Thursday, December 22, 2016

विसर आता


शांतता होती इथे हे विसर आता
चांदण्याचे दूर गेले शहर आता

लावले बागेत हे विषवृक्ष कोणी?
पारखे झाले मधाला भ्रमर आता

जाहली अडचण घराला सुरकुत्यांची
ना वयस्कांची कुणाला कदर आता

पश्चिमेच्या संस्कृतीने ग्रासल्याने
लोपली साडी, हरवला पदर आता

देवही भक्तांकडे ना लक्ष देतो
राव लोकांवर कृपाळू नजर आता

घेरल्यावर वेदनांनी सांज वेळी
आठवावे बालपणचे प्रहर आता

लाटती धन धेंड, त्यांना धूर्त म्हणती
" लाच पटवार्‍यास " होते खबर आता

शापिले नंदनवनाला दहशतीने
मातला आहे तिथेही कहर आता

शांतता चिर पाहिजे "निशिकांत "ला तर
घे कुदळ अन् खोद अपुली कबर आता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Saturday, December 17, 2016

सखे पावसाने


मनी रुजवली एक आठवण सखे पावसाने
तुझ्यासोबती नाव कागदी कधी सोडल्याने

खळखळणारे जीवन होते मित्र मैत्रिणींचे
राग, लोभ अन् हेवे, दावे मनात नसल्याने

शुष्क जीवनी शोध घेतला, हिरवळ सापडली
बालपणीचे वैभवशाली पान चाळल्याने

कष्टाला का महत्व नाही दिले संस्कृतीने?
शास्त्र सांगते इष्टच होते देव पावल्याने

पाय टेकुनी जमिनीवरती भविष्य ठरवावे
जरी घ्यायची उंच भरारी, तरी माणसाने

ऊन नको पण श्रावणमासी भिजावयाचे का
स्वप्न बघावे दिवाणखान्यातल्या रोपट्याने?

ओंगळवाण्या स्पर्शाने का उगा थिजायाचे?
टळेल संकट हिंमत करुनी दूर लोटल्याने

वादग्रस्त मी ठरलो होतो खूप कधी काळी
भंपक रूढीं विरुध्द थोडे स्पष्ट बोलल्याने

एकलकोंडे पुरे अता "निशिकांत" जगायाचे?
आयुष्याचे रंग बहरती आल्यागेल्याने


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, December 13, 2016

पाय थकले शेवटी


मृगजळामागे पळालो पाय थकले शेवटी
सर्व गेले वंचनांचे झुंड उरले शेवटी

द्यावया खांदा न कोणी, प्रेत यात्रा संपल्या
शोधली शववाहिका अन् प्रश्न सुटले शेवटी

त्रासुनी देवा असा का माणसांना झुकवसी?
फक्त तू शरणागतांचा, हे उमगले शेवटी

घातल्या खेपा हजारो, तारखावर तारखा
लाच आहूतीत देता, काम जमले शेवटी

चूक झाली, पाय वळले नेमके शहराकडे
एकटा गर्दीत येथे, गाव स्मरले शेवटी

चंद्र का देतो समुद्राला अशी हुलकावणी?
सागराचे एकतर्फी प्रेम ठरले शेवटी

भोगलेले दु:ख होते सोबती अंतःक्षणी
आठवावे चांगले ते का विसरले शेवटी?

घेतली आरामखुर्ची सांज येता जीवनी
वेदनांनी कातळालाही हरवले शेवाटी

भक्तिमार्गी जायचे ठरवूनही "निशिकांत"ला
सोडवेना मोहमाया, श्वास सरले शेवटी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 30, 2016

सोनचाफा


सोनचाफा बहरलेला, तू घरी येशील का?
रात्र ही गंधाळलेली ओंजळी भरशील का?

दव कणांनी चिंब झाले स्वप्न सारे तुजमुळे
स्वप्न माझे पाहण्याला तू इथे असशील का?

स्पंदने उबदार माझी तेज झाली का गडे?
गारव्याचा झोत होउन चैन मज देशील का?

चांदणे मज पोळताहे विरह देई यातना
मोकळ्या बाहूत येण्या तू मला पुसशील का?

मी इथे जे भोगते रे! तू तिथे सहतोस का?
भेट होता मजप्रमाणे गोड तू हसशीका?

वाट ही अंधारलेली, काजवे म्या धाडिले
झाकल्या नेत्री पहाटे कैद तू होशील का?

उंच हे आकाश अपुले चंद्रही तो आपुला
तोडण्या तारे भरारी उंच तू घेशील का?

खूप बसलो पाय सोडुन संथ या पाण्यामधे
खोल या आनंदडोही तू मला नेशील का?

पौर्णिमा "निशिकांत" आणी लाट प्रेमाची सवे
याद येता गतक्षणांची तू पुन्हा झुरशील का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, November 27, 2016

पाऊलही उन्हाचे


मी व्यर्थ स्वप्न बघतो अंधूक कवडशाचे
अद्याप वाजले ना पाऊलही उन्हाचे

का आरती करावी जाज्वल्य दैवताची?
मिळवीन मी प्रयत्ने भव्यत्व पर्वताचे

झोपे ससा अताही, ना जिद्द कासवाला
ध्येयास गाठण्याला, वशिले बघावयाचे

तोडून जंगले, ढग आम्हीच वांझ केले
मल्हार गाउनीही ना थेंब पावसाचे

मोठ्या घरात छोटी दिसतात माणसे अन्
छोट्या घरात सारे, मोठ्या किती मनाचे!

केसात माळलेली सुकती फुले परंतू
वेश्येस मजबुरीने असते फुलावयाचे

मोठ्या जरी निकामी झाल्यात आज नोटा
गांधीस खंत नाही, छदमी हसावयाचे

आयुष्य सर्व गेले ज्याचे नशेत बुडुनी
प्याले कशास देता त्यालाच सरबताचे?

मॉडर्न माय आहे "निशिकांत" नातवांची
ओव्या कुणी म्हणाव्या, कोणी दळावयाचे?



निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, November 26, 2016

हेमंत करकरे---

(२६ नोव्हेंबर हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यामुळे सर्वांच्या कायम स्मरणात रहाणारा दिवस. हल्ल्याच्या दरम्यान टीव्हीवरील कव्हरेज मी सतत बघत होतो. हेमंत करकरे पण शहीद झाले या हल्ल्यात. त्यांची प्रेतयात्रा बघत असता डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि याचवेळी ही गझल कण्हत्या कलमेमधून झरत होती. गझलेत जरी करकरे यांचाच उल्लेख असला तरी मला या कारवाईत कामी आलेले सर्व पोलिस कर्मचारी अभिप्रेत आहेत.)

दाटून कंठ कांही वदणार आज आहे
कलिजा हिमालयाचा थिजणार आज आहे

होते जिवंत जेंव्हा जखमा दिल्या जयानी
त्यांचेच तोंड काळे दिसणार आज आहे

शहिदास काय देता? श्रध्दांजली फुकाची
भोंदूगिरी तुम्हाला हसणार आज आहे

धरली कधीच नव्हती आशा कुण्या फळाची
त्यांच्या समोर ईश्वर दिपणार आज आहे

अंधार जीवघेणा करतोय राज्य जगती
तो एकला कवडसा पुरणार आज आहे

नवसूर्य पाहिला मी काळ्या कभिन्न रात्री
सूर्यास अर्घ्य देण्या बसणार आज आहे

अधुनीक वाल्मिकीला, पाहून कांड सारे
लिहिण्यास राम नवखा मिळणार आज आहे

बलिदान व्यर्थ नाही, ना व्यर्थ कार्य त्यांचे
हिजडा जिहादवादी, हरणार आज आहे

दु:खी कुटुंब त्यांचे अश्रू कसे कसे पुसावे?
नियतीच हात त्यांचा धरणार आज आहे

"निशिकांत" याद येता, हेमंत करकरेंची
हा बांध आसवांचा फुटणार आज आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, November 9, 2016

स्वप्न बघाया कसली हरकत?


वास्तवात मी नसतो अडकत
स्वप्न बघाया कसली हरकत?

एक सोडली तलाक म्हणुनी
"दुसरी केली" नामी सवलत

भविष्य माझे मीच ठरवतो
नको कुणाशी सल्ला-मसलत

उडदामाजी काळे गोरे
कोण बसावे त्यांना निवडत?

वृध्दत्वाचा जोर वाढता
काळ पुढे का नाही सरकत ?

ख्याती होता "देव पावतो"
पुजारीच अनुभवती बरकत

कशी लोकशाही उमलावी?
भोगतेय नेत्यांची दहशत

लाख कारणे तुम्हीच शोधा
कुणी कुणाला नसते हसवत

प्रश्न करी "निशिकांत" स्वतःला
अपुलयांनी का केली फसगत?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, November 6, 2016

जगावयाचे नाही


फेकलेस तू तुकडे त्यावर जगावयाचे नाही
हे आयुष्या! तुझे मांडलिक बनावयाचे नाही

एकामागुन एक संकटे धाडतोस आयुष्या!
या सवयीला "सत्वपरिक्षा", म्हणावयाचे नाही

अश्वमेध कर यज्ञ प्राक्तना रोज सशांच्या देशी
ही सिंहांची वस्ती, इकडे वळावयाचे नाही

जगा आवडे तसा मुखवटा कधी न वापरला मी
नजरेमधुनी मलाच माझ्या पडावयाचे नाही

शुभंकरोती म्हणतो, डिजिटलही जगतो आनंदे
जुन्या-नव्यांच्या वादामध्ये फसावयाचे नाही

सज्जनातले सज्जन होते पाय घसरले ज्यांचे
गृहीत कोणालाच कधीही धरावयाचे नाही

कतताना उपदेश नवपिढी कानाडोळा करते
कसे जागवायाचे ज्यांना उठावयाचे नाही?

आनंदाचा स्त्रोत पाहिला वेदनेत मी जेंव्हा
मनी ठरवले कधी जीवनी कण्हावयाचे नाही

निरोप घे "निशिकांत"निघाया प्रवासास शेवटच्या
लाख तुटूदे पाश, परतुनी फिरावयाचे नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Saturday, October 15, 2016

नियम लागू होत नाही


वेदनेच्या मैफिलीचा स्वर टिकाऊ होत नाही
जीवनाबाबत कसा हा नियम लागू होत नाही?

पोट भरण्याचीच मोठी मजबुरी, पदभ्रष्ट करते
हौस म्हणुनी कोणतीही स्त्री विकाऊ होत नाही

मानतो मी एकलव्याला स्वयंभू व्यक्तिरेखा
मांडुनी प्रतिमा गुरूची, तो शिकाऊ होत नाही

छेडती रस्त्यात स्त्रीला, गप्प सारे, पण कुणीही
सोडवाया जानकीला, का जटायू होत नाही

खेचण्याचा व्यर्थ केला यत्न पण पळतो पुढे तो
सुरुकुत्यांचे राज्य आले, काळ काबू होत नाही

शौर्यगाथा सांगणे सोडून टीव्ही पाहिल्याने
वाढवायाला शिवाजी, मा जिजाऊ होत नाही

पाळले जाते शुचित्वाला इथे, पण मजबुरीने
कोण संधी लाभता पटकन लुटारू होत नाही

ना चकोराला शशीचा वाटतो हल्ली भरवसा
दूरचा निष्ठूर सखया का दयाळू होत नाही ?

कर जरा "निशिकांत" मैत्री वेदनांच्या वास्तवाशी
मृगजळामागे पळाल्याने सुखायू होत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Monday, September 26, 2016

अशी रात फिरायासाठी---( तरही )

दे ऋतू एक, शहार्‍यांत लपायासाठी
हा असा चंद्र, अशी रात फिरायासाठी

चांदण्या रोज किती वेळ सख्या मोजू मी ?
दे तुझी झोप, तुझे स्वप्न बघायासाठी

एकटी वाट कशी पार करू वळणांची ?
मागते साथ, तुझा हात जगायासाठी

लागला ध्यास, जगायास पुढे क्षितिजाच्या
पंख दे आज सख्या, ऊंच उडायासाठी

गुंफली वीण किती घाट्ट! सख्या नात्याची
सातही जन्म, तुझी मीच असायासाठी

झाकुनी दु:ख, उसास्यांस हसू पांघरले
जीवना! रंग तुझे मस्त दिसायासाठी

प्रेतयात्रेत स्वतःच्याच निघायाआधी
खोदली मीच कबर खोल पुरायासाठी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, September 20, 2016

मरगळ सारी सरून गेली


वचन दिलेले पूर्ण कराया क्षणेक आली, निघून गेली
तिच्या अल्पशा सहवासाने, मरगळ सारी सरून गेली

काळजातल्या कपारीतली ओल नेमकी तिने शोधली
पहिल्या नजरानजरेतच ती अंतःकरणी रुजून गेली

मला वाटते तिने म्हणावे "प्रेम तुझ्यावर मी करते" पण
लाजलाजरी नजरेमधुनी म्हणायचे ते म्हणून गेली

धूसर धूसर स्वप्न अधूरे, पाठलाग मी उगाच केला
हासत लाजत भल्या पहाटे धुक्यात होती विरून गेली

आठवणींची संगत असते, एकाकीपण विसरायाला
यासाठी तर यदाकदाचित नसेल का ती त्यजून गेली?

ती नसताना ग्रिष्म होरपळ, भोगतोस का एकांताची?
डोकाउन बघ तुझ्या अंतरी वसंत ती अंथरून गेली

गंगाजमुनी प्रेम आमुचे, खास विरोधाभास त्यातही
मनी कोरडी कपार, माझे नेत्र ओलसर करून गेली

काव्य संपले ती नसल्याने, आयुष्याच्या मावळतीला
आठवणींचे वस्त्र भरजरी माझ्यासाठी विणून गेली

तुला कसे "निशिकांत"कळावे? दु:खामध्ये चूर तुझ्या तू
दर्पणात पारा नसणार्‍या डोकाउन ती हसून गेली



निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, September 6, 2016

सुरुवात मस्त हल्ली


पाटी पुसून लिहिते जोमात मस्त हल्ली
करते पुन्हा नव्याने सुरुवात मस्त हल्ली

स्वप्ने मला उद्याची पडतात मस्त हल्ली
समिधा जुन्या क्षणांच्या जळतात मस्त हल्ली

बघता वळून मागे, अंधार कुट्ट काळा
रात्रीतही कवडसे, दिसतात मस्त हाल्ली

फुलपाखरा तुझे का, काट्यात गुंतलेले
पर फाटके तरीही, उडतात मस्त हल्ली?

मैत्री, जगावयाला, मिळताच चांगल्यांची
वाईट हस्तरेषा खुलतात मस्त हल्ली

वडवानळात जगले मी काल, ठीक झाले
दु:खे अनेक छोटी पचतात मस्त हल्ली

शब्दांस दावणीला बांधून दु:ख लिहिते
कवितांमुळे कपारी भिजतात मस्त हल्ली

आता न वाटते मी आहे परावलंबी
डुलते कळी स्वयंभू बिनधास्त मस्त हल्ली

"निशिकांत" चौकटींना ओलांडल्यामुळे ती
उपभोगते सुखांची बरसात मस्त हल्ली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Tuesday, August 30, 2016

भिजून गेलो


असाच कोठे तरी जायचे म्हणून गेलो
आठवणींची रिमझिम आली, भिजून गेलो

दार तुझ्या स्वप्नांचे टकटकताना कळले
झोप तुझीही सखे हरवली, निघून गेलो

झंझावाती चाहुल नाही कशी लागली?
जरी कैकदा मनी तुझ्या वावरून गेलो

नकोस समजू भल्या पहाटे, तुला टाळले
सूर्य उगवता धुक्यासवे मी विरून गेलो

मस्ती होती मला स्वयंभू मी असल्याची
तू गेल्यावर क्षणात एका सरून गेलो

देहदान केल्यावर माझ्या ध्यानी आले
सर्वार्थाने मृत्यूनंतर जगून गेलो

मुखवट्याविना जसा पाहिला मूळ चेहरा
मलाच माझी घृणा वाटली, दुरून गेलो

सुशिक्षितांची ओढत री, मतदाना दिवशी
मित्रांसोबत सहलीला मी निघून गेलो

फरपट होती माझ्याही "निशिकांत"जीवनी
पण तिरडीवर जाताना मी सजून गेलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३




Saturday, August 20, 2016

मी दिली आहे सुपारी


वास्तवाच्या काहिलीने जीव हा कातावला
मी दिली आहे सुपारी मारण्यासाठी मला

इभ्रतीचा पंचनामा प्राक्तना केलास का?
श्वास घेण्याचा जगाया मार्ग आहे खुंटला

दोनही होते किनारे चाललेले सोबती
भेटण्याची एकमेका, ना कधी जमली कला

आज चंगळवाद शैली एवढी बेशिस्त की!
वाटते संस्कार जगणे खूप मोठीशी बला

मन जरी भेगाळलेले, कोपरा ओला कसा?
आठवांचा त्या तिथे श्रावण असावा बरसला

माजला काळोख का आरूढता सिंहासनी?
एवढा त्याचा दरारा! सूर्यही अंधारला

पोपटाला पिंजर्‍याचा लागला इतका लळा
दार उघडे ठेवलेले पाहुनी धास्तावला

जन्मलो, मेलो कशाला? उत्तरे मिळती कुठे?
श्वास घेतो, ना उमगता अर्थ मी जगण्यातला

जायचे "निशिकांत"आहे गूढ वाटेने तुला
शाश्वतासाठी तटातट तोड इथल्या शृंखला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Friday, August 19, 2016

कळले मला


जिवाला दु:ख का अष्टौप्रहर, कळले मला
तुझ्यासाठीच जगलो आजवर कळले मला

नको सांगूस आवडतो तुला मी का सखे
सुचवते काय ही नजरानजर, कळले मला

सखीने जो दिला अंधार, लपवाया मनी
किती मोठे दिले देवा विवर, कळले मला

सरावानेच माझ्या पापण्या ओलावती
नसे कोणीच घ्यायाला खबर, कळले मला

कळी उमलायच्या आधीच येथे एवढे!
कशाला मारती चकरा भ्रमर, कळले मला

स्त्रिया हरवून गेल्या अंगभर वस्त्रातल्या
ढळाया ना अता उरला पदर, कळले मला

भदंतांच्या मनी वसतात लोभी माणसे
दिखावा पोसते पिवळे चिवर, कळले मला

चला परतूत पोरांनो पुन्हा खेड्यांकडे
प्रदूषणमुक्त ना कुठले शहर, कळले मला

न आवडली कधी चमचेगिरी "निशिकांत"ला
जगी म्हणुनीच त्याची ना कदर, कळले मला


१)भदंत= बौध्द धर्मगुरू.  २)चिवर= भदंत नेसतात ते पिवळ्या रंगाचे वस्त्र.


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३






Monday, August 8, 2016

सुरुवात होत आहे


ओली कपार हृदयी विरहात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे

माझे, तुझे न कांही, सारे असून अपुले
आता हिशोब कसला प्रेमात होत आहे

झालो वयस्क, व्हिस्की देते मला इशारा
बेहोष फक्त एका ग्लासात होत आहे

लाऊन चेहर्‍यांना बनतात सभ्य, बघुनी
मी लपविण्यात मजला निष्णात होत आहे

कामांध ग्राहकांना नाचून रिझवताना
रडताच बाळ हृदयी, आघात होत आहे

वाचून दिग्गजांच्या गझला, कुठे अताशा
माझी गझल जराशी वृत्तात  होत आहे

दाऊन वाकुल्या मी सार्‍या जगास जगलो
का दु:ख शेवटीच्या सत्रात होत आहे?

चर्चा जिथे घडावी, त्या संसदेत हल्ली
मुद्दा रुपांतरित का गुद्द्यात होत आहे

"निशिकांत"कलियुगी का घडते विचित्र सारे?
स्वपनात जे न व्हावे, सत्त्यात होत आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, July 31, 2016

वारीत पंढरीच्या---

( आषाढी एकादशीच्या निमित्ताने रचलेली एक भक्तिमय रचना. )

मी धन्य धन्य झालो वारीत पंढरीच्या
भक्ताळलो नियंत्या! वाटेत पालखीच्या

दिसतोस तूच तू का? चोहीकडे असा हा
माझ्यातही पहातो अंशास मी हरीच्या

रखरख दुपार सरली देवा तुझ्या कृपेने
वणवण फिरू कशाला शोधात सावलीच्या?

मी नाव विठ्ठ्लाचे घेता विचित्र घडले!
चिंता सरून गेल्या संसार सागरीच्या

का चारधाम यात्रा करण्यास दूर जाऊ?
मेळ्यात वैष्णवांच्या, इच्छा सफल मनीच्या

डोळे मिटून बघतो बा! विठ्ठला तुला मी
दिसतोस गोजिरा तू बाजूस रुख्मिणीच्या

मी तेहतीस कोटी देवास का पुजावे?
सारे मला मिळाले छायेत माउलीच्या

मीपण गळून गेले, पुरता निसंग झालो
ना यावया, निघालो यात्रेत शेवटीच्या

टेकून हात, मस्तक "निशिकांत" लीन होता
दिसला प्रभो किनारा नौकेस वादळीच्या


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, July 25, 2016

गाणे तिमिराचे


प्रकाश पुढती अन् मी मागे, किती पळायाचे?
आळवावया आज घेतले गाणे तिमिराचे

असेल आला शब्दांनाही कंटाळा दु:खांचा
पाचवीस जे पुजले, त्यावर किती लिहायाचे?

झाक आरशा केविलवाण्या चेहर्‍यास माझ्या
खिशात कडकी, मनात धडकी कसे हसायाचे?

जरी घातले बाभुळ काट्यांचे कुंपण होते
संरक्षण ना झाले अपुल्यांपासुन शेताचे

टाकलीस तू भरून झोळी तुझी कृपा देवा!
तुझ्या सावलीविना कसे मी श्वास घ्यावयाचे?

तलवारीशी लढावेच लागेल लेखणीला
"बळी पिळू दे कान"भीत का मूग गिळायाचे?

सावलीसही ध्यानी आले सांजवेळ झाली
तिचे मनसुबे मावळतीला पाठ फिरवण्याचे

स्वभाव अपुले विभिन्न इतके! गुदमर पदोपदी
संस्कृती अशी, तरी जन्मभर साथ जगायाचे

सरळसोट "निशिकात" तुला ना किंमत दमडीची
उपद्रवी गुंडांस भेटते आसन मानाचे


निशिकांत देशपांडे. ९८९०७ ९९०२३ मो.क्र. ९८९०७ ९९०२३





Sunday, July 3, 2016

दिसतात कोठे माणसे?


हात जोडावी अशी दिसतात कोठे माणसे?
मुखवट्यांच्या आडची दिसतात कोठे माणसे?

घेउनी मी शोध थकलो, उलगडा ना जाहला
माणसे ज्यांना म्हणू, वसतात कोठे माणसे?

यंत्रवत जगतात सारे, हरवला संवादही
हास्यक्लब व्यतिरिक्त का हसतात कोठे माणसे?

काय असते चांगले हे सांगती सारेच पण
अंतरी डोकावण्या धजतात कोठे माणसे?

गंध ध्यावा ना फुलांचा ! ईश्वराने जो दिला
वाट, उमलाया कळी, बघतात कोठे माणसे?

नववधू शेजारची जी जाळली, आक्रोशली
काय घडले जाणण्या निघतात कोठे माणसे?

स्वार्थ साधायासही अक्कल जराशी लागते
शाश्वताला सोडुनी पळतात कोठे माणसे?

"दे हरी बाजेवरी"ही आस का धरता मनी?
सोसल्याविन घाव का घडतात कोठे माणसे?

का असा "निशिकांत"पळशी मृगजळामागे उगा?
या जगी बावनकशी नसतात कोठे माणसे


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Monday, June 27, 2016

मार्ग नाही गावलेला


यक्षप्रश्नांनी सदा वैतागलेला
उत्तरांचा मार्ग नाही गावलेला

पापण्या भिजतात तेंव्हा नेमका का?
कोपरा असतो मनी भेगाळलेला

लिप्त संसारी तरी वारीत जाता
पाहिला प्रत्त्येकजण भक्ताळलेला

कोणते घरटे अता आबाद आहे?
लेकुरे उडताच जो तो संपलेला

जो विटेवर कैद आहे, संकटी तो
पाहिला मदतीस नाही धावलेला

हालवाया गदगदा सिंहासनाला
पाहिजे जनक्षोभ धगधग पेटलेला

का दुरुत्तर द्यावयाचे उत्तराला?
मी निरुत्तर मार्ग आहे शोधलेला

गौरवान्वित ईशमाथीच्या फुलांना
शाप "व्हा निर्माल्य"आहे लाभलेला

का असा "निशिकांत"तू भयभीत जगसी?
ताक फुंकी,  दूध केंव्हा पोळलेला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Tuesday, June 21, 2016

गझलेतुनी ओसंडते


भळभळाया दु:ख जेंव्हा लागते
आपसुक गझलेतुनी ओसंडते

कष्ट करुनी भाकरी मिळवीनही
घास भरवाया कुणी, मन शोधते

आत्ममर्जीने जगावे मी कसे?
"लोक म्हणतिल काय?"चिंता ग्रासते

भींत आहे ती जरी पडकी तरी
कालचे वैभव मुक्याने सांगते

मी नकोसा कोपर्‍यांना जाहलो
सुरकुत्यांना घर किती कंटाळते!

गात आहे भैरवी मी पण तरी
जीवना मैफिल तुझी ना संपते

केवढे उपचार केले! पण तरी
एकटेपणची बिमारी लांबते

ना गुरे शहरात, पण नेत्यास का
काम करण्या शेण जनता चारते?

सावली विठुची जिथे मिळते तिथे
जायला "निशिकांत"चे मन ओढते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, June 11, 2016

दोघांनीही प्रवास केला


रेल्वे पटरी समान होता दोघांनीही प्रवास केला
एकच रस्ता तरी कुणी ना जवळ यायचा प्रयास केला

सोबत असुनी, दोन किनारे जणू नदीचे वेगवेगळे
तरी उभयता सांगत असतो "प्रपंच आम्ही झकास केला"

सर्वांपेक्षा ऊंच असावे या जिद्दीने उडता उडता
मित्र न उरती शिखरावरती, तरी वाटते विकास केला

कणा असोनी झुकावयाचे विनम्र धोरण होते माझे
कायरता माझ्यात असावी, सहकार्‍यांनी कयास केला

नसून पाउस मृदुगंधाची झुळूक आली कशी? जाणण्या
ओघळणार्‍या आसवात भिजली धरती का? तपास केला

कशास खाते सुखदु:खाचे लिहावयाचे अंतक्षणाला?
जे जे जगलो त्यास म्हणावे "बेफिकिरीने विलास केला"

तुझाच वावर जागोजागी सखे पाहतो डायरीत मी
रेघ मारुनी उभी लिहाया माझ्याविषयी, समास केला

समाजाविना जगावयाचे पोकळीत का जमले असते?
म्हणून जळण्याअधी चितेवर सलाम सार्‍या जगास केला

कुणी नसे "निशिकांत" भोवती, कोसतोस का व्यर्थ स्वतःला?
काल माणसे जोडायाचा यत्न वेडसर कशास केला?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, May 27, 2016

बोथट सुखाची धार आहे


मागणी दु:खास हल्ली फार आहे
जाहली बोथट सुखाची धार आहे

घे परिक्षा, दु:ख दे वाटेल तितके
कोण करते वेदने! तक्रार आहे

ठीक आहे! तारका देईन म्हणतो
पण खरे तर प्रेमही व्यवहार आहे

उच्चभ्रू वस्तीत नांदे संपदा पण
शांत झोपेचीच मारामार आहे

संपले शिक्षण, न दिसती भव्य स्वप्ने
खानदानी "नोकरी" संस्कार आहे

गर्व तेजाचा दिव्या! करतोस का तू?
नांदतो खाली तुझ्या अंधार आहे

बांधुनी भिंती मनाला कोंडले पण
चाहूलीने पाडले खिंडार आहे

माय गेली टाकुनी, त्या बालकाला
न्याय देणारा कुठे दरबार आहे?

धिंड का "निशिकांत" निघते सदगुणांची?
दुर्गुणी सिंहासनी सरकार आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, May 14, 2016

खुबी आजच्या या सुबत्तेत नाही

वृत्त--- महानाग
लगावली---लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा

उद्या सोबतीला कुणी आपुलेसे असेलच असे सांगता येत नाही
टिकाऊ कसे एक नाते जपावे, खुबी आजच्या या सुबत्तेत नाही

जरी दूर आहे किनारा दधीचा, तरी पैलतीरास जाईन नक्की
जिथे ध्येय तेथे स्वतःनीच जावे, कुणीही कुणाला कधी नेत नाही

किती नांगरावे? किती कोळपावे? निराशाच पदरी अशी का पडावी?
मिळे रोख राशी ठराविक तिथीला, असे कोणतेही कुठे शेत नाही

कधी वेदनांशी, कधी आसवांशी, पुढे हात करुनी निभावेन यारी
नसेलच तुला यायचे, पावसा जा! तुझी भीक मागायचा बेत नाही

बळी शोषणाचे पिढीजात असुनी, विझाव्यात ठिणग्या अशा का कळेना
मशाली धरोनी जगा पेटवावे अशी जिद्द उरलीच रयतेत नाही

कवाडे मनाची जरी बंद केली, तरी स्वप्न आले दिशा द्यावयाला
नवे ध्येय मिळताच संभ्रमअवस्था जराही कुठे ध्येयवाटेत नाही

कधी व्यक्त करण्या मनोवेदनांना, सहारा मला लाभतो शायरीचा
प्रभावीपणे मांडते दु:ख ती पण, सुखाची छटा एक गझलेत नाही

स्वतःलाच "निशिकांत"फसवीत जगणे, पुरे क्रूर थट्टा अता जीवनाची
तुझ्या दर्शनी, वास्तवी चेहर्‍याची दखल वाटते का कुणी घेत नाही?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Thursday, May 12, 2016

ओलसर जखम तरी


लोटला प्रचंड काळ ओलसर जखम तरी
गोंदतोय हास्य रोज  रोज चेहर्‍यावरी

राव अल्प, खूप रंक, झाकण्यास ही दरी
नोंद दप्तरात फक्त आयची सरासरी

लेउनी सुखास, रंग पाहिले फिके फिके
शोभते किनार वेदने! तुझीच भरजरी

नांदतात सुरकुत्यात कैक सुप्त हिरवळी
व्यक्त त्या करावयास, मार्ग एक शायरी

वैर संपले, मनास वाटले असे कसे?
अस्तिनीत शांत बैसलेत आज ते जरी

शायरी जशी जमेल मी तशीच गुंफतो
सांग दिग्गजा! तुझी कशी करू बरोबरी?

काढले तिकीट, जायचे कुठे न ठरविता
श्वास थांबता प्रवास थांबतो खरोखरी

काळ, काम, वेग यात ताळमेळ घालुनी
प्रश्न सोडवून प्रश्न राहिले किती तरी

मी महत्व जाणले तुझे कसे न ईश्वरा?
शाश्वतास सोडले नि जोडली बिरादरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, April 21, 2016

गेले विकोपाला


गौण होते वाद पण गेले विकोपाला
आत्मप्रौढी बाधली होती समेटाला

मान्य आहे त्रस्त तुझिया मी वियोगाने
आठवांची बाग आहे दरवळायाला

चाहुलीनेही सखे गंधाळतो मी पण
वाटते का दरवळावे सोनचाफ्याला?

हार होता दोष झटकाया म्हणावे की
तेच घडते जे हवे असते विधात्याला

सर्व स्वप्ने पूर्ण झाली, त्या अभाग्यांच्या
जीवनी ना ध्येय उरते धडपडायाला

चार भिंती, चौकटी, गुदमर कशासाठी?
तोड अबले! चक्रव्यूहाच्या परीघाला

ना दिले भक्तास दर्शन तू कधीही पण
विरहिणी दिधलीस देवा गुणगुणायाला

हात माझे, पाय माझे, कष्टही माझे
फायदा का एवढा टाटा नि बिर्लाला?

जीवनाची नाव डगमगता नको चिंता
काळजी "निशिकांत" रे!असते खलाशाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Friday, March 25, 2016

मढवून कोण गेले?


कोरीव चेहरा तव घडवून कोण गेले?
नक्षत्र तेज वदनी मढवून कोण गेले?

डोळे तुझे नशिले अंदाजही नशिला
बेहोष धुंद डोही बुडवून कोण गेले?

ते धुंद हास्य ओठी, खैरात मज नशेची
मायूस आज का तू? चिडवून कोण गेले?

पहून लाल गाली, ओलेपणा दवांचा
शंका मनात, तुजला रडवून कोण गेले?

कानी हवा म्हणाली, येशील तू पहाटे
थबकून का उभी तू? अडवून कोण गेले?

गेले कुठे सदाचे? लडिवाळ बोलणे ते!
मित भाषणी असावे, पढवून कोण गेले?

स्वप्ने बघून जगणे शिकलो तुझ्यामुळे मी
झोपेस पंख लाउन, उडवून कोण गेले?

नि:शब्द ओठ होते, डोळ्यात भाव सारे
उद्वेग भावनांचा दडवून कोण गेले?

जाणून पायरी मी जगलो जगी खुषीने
झाडावरी चण्यांच्या चढवून कोण गेले?

"निशिकांत" काल येथे होती फुले सुगंधी
आता सुकून पडली, तुडवून कोण गेले?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Thursday, March 17, 2016

वाहवा का धर्मग्रंथाची?


नको चर्चा कुणाचा धर्म आहे चांगला याची
छळोनी माणसांना वाहवा का धर्मग्रंथाची?

उगा गुरुमंत्र का घ्यावा? कशाला दक्षिणा द्यावी?
तुझे तू भाग्य बनवाया छनी घे शिल्पकाराची

नको काशी, नको काबा, कशाला चर्चला जावे?
धरावे पाय आईचे, खरी ती खाण पुण्याची

विकावी लागली शेती जरी दुष्काळ पडल्याने
उसासे देत प्रत बघतो जुनेर्‍या सात-बार्‍याची

कधी व्रत मौन पाळावे, कधी जोरात भुंकावे
प्रतिक्षा खासदारांना, वरिष्ठांच्या इशार्‍याची

चला गोमास बंदी जाहली हे चांगले झाले!
कशा गाई अता जगवू? समस्या तिव्र चार्‍याची

त्वरेने घ्यावया निर्णय कि टाळायास तो बसला?
मनी हा केवढा संभ्रम! तर्‍हा बघुनी लवादाची

कुणी रडते, कुणी हसते, असू दे दु:ख वाट्याला
खरे तर जीवनी असते समस्या ही सरावाची

असे "निशिकांत"ला का वाटले वाचून घटनेला?
तुतारी बंद करतिल राज्यकर्ते रामराज्याची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Sunday, February 21, 2016

गर्तेत संकटांच्या


मी बंडखोर हसतो गर्तेत संकटांच्या
भिरकावल्यात कुबड्या जगण्यास वास्तवांच्या

अंदाज बांधता का पाहून सुरकुत्यांना ?
मी भोवर्‍यात जगलो कित्येक वादळांच्या

ना आमदार आई ना खासदार बाबा
जन्मेल काय नेता गल्लीत कस्पटांच्या?

सुटतात प्रश्न थोडे, उरतात शेकड्याने
जगण्यास अर्थ मिळतो, शोधात उत्तरांच्या

लाखो पतंग असुनी जळतेय शांत ज्योती
देते नकार विझण्या वस्तीत लंपटांच्या

सिंहासनास फुटती ज्या ज्या क्षणी धुमारे
का हाव फक्त दिसते नजरेत वारसांच्या?

गावास वेस होती, हनुमान रक्षिण्याला
गेला कुठे? न येतो मदतीस वंचितांच्या

वडिलासमान मुलगा लुटण्यास सज्ज झाला
खो खो अखंड चालू धंद्यात डॉक्टरांच्या

विश्वास ठेवल्याने विश्वासघात होतो
खेळ्या अगम्य असती "निशिकांत" आपुल्यांच्या


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com







Saturday, February 13, 2016

नभी पाखराला


उगा बंधने घालता का मनाला?
उडू ऊंच द्या ना! नभी पाखराला

कधी भेटते का गगन भूतलाला?
तरी ओढ क्षितिजा! तुझी मानवाला

सलोखा कराया अहं आड येतो
दुरावा जरी काचतो आपणाला

गळा फास बांधून मुक्ती मिळाली
किती आळवू वांझ काळ्या नभाला?

ठरवतो जमाना कसे मी जगावे
तरी दर्पणी पाहतो मी स्वतःला

कुठे शेत माझे मलाही न ठावे
तरी सात बार्‍यात नोंदी कशाला?

करायास सारथ्य घे कासरा तू
सुदर्शन नको, धीर दे अर्जुनाला

लिहू काय गाथेत मी जीवनाच्या?
घराणे न मजकूर शब्दांकण्याला

तुझी सांग "निशिकांत" व्याख्या सुखाची
"न मिळते कधी जे असोनी उशाला"


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Thursday, February 11, 2016

वेळ घालवेन मी

एकटा मजेत वेळ घालवेन मी
अंतरात चेहरा तुझा बघेन मी

सोडलेस तू मला तरी जगेन मी
आठवांत विरह दु:ख बोळवेन मी

ओठही रसाळ अन् मधाळ चेहरा
पौर्णिमा दुधाळ रोज पांघरेन मी

गंध एवढा तुझ्या रुपात दाटला!
तू फुले न माळताच दरवळेन मी

काळजात स्पंदने तुझ्याच कारणे
चालतील ती, असेन मी नसेन मी

ठेच लागते समोरच्यास, मागुनी
चाल तू हुशार हो, पुढे निघेन मी

वाटणी करूत आपुल्यात ये सखे
तू नभात नांद, तारका बघेन मी

लाभते सखीमुळेच आवसान केवढे!
देत मात अश्वमेधही करेन मी

वाटते अजून राहिले जगायचे
वाट, जन्म घेउनी, तुझी बघेन मी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1044@yahoo.com


Wednesday, January 6, 2016

बरसात भोवताली


सुकल्याच आसवांची बरसात भोवताली
समजावतो मनाला "मी मस्त भाग्यशाली"

मी धुंद फुंद जगलो हिरवळ, वसंत नसुनी
ऋतुराजची हरवली गर्विष्ठ मस्तवाली

मुर्दाड लोक असता क्रांती कशी घडावी?
गेले कुठे निखारे? विझल्या कशा मशाली?

रेंगाळलेत खटले, न्यायालयांस सांगा
प्रतिमाह वाद इतके, काढायचे निकाली

बाळास खुष कराया, खोटीच फोनवरती
दु:खी, तरी कळवतो नसतेच जी खुशाली

पाहून अंधश्रध्दा, सारे तुझे पुजारी
नावे तुझ्याच देवा! करतात रे दलाली

जातात वाममार्गे श्रीमंत ते यशस्वी
करतात सत्त्यवादी आयुष्यभर हमाली

रुजतेय संस्कृती का लोकात मुखवट्यांची?
सभ्यात, प्रश्न पडतो, दडलेत का मवाली?

"निशिकांत" गोठलेले अश्रू कसे वितळले?
जपल्यात आठवांच्या उबदारशा दुशाली


निश्कांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--nishides1944@yahoo.com