोठा भाऊ कडेवरी अन् बहीण ओझे घेउन चाले
तिच्या जिवाला खंत न त्याची बघून मी गहिवरलो होतो

खिशात माझ्या दमडी नव्हती तरी इरादे बुलंद माझे
पाय न टिकले धरणीवरती, आकाशी वावरलो होतो

विद्रोहाची हिंमत नव्हती प्रवाहपतितासमान जगलो
सुखात होतो, पण मी माझ्या नजरेमधुनी पडलो होतो

काय अपेक्षा मनी धरावी? न्यायदेवते गांधारी तू !
कोण पारडे कसे झुकवितो, बघून मी भेदरलो होतो

आसपासच्या घराघरातुन धूर पाहिला मी सोन्याचा
संपत्तीचा वास तिथे पण असाच मी धुरकटलो होतो

हात सखीने दिला, काढण्या चिखलामधुनी "निशिकांता"ला
लगावली, मात्रा, यमकांच्या दलदलीत मी फसलो होतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Saturday, June 8, 2013

स्वप्नांशी मी खेळत होतो


मृगजळ सारे जाणत होतो
स्वप्नांशी मी खेळत होतो

फुले उमलती क्षणात सुकती
निवडुंगांच्या सोबत होतो

संवादाची किती वानवा !
माझ्याशी मी बोलत होतो

दगाबाज अपुल्यातच असतो
म्हणून पाळत ठेवत होतो

व्यवहाराच्या कसोटीत मी
वजावटींना झेलत होतो

माझा होता दोष तरी पण
भाग्याला मी कोसत होतो

गुन्हे कराया हिंमत नव्हती
कायद्यास मी पाळत होतो

उडिदाच्या काळ्यातच गोर्‍या
नेत्यांना मी शोधत होतो

राजकारणी बाप नसोनी
उमेदवारी मागत होतो

"निशिकांता" मी बहिर्‍यांनाही
कसे जगावे सांगत होतो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, June 7, 2013

माग मी काढीत गेलो


आठवांचा माग मी काढीत गेलो
आसवांचे मी सडे टाकीत गेलो

कालच्या तंद्रीत आहे आज माझा
वर्तमानाला सदा हिणवीत गेलो

फाटक्या पदरी सखीच्या काय टाकू?
वंचनांची भीक मी वाढीत गेलो

ही मुकी श्रीमंत वस्ती सोडुनी मी
चार गप्पा मारण्या चाळीत गेलो

मी तुकोबाच्या कधी ज्ञानेश्वराच्या
पालखीसंगे सुखे वारीत गेलो

जीवनाचा चेहरा भेसूर इतका !
आरशाला नेहमी टाळीत गेलो

जे मिळाले, जीवनाचा साज होता
वेदना भाळावरी मढवीत गेलो

मित्र होते सर्व पण मज हे कळेना
मी कुणाच्या मारलो यारीत गेलो

प्राप्त "निशिकांता"स झाला अर्थ थोडा
जीवनाशी पैज मी लावीत गेलो


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishidesa944@yahoo.com

Wednesday, June 5, 2013

मी खुशाल आहे


नकोस माझी करू काळजी जिथे जसा मी खुशाल आहे
तुझ्याविनाही जिवंत कैसा? मलाच माझा सवाल आहे

जाता जाता भेट दिली का भळभळणार्‍या जखमांची तू
रोज सोसतो तिव्र वेदना, उपाय त्याहुन जहाल आहे

वाट दाखऊ कशी कुणाला? मीच असा हा भरकटलेला
काय फायदा? हाती माझ्या अंधाराची मशाल आहे

पिऊन प्याल्यावरती प्याले रात्र रात्र मी जागत असतो
दिवाळखोरी घरात आली, अमीर झाला कलाल आहे

पैसे देउन तुझी ईश्वरा यथासांग मी पुजा बांधली
भटजीचे वागणे असे की जणू तझा तो दलाल आहे

जरी एकटा भणंग आहे, करू नको काळजी जराही
आई! तुझिया आठवणींची पांघरली मी दुशाल आहे

आज इथे तर तिथे उद्याला, स्थैर्य काय ते मला न ठावे
सैलानी मी मस्त कलंदर विश्व केवढे विशाल आहे !

योग्य वाटले तसेच जगलो, पाप पुण्य हा विचार नव्हता
स्वर्ग मिळो की नर्क शेवटी कुणी पाहिला निकाल आहे

बा "निशिकांता"  खूप अपेक्षा प्रेमामध्ये कधी नसाव्या
 तिच्या सोबती झोपडीतही अनुभवला मी महाल आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahpp.com



माझी ग़ज़ल


जीवनाच्या आर्ततेला शोभली माझी ग़ज़ल
वेदनांच्या सप्तरंगी रंगली माझी ग़ज़ल

सारुनी पडदा धुक्याचा शोधली माझी ग़ज़ल
चोरली होती जिने ती जाहली माझी ग़ज़ल

फाटका संसार माझा मी असा नि:संग पण
शांत माझ्या सोबतीने नांदली माझी ग़ज़ल

मी कधी बोलू न शकलो, गप्प तूही लाजरी
भाव माझे व्यक्त करण्या बोलली माझी ग़ज़ल

वाचते ग़ज़ला कुणी का पुस्तकातिल सांग ना !
गाइली तू त्या क्षणाला गाजली माझी ग़ज़ल

टांगता मी कैक लफडी.चावडीवर गावच्या
राज्यकर्त्यांच्या मनाला झोंबली माझी ग़ज़ल

पाहता वृध्दाश्रमी मातापित्यांना पोरके
ओघळाया लागली आक्रंदली माझी ग़ज़ल

ना कधी टाळ्या मिळाल्या, ना कधी "क्या बात है"
पण तरी परिघात अपुल्या वागली माझी ग़ज़ल

सांगता मी चार गोष्टी चांगल्या ग़ज़लेतुनी
थिल्लारांना का हज़ल ही वाटली माझी ग़ज़ल

श्वास शेवटच्या क्षणी ज्या घेतला "निशिकांत"ने
त्या क्षणाला मूक झाली संपली माझी ग़ज़ल


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, June 4, 2013

रंग लागले उडावयाला


तरुणाईचे रंग लागले उडावयाला
आयुष्याचे वस्त्र लागले विरावयाला

बाजी आहे मीच जिंकली भ्रमात, देवा
ठेच लागता चरणी आलो भजावयाला

अनाथ दुबळ्यांच्या पाठीशी देव म्हणोनी
अतूर झालो अनाथ होउन जगावयाला

तुला वगळुनी आयुष्याचा हिशोब करता
देवा ! बाकी शुन्य लागले उरावयाला

जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी वास तुझा पण
विठू तुझ्या मी क्षेत्री आलो पुजावयाला

चादर मळकी आयुष्याची, ईश कृपेने
मुक्तीचे मज रंग मिळाले भरावयाला

श्रध्देने मी दीप लावला गर्भगृही अन्
उजेड आला मनात माझ्या रहावयाला

जीवन गेले लक्तरात पण तुझ्या कृपेने
मेल्यावरती प्रेत लागले सजावयाला

"निशिकांता"च्या मनात तृप्ती देव दयेने
पैलतिराची आस लगली रुजावयाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





नोंद नाही ठेवली



तू किती जखमा दिल्या, मी नोंद नाही ठेवली
कोरले ह्रदयावरी जे क्षण दिले तू मखमली

का वियोगाचे कुणाला दु:ख व्हावे एवढे?
तृप्त मी मिळताच तुझिया आठवांची सावली

आस आहे एक माझी, स्वप्न मी व्हावे तुझे
खाक झालेल्या मनी का पाकळी गंधाळली?

आठवातिल माय माझी, फाटक्या लुगड्यातली
पण तिने आभाळमाया काय असते दावली

वानवा दिसली सुखाची उच्चभ्रू वस्तीत अन्
मी कलंदर एवढा की वेदना कुरवाळली

काल स्त्री आरक्षणाची घोषणा केली तरी
काय झाले देव जाणे प्रक्रिया थंडावली

पुस्तके होती नवी पण त्यातल्या विभुती जुन्या
नोंद घेण्या योग्य नवखी माणसे ना गावली

धीट झालेली भुतावळ जात नाही, मी जरी
जानव्याची गाठ माझ्या जीव तोडुन दाबली

दु:ख का "निशिकांत"झाले शब्द सुचणे थांबता ?
श्वास घेण्याची गतीही वाटते मंदावली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Tuesday, May 28, 2013

काचतात का?


पाश जुनेरे काचतात का?
अश्रू नयनी दाटतात का?

व्यक्त व्हावया शब्द सुचेना
मनी भावना साचतात का?

व्यासपिठावर सिंहगर्जना
प्रसंग येता शांत शांत का?

कर्मयोग निष्काम असावा
लोक यशाला मोजतात का?

देव ठेवतो तसे रहावे
तरी उद्याची मनी भ्रांत का?

पाय वाकडा पडेल धास्ती
रस्त्यावर ते चालतात का?

जरी झटकली, आठवणींची
पुन्हा जळमटे लोंबतात का?

देव कृपेने इष्ट जाहले
बळी पशूंचा चढवतात का?

तेजोमय सत्कार्य परंतू
लोक तुतारी फुंकतात का?

"निशिकांता" तू पूस स्वतःला
गजला कोणी वाचतात का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, May 24, 2013

चालला आहे कशाचा खल अता? ( तरही )



संशयाची वाढली दलदल अता
चालला आहे कशाचा खल अता?

नांदतो निश्चिंत मी परक्यांसवे
आपुल्यांचा काळजाला सल अता

दल बदलणे राज्यकर्त्यांची खुबी
कोणत्या बाजूस त्यांचा कल अता?

भूत काळाला पुरोनी टाकले
आठवांचे कोरडे बादल अता

पाहिले पाषाणह्रदयी एवढे!
कोण आहे या जगी कोमल अता?

बावरी राधा कुठे ना भेटते
शामही ना राहिला शामल अता

राजधानी तीच, दरबारातुनी
लोपले नवरत्न अन् बिरबल अता

शासना टिमकी नको तू वाजवू
वंचनांचा ऐक कोलाहल अता

लेखणी "निशिकांत" झाली शांत का?
चित्तवृत्ती जाहली चंचल अता


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, May 23, 2013

उलगडाया लागलो


घेत कानोसा मला मी चाचपाया लागलो
मी मला आता जरासा उलगडाया लागलो

एक सुटता प्रश्न दुसरा, जीवनाची ही तर्‍हा
संकटांच्या सोबतीने मी रमाया लागलो

ना भविष्याची हमी ते भूतकाळी रंगती
कालच्या मी वैभवाला आठवाया लागलो

मी स्तुतीविन पावणारा देव नाही पाहिला
भाट झालो ईश्वराचा स्तोत्र गाया लागलो

झाकुनी दु:खे खुशीचा मुखवटा घेता क्षणी
आरशालाही सुखात्मा मी दिसाया लागलो

चैत्रवणवा पेटलेला जीवनी आहे तरी
आठवांच्या पाकळ्यांनी दरवळाया लागलो

गुंतलो इतका प्रपंची शक्य ना मुक्ती तरी
कावळ्याला पिंड शिवण्या बोलवाया लागतो

भोगताना वेदनांशी जाहली मैत्री अशी !
दु:खही आता खुशीने गुणगुणाया लागलो

दु:ख का "निशिकांत" झरते शायरीमधुनी असे?
वाचता गजला तुझ्या मी ओघळाया लागलो


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Friday, May 17, 2013

वेल सुकल्या सारखी


तू अशी दिसतेस का अपुल्यात नसल्या सारखी?
काय सलते अंतरी, तू वेल सुकल्या सारखी

भो॑वती तुझियाच मैफिल रंगते मी जाणतो
तेवणारी तू शमा का आज विरल्या सारखी?

का उगा जोहार करसी मारला जाता पती?
तू लढावे कडकडावे वीज असल्या सारखी

सोसणे अन्याय आहे ही जुनी ओळख तुझी
आज तुझिया आतली का नार हरल्या सारखी?

तूच चंडी, तूच झाशी चाँदबीबी तू तरी
वागसी का सांग वेडे धीर खचल्या सारखी?

आज गर्भाशय स्त्रियांचे का रणांगण जाहले?
माय वागे स्त्री-भ्रुणाशी वैर धरल्या सारखी

"मातृदेवोभव" बनवला सोनियाचा पिंजरा
सोड तू अन् घे भरारी श्वास भरल्या सारखी

का तुझा उध्दार करण्या राम लागे सांग ना !
आखलेल्या वर्तुळी जगतेस फसल्या सारखी

अंध धृतराष्ट्रास देण्या साथ गांधारी उगा
पत्करावी जिंदगी का नेत्र नसल्या सारखी?

का पिसे "निशिकांत" आहे लागले वेड्या तिचे?
भासते नसली तरी ती साथ असल्या सारखी


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, May 14, 2013

चांदणे गेले कुठे?


प्रेम सरले, भाव ह्रदयी दाटणे गेले कुठे?
शिंपिले जे जीवनी तू चांदणे गेले कुठे?

रोमरोमातून फुलतो लागता चाहुल तुझी
जीवघेणे पैंजणांचे वाजणे गेले कुठे?

भेटता तू खास कांही हरवल्यागत वाटते
वाट बघण्याच्या सुखाचे नांदणे गेले कुठे?

बाग का ओसाड झाली? ना कळ्या ना पाकळ्या
गंधवेडे शोधती गंधाळणे गेले कुठे?

बंधने लाखो मुलींवर शोडषी ओलांडता
कालचे निष्पाप हसणे, खेळणे गेले कुठे?

लोप झाला संस्कृतीचा आवडे का पश्चिमा ?
गोड अंगाई जुनी अन् पाळणे गेले कुठए ?

जाहिराती आणि जिंगल्स पाठ पोरांना किती !
श्लोक गीतेचे अताशा घोकणे गेले कुठे ?

व्यर्थ का "निशिकांत" लिहिशी पोटतिडकीने असा?
आवडे लोकास टीव्ही वाचणे गेले कुठे ?

दु:ख का "निशिकांत" इतके भळभळाया लागले?
संयमी काव्यात आता रंगणे गेले कुठे ?


निशिकाट देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, May 8, 2013

मला भावला रस्ता

मला भावला रस्ता

काटेरी पण तुझ्या घराचा मला भावला रस्ता
युगेयुगे मी चालत आहे पुरून उरला रस्ता

दर्शन घ्याया प्रभो निघालो, अर्ध्यातच मी थकलो
श्वास मला दे पार कराया उरला सुरला रस्ता

भरकटलेले जीवन माझे पत्ता कुठला सांगू?
एकलव्य मी मला न कळला कुठून चुकला रस्ता

अभिमन्यूची जिद्द अंतरी, चक्र्व्यूह भेदावे
प्रवेशलो पण परतायाचा कुठे न दिसला रस्ता

अन्नधान्य देशास पुरविती घाम गाळुनी अपुला
शेतकर्‍यांना फास घ्यायचा कुणी दावला रस्ता?

अजब जाहले ! राजकारणी जेथे जेथे गेला
संग होउनी असंगासवे काळवंडला रस्ता

गांधी पुतळे चौकामधले प्रश्न स्वतःला करती
"दाखवला जो मी शुचितेचा कुठे हरवला रस्ता"?

सारे माझे मी सार्‍यांचा दहा दिशाही माझ्या
कशास चिंता उगा करावी कुठे चालला रस्ता

ध्येय गाठता यक्षप्रश्न हा काय करावे पुढती?
"निशिकांता" हे बरे जाहले नाही सरला रस्ता


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com



Friday, April 5, 2013

तिचा चेहरा


प्रभात किरणे पांघरणारा तिचा चेहरा
दवबिंदुंनी ओघळणारा तिचा चेहरा

सौंदर्याचा शोध संपतो तिला पाहता
दिलदारांना सुखावणारा तिचा चेहरा

वेळ जाहली तरी सख्याची चाहुल नाही
दहा दिशांना भिरभिरणारा तिचा चेहरा

तिला बघावे विसरुन जावे असे न घडते
अंतःकरणी घुटमळणारा तिचा चेहरा

नेत्र बोलके तिचे एवढे, शब्द कशाला?
मीत मनीचे गुणगुणणारा तिचा चेहरा

हसताना ती, टपटप गळती असंख्य मोती
मोत्यांनाही लाजवणारा तिचा चेहरा

शुक्रतारका नभांगणीची मी न पहिली
मला आवडे लखलखणारा तिचा चेहरा

विश्वामित्रा नकोस वेड्या बसू तपाला
धोका आहे वावरणारा तिचा चेहरा

देता गजरा "निशिकांता"ने मोहरली ती
निशिगंधाने दरवळणारा तिचा चेहरा

"निशिकांता" तिज व्यक्त व्हावया शब्द फुटेना
ओंजळीत घे थरथरणारा तिचा चेहरा


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Monday, March 25, 2013

जीवन उगाच वाया

(अनौरस, अनाथ बाळाचा आक्रोश)

सांगा जगी कुठे हो मजला मिळेल माया ?
शोधात काळ गेला जीवन उगाच वाया

काटेकुटे तुडवले जंगल समीप केले
पतझड उजाड सारे नव्हती कुठेच छाया

जन्मास हाय आलो आई मला असावी
पैदा अनाथ झालो बापाविना जगाया

डोळे हळू उघडले मातेस पाहण्याला
अंधार आत आला बाहूत बाळ घ्याया

मजला कळून आले आईस दोष कैसा?
मजबूर ती असावी गमवून प्रीय राया

सटवाईलाच आहे माझा सवाल साधा
तलवार घेतली का भाग्यास तू लिहाया ?

माझ्याच असवांनी न्हाऊन मी निघालो
पाणी हवे कशाला? प्रेतास स्नान द्याया

का व्यर्थ भांडता हो कोणी कफन शिवावे?
दगडी जगास सांगा श्वानास प्रेत  द्याया

"निशिकांत" पीक आले जगती जनावरांचे
एकास गोद घे तू डोळे हळू पुसाया

निशिकांत देशपांडे मो.म्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Wednesday, March 20, 2013

का तेच झाले?


शेवटी होऊ नये का तेच झाले?
गारदी देण्यास खांदा फक्त आले

चेहर्‍याच्या आड मी डोकावलो न
वाटले जे आपुले, परके निघाले

फक्त सदरे घातल्याने साणसांचे
मान मिळतो श्वापदांना, हे कळाले

शांतता समितीवरी अध्यक्ष केले
नेमके दंग्यात ज्याचे घर जळाले

राष्ट्रद्रोही अन् जिहाद्यांचाच पुळका
अन् हुतात्मे विस्मृतीमध्ये बुडाले

पाहिला पोलीसखाक्या अन् दरारा
गुंड त्यांचे दोस्त, पीडित धुम पळाले

लोकशाही भोगली मनसोक्त लुटली
लूट घेउन सभ्य स्वीडनला उडाले

प्यायला पाणी नसे, हाती जनांच्या
घोषणांनी फक्त भरले रिक्त प्याले

चांगल्या "निशिकांत" गोष्टी सांगता मी
का मला सारेच बुरसटला म्हणाले?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Friday, March 1, 2013

आपण शांत असते


आपण शांत असते

वादळे उठवून आपण शांत असते
चित्त माझे का अशी बेचैन करते?

लाभला लडिवाळ मुखडा जीवघेणा
हासते मिष्किल, कधी लटकेच रुसते

जीव ओवाळून टाकावा जिच्यावर
एवढी ती आपुल्या तोर्‍यात दिसते

मेनका ती पूर्वजन्मीची असावी
भंगण्या तप आजही ती गोड हसते

गर्क असते आपणातच एवढी की
आरशामध्ये स्वतःला फक्त बघते

राहते ती बंद कोषी एकटी अन्
व्यक्त थोडी, जास्त ती अव्यक्त जगते

रंगला "निशिकांत" सौंदर्यात वेडा
स्वप्न सरल्यावर तिचे अस्तित्व विरते

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

अडचणीचा जाहलो


कोपर्‍यालाही घराच्या अडचणीचा जाहलो
मीच माझ्या अंगणाला अडगळीचा जाहलो

रेशमांचे बंध होते कैक विणले जीवनी
लुप्त सारे, एक धागा उसवणीचा जाहलो

जिंकली मी कैक शिखरे, सांजवेळी पण अता
मी चढावाचा प्रवासी उतरणीचा जाहलो

सांत्वने देता मला का? सावरा अपुले जिणे
का विषय ढोंगी जनांच्या हळहळीचा जाहलो

आत्मवृत्तातील पाने घेतली लिहिण्यास मी
एक मी इतिहास आता वळचणीचा जाहलो

भक्त होतो ईश्वराचा ना कुणी याचक तरी
मजबुरीने दास आता विनवणीचा जाहलो

कर्मकांडाने निराशा लाभली अन् , कार्यकर्ता
अंधश्रध्देच्या विरोधी चळवळीचा जाहलो

गुंतलो इतका प्रपंची, आस मुक्तीची वृथा
जन्म मरणाचा प्रवासी दगदगीचा जाहलो

आरसा "निशिकांत" सांगे मावळाया लागले
अंत दिसता, ओलसर मी पापणीचा जाहलो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--  nishides1944@yahoo.com


Monday, February 25, 2013

किती हा पसारा !


तुझ्या आठवांचा किती हा पसारा !
पसारा जरी, तोच माझा उबारा

नको हाक देऊस इतक्या उशीरा
मनातील तुटल्यात केंव्हाच तारा

त्सुनामीत बेजार मी भावनांच्या
मनी आस नुरली मिळावा किनारा

पुन्हा प्रेम करणे मला शक्य नाही
कशाला विषाची परिक्षा दुबारा ?

किती चेहरे मख्ख शेजारच्यांचे !
कुणाचाच नव्हता मिळाला सहारा

असा लिप्त मी आज दु:खात आहे !
जुना दाह वाटे सुखाचा नजारा

मनुष्यात फोफावला स्वार्थ इतका
कुणीही कुणाचाच नसतो दुलारा

भरायास खळगी किती राबलो मी
तुझा जीवना हाच रे गोषवारा

लिहावेस "निशिकांत" तू भाग्य अपुले
स्वतःला समजतोस तू का बिचारा ?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com


रुखरुख थोडी


रुखरुख थॉडी वसंत नाही आला फुलून याची
तिव्र वेदना मीच अंतरी गेलो सुकून याची

वेस हरवली, मंदिर गेले शहरीकरणी कोठे?
प्रभो नोंद घे हात जोडतो मंदिर स्मरून याची

उदास का मी ऊंच पाहुनी श्रिमंतांची वस्ती?
खुशी वाटते लक्तरात मी जगलो हसून याची

अन्यायाची चीड क्षणाची, पुन्हा लोक हे सारे,
लाज वाटते, कोषामध्ये जगती दडून याची

उन्मेषाने चढत राहिलो धवल यशांची शिखरे
खंत वाटते माझे अपुले बघती दुरून याची

घाव नवे अन् नव्या वेदना खुशीखुशीने सहतो
काळजी जुन्या जखमा नाही आल्या भरून याची

शिकवलेस तू तर पिल्लांना उडावया आकाशी !
बोच कशाला "निशिकांता" ते गेले उडून याची?


निशिकाt देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Saturday, February 16, 2013

पुन्हा एकदा जगावयाचे


पहाट झाली पर्व संपले अंधाराचे
ऋतू बहरले पुन्हा एकदा जगावयाचे

बारा महिने तुझ्या भोवती वसंत असतो
आठवणींना तुझ्या लाभले गंध फुलांचे

तुझी लागता चाहुल फुलतो मनी फुलोरा
भेटीपेक्षा स्वप्न आवडे अभासाचे

नैराश्याचे मळभ दाटले, पण तू येता
पुन्हा लागलो स्वप्न रंगवू संसाराचे

रंग गुलाबी जिकडे तिकडे दिसू लागले
वेड नव्याने मला गुलाबी सहवासाचे

तुझ्या सोबती बघेन आता स्वप्न मखमली
पुरे जाहले जीवन जगणे निवडुंगाचे

ओठी आता हास्य फुलू दे नको शुष्कता
थंड दवांनी आयुष्य सारे भिजवायाचे

होकारने तुझ्या, अडचणी सरून गेल्या
दोघे लिलया पेलू ओझे आकाशाचे

"निशिकांता"च्या गजलातुन ती मुक्त वावरे
व्यसन लागले शब्दांनाही सौंदर्याचे.


निशिकांत देशपांडे. मो क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Friday, February 15, 2013

"प्रगती केली" व्यर्थ वल्गना

अथांग पाणी अन् शेजारी वृक्ष वाळला अशीच आहे समाज रचना
अमीर वस्तीच्या शेजारी चाळ नांदते "प्रगती केली" व्यर्थ वल्गना

सरकारी योजनेत येथे आड खोदला टिपूसभरही पाणी नाही
पाणी मुरले पैसा सरला तहानलेला घसा गावचा कोरडाच ना !

विचारसरणी उजवी डावी जुनाच गुंता  अजून आहे सुटावयाचा
मिळते जुळते घेत जरासे अवलंबावा मध्यमार्ग ही मस्त कल्पना

मुले बिचारी लक्ष देउनी शिक्षण घेती भविष्य त्यांचे उज्वल होवो
खंत वाटते, शिकून आम्ही काय मिळवले? पदरी पडली फक्त वंचना

काळोखी लखलखती तारे उजेड येता लुप्त पावती, विचित्र सारे
प्रकाश करतो दडपादडपी तार्‍यांना तेजोमय  करतो अंधारच ना !


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Sunday, February 10, 2013

शोधेन नक्की


सर्व मिथ्या सत्त्य मी शोधेन नक्की
त्यास मी सिंहासनी बसवेन नक्की

राख जमलेली तरी विसरू नका हे
सुप्त ठिणगी मी कधी पेटेन नक्की

वेष भगवा अन् खडावा घातल्या पण
मोह सुटला जर कधी सांगेन नक्की

चार दुर्वा वाहिल्यावर वाटते की
पुण्य केले स्वर्ग मी मिळवेन नक्की

रंजल्यांना अर्थमंत्री झूठ सांगे
योजना बनवून मी भेटेन नक्की

आसवे गाळीत जे जगतात त्यांना
गावयाला गीत मी शिकवेन नक्की

कैक वर्षे जाहली मी हेच म्हणतो
आज पीतो मी उद्या सोडेन नक्की

देव का नुसताच म्हणतो साधकांना?
भाव चरणी ठेव मी पावेन नक्की

फेसबुक प्रेमी म्हणे "निशिकांत" आता
ऑनलाइन गाठ मी बांधेन नक्की

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Sunday, February 3, 2013

धावत असतो


"घर की मुर्गी दाल बराबर" असा तिच्याशी वागत असतो
मूर्ख कसा मी? मृगजळ पुढती मागे मागे धावत असतो

"आधी केले मग सांगितले" तत्व पाळले जुन्या पिढीने
आज मुखवटे, वरून भगवे, खर्‍या शुचित्वा शोधत असतो

खांद्यावर खेळवले ज्यांना उडून गेले, कलेवराला
मी मेल्यावर द्या खांदा हे शेजार्‍यांना विनवत असतो

देवाला मी दगड मानले गुर्मी होती मला यशाची
ठेच लागली अशी ! अता मी वारीमध्ये चालत असतो

शब्द अडकणे ओठामध्ये जुनी बिमारी माझी आहे
व्यक्त व्हावया शब्दफुलांना गजलांमध्ये गुंफत असतो

आयुष्याच्या कंगोर्‍यांना शाप लाभला दु:खाश्रूंचा
तरी बाभाळीच्या काट्यांना कुर्‍हाड घेउन साळत असतो

मोजकेच क्षण जीवन ज्यांचे मोत्यासम ते चमकत जगती
भल्या पहाटे दवबुंदूंचे भाग्य तयांना मागत असतो

हातामध्ये हात मिळाला तुझा त्या क्षणी झुंज संपली
बेफिकिरीने आयुष्याला आज वाकुल्या दावत असतो

होश हरवले "निशिकांताचे" मयखान्याविन तुला भेटता
जगावयाचे कारण आता तुझ्या भोवती हुडकत असतो


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com



Friday, February 1, 2013

तेज कोठे हरवले?


का दिसे अंधार सारा, तेज कोठे हरवले?
काळजाला काळजीने खूप आहे ग्रासले

वेध ग्रहणी लागण्या आधीच का अंधारले?
राहुकेतूंचा दरारा सर्व जग धास्तावले

बेगडी अश्वासनावर लोक सारे भाळले
का दिले निवडून त्यांना? आम जन पस्तावले

पेटुनी उठणे अताशा ना दिसे रस्त्यावरी
रोजचे अन्याय बघुनी लोकही निर्ढावले

वेग आता शब्द झाला परवलीचा जीवनी
कासवाची अन् सशाची गोष्ट सारे विसरले

फेसबुकवर रोज माझा टाकते फोटो नवा
"मस्त, सुंदर" वाचुनी प्रतिसाद वाटे चांगले

कायद्याला तोडणारे कायदे करती इथे
का गुन्हेगारास आम्ही संसदेवर धाडले?

का अचानक भळभळाया लागल्या जखमा जुन्या?
लागता डोळा जरासा कोण ते डोकावले?

आकडेवारी यशाची का दिली बिकिनी परी?
दावले दावावयाचे, जे हवे ते झाकले

आत्मघाती पाहिली "निशिकांत" दोस्ती काल मी
सूर्यकिरणांना धुक्याने मित्र जेंव्हा मानले


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com



Thursday, January 24, 2013

ध्येय मार्गी चालताना


ध्येय मार्गी चालताना पाय भरकटले किती?
हारल्याच्या भावनेने श्वास गुदमरले किती?

पेटल्या होत्या मशाली, प्रश्न धगधगले किती?
नांदते मरगळ अताशा गाव धुरकटले किती?

तो म्हणे मी बाल आहे मामुली शिक्षाच द्या
श्वापदाने त्या कळीला काल कुस्करले किती?###

ताण, वेगाचा मिळाला नवपिढीला शाप अन्
पस्तिशीआधीच दिसती गाल सुरकुतले किती?

मी वसंताचे जरी का स्वप्न नाही पाहिले
लागता चाहुल तुझी मन मस्त शिरशिरले किती?

तू निघाल्यावर, हसोनी, जा म्हणालो मी तुला
दार लाउन घेतल्यावर नेत्र घळघळले किती?

श्वास गुदमरतो असा का रोग नसुनी कोणता?
आठवांनी बघ गळ्याला घट्ट करकचले किती?

सोसतो मी तू दिलेल्या खोल जखमा एवढ्या !
भानही नसते नव्याने आज खरचटले किती

संग का "निशिकांत" केला तू असंगाशी असा?
आरसा सांगेल काळे तोंड बरबटले किती


### दिल्लीतल्या बलात्कार कांडावर आधरित प्रासंगिक शेर

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com










Thursday, January 17, 2013

मौन


मौन माझ्या अंतरीचे बोलते माझ्यासवे
नेहमी पिंगा धरोनी खेळते माझ्यासवे

मौन आहे गीत माझे मौज माझा सूरही
मौन तारा अंतरीच्या छेडते माझ्यासवे

सांगण्या आनंद माझा कोण आहे आपुले?
मौन हाती हात धरुनी नाचते माझ्यासवे

खूप आले खूप गेले शेवटी मी एकटा
मौन करते साथ अंती चालते माझ्यासवे

वाढतो शब्दावरूनी शब्द हे आहे खरे
मौन उत्तर द्यावयाचे टाळते माझ्यासवे

काय मी केली कमाई? सांजवेळी प्रश्न हा
मौन, उरले काय हाती, मोजते माझ्यासवे

मौनव्रत घेऊन बसलो ईश्वराला प्रार्थण्या
श्रीहरी स्वप्नात झाले बोलते माझ्यासवे

प्रश्नचिन्हांचीच आहे मालिका जगणे जगी
मौन सार्‍या उत्तरांना शोधते माझ्यासवे

केवढे "निशिकांत" आहे वेड मौनाचे तुला?
मौन ना लढता झगडता नांदते माझ्यासवे


निशिकांत देशपांडे मो.क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Sunday, January 13, 2013

वाढला संचार येथे


कौरवांचा वाढला संचार येथे
द्रौपदीला ना मिळे आधार येथे

खूप किंचाळ्या तिच्या ऐकून, बहिरे
मर्द सारे शोधती कासार येथे

काय किमया आश्रमी बाबागुरूंची !
नार भाकड राहते गर्भार येथे

लाजही लाजून खाली मान घाली
बेशरम राजेच झाले फार येथे

काम सरकारी निघाया व्यर्थ चकरा
निर्णयांचे थाटले बाजार येथे

फोडली वाचा गुन्ह्यांना, हा गुन्हा का?
मी कशाला आज ताडीपार येथे?

मृगजळामागे पळावे, ध्यास इतका
वास्तवांचे मोडले संसार येथे

सूर्य भित्रा का असा ढोलीत लपला?
अश्वमेधाला निघे अंधार येथे

मंदिरे होती कधी का ईश्वराची?
भरवती बडवे सदा दरबार येथे

तत्व का "निशिकांत" सोडावे जगाया
जाउ दे! धेंडास मिळती हार येथे


निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mali-- nishides1944@yahoo.com


Friday, January 11, 2013

नेमका शुध्दीत मी


दु:ख विसरायास असतो पीत मी
आज आहे नेमका शुध्दीत मी

व्यर्थ आलो उच्चभ्रू वस्तीत मी
वाढलो चाळीमधे मस्तीत मी

तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी

दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी

हात तू हातात देवुन बघ जरा
साथ देणे जाणतो यारीत मी

काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी

दु:ख हसण्याआड लपवावे, जुनी
यत्न करुनी पाळतो ही रीत मी

का भुतावळ घालते घिरट्या अशी?
घातले त्यांना कधी ना शीत मी

शल्य "निशिकांता"स भौतिक या जगी
चाललो नाही कधी वारीत मी


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, January 9, 2013

रंगवून झाले


असंख्य धागे विणून झाले
वस्त्राला रंगवून झाले

उरलो मी उपकारापुरता
माझे जगणे जगून झाले

झोप कशाला घ्यावी आता?
स्वप्न हवे ते बघून झाले

राम न वाटे जीवनातही
उठता बसता हरून झाले

तुला शोधण्या धुक्यात जाता
दवात थोडे भिजून झाले

भिकार जीवन जगता जगता
शंभर वेळा मरून झाले

विरहाच्या प्याल्यास रिचवता
नशेमधे लडखडून झाले

करताना मुल्यांकन माझे
शुन्यासंगे गुणून झाले

समजत होतो अपुले त्यांना
अस्तिनीमधे बघून झाले

"निशिकांता"च्या तृप्त जीवनी
करायचे ते करून झाले


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Sunday, January 6, 2013

देव अंतरी बघावयाची


केली होती सर्व तयारी निघावयाची
आस मनी का जागवली तू जगावयाची

कल्पतरूच्या झाडाखाली नाही बसलो
मनास भीती अभद्र इच्छा रुजावयाची

जन्मताच मी कुमारिके का मला फेकले?
आई कुठली रीत पाप हे धुवावयाची?

लक्तरात मी जीवन जगलो आज कशाला?
संधी देता तिरडीवरती सजावयाची?

ज्योत तेवते प्रकाश देण्या जगास, पण का?
परवान्यांना सदैव घाई जळावयाची

हवा कशाला व्यर्थ पसारा गणगोताचा?
हमी असावी चारच खांदे मिळावयाची

मावळली जात्यांची घरघर, सुरेल ओव्या
पुन्हा वाटते पहाट यावी दळावयाची

बिर्ला मंदिर जसे बांधले, नावामध्ये
बिर्ला असतो रीत देव का नसावयाची?

"निशिकांता"ने ध्यान लावण्या डोळे मिटले
ओढ लागली देव अंतरी बघावयाची


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com




Thursday, January 3, 2013

देव अंतरी बघावयाची


केली होती सर्व तयारी निघावयाची
आस मनी का जागवली तू जगावयाची?

कल्पतरूच्या झाडाखाली बसलो नाही
मनास भीती अभद्र इच्छा रुजावयाची

जन्मताच मी कुमारिके का मला फेकले?
आई कुठली रीत, पाप ही धुवावयाची?

हवा कशाला व्यर्थ पसारा गणगोताचा?
हमी असावी चारच खांदे मिळावयाची

लक्तरात मी जीवन जगलो, आज कशाला?
संधी देता तिरडीवरती सजावयाची

ज्योत तेवते प्रकाश देण्या जगास, पण का?
परवान्यांना सदैव घाई जळावयाची

मावळली जात्यांची घरघर, सुरेल ओव्या
पुन्हा वाटते पहाट यावी दळावयाची

बिर्ला मंदिर जसे बांधले, नावामध्ये
बिर्ला असतो रीत देव का नसावयाची?

"निशिकांता"ने ध्यान लावण्या डोळे मिटले
ओढ लागली देव अंतरी बघावयाची


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com