Wednesday, December 27, 2017

लिहावी शायरी


आसवांच्या गर्द शाईने लिहावी शायरी
व्यक्त व्हाया मार्ग नाही कोणताही यापरी

प्रेम विषयासक्त नव्हते राधिकेचे, पण तरी
आवडे "सा" बासरीचा, सोबतीला श्रीहरी

बांधले होते मनोरे, केवढे मी जीवनी !
फक्त नशिबी घाम होता, कुस्कराया भाकरी

"प्रेम करतो(ते) मी तुझ्यावर" एकमेकांना म्हणा
तत्क्षणी संपेल तुमच्या गैरसमजांची दरी

स्त्रीभ्रुणाला रास्त शंका, वाढता गर्भाशयी
माय मारायास उठली, काय व्हावे ससरी?

माय म्हणते लेकराला, तूच माझा दागिना!
जाहले तुझियामुळे दारिद्र्य माझे भरजरी

शेत हिरवे, राबणारे शेतमालक हरवले
गाव गेले, शहर आले, लोक करती चाकरी

मृगजळी विश्वात नक्की एवढी आहे खुबी!
फक्त भासाने जलाच्या, येत असते तरतरी

कोण अपुले? ना उमगले जीवनी "निशिकांत"ला
सांजवेळी वेदना आहे कळाले सोयरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Wednesday, December 20, 2017

पापण्यात ओलावत असतो---( जुल्काफिया गझल )


जेंव्हा जेंव्हा सुखावणार्‍या आठवणी कुरवाळत निजतो
रात्र संपता संपत नाही, पापण्यात ओलावत असतो

भयाण एकाकीपण आता सवयीचे जाहले एवढे!
उभा राहुनी आरशापुढे, मीच स्वतःशी बोलत बसतो

तुला यायचे असेल तर ये, नसेल तर तू नकोस येऊ
तू नसशिल तर अजून कोणी, प्रवास केंव्हा थांबत नसतो

मनातले, माझा कॅमेरा, टिपतो हे कळता झालेली
धडधड, तारांबळ सभ्यानो! तुमची मी वाताहत बघतो

गतकालाची वैभव स्वप्ने खाक जाहली म्हणून आता
दिवाळखोरी वर्तमानही, आनंदे गोंजारत जगतो

मिठीत कोणी, मनात कोणी गुदमर माझा मलाच ठावे
आठवणींच्या धुक्यात तुझिया, रोज रोज रेंगाळत विरतो

पान पिवळसर आहे म्हणुनी नकात हिणवू लेखणीसही
सुरकुतलेला शायर सुध्दा ओला श्रावण शिंपत फिरतो

जरी रांगडी प्रतिमा माझी बाबा म्हणुनी जगास ठावे
मेणहुनही मऊ आतुनी, अंधारी दुबळ्यागत रडतो

नकोस तू "निशिकांत" वाजवू व्यर्थ तुतारी चंगळवादी
धाव संपदेमागे तू अन्, मी अपुल्यांशी जुळवत रमतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३ 

Thursday, December 14, 2017

आहेस बहुधा---

( तरही गझल. सानी मिसरा आदरणीय गझलकार 'बेफिकीर' यांचा. )

मनाने लाघवी आहेस बहुधा
जगाला तू हवी आहेस बहुधा

नजर खिळता क्षणी अंदाज येतो
उभी तू ओणवी आहेस बहुधा

मला ग्रिष्मातुनी तू काढल्यावर
समजले पालवी आहेस बहुधा

मनाला ओलसर तू लागलेली
जुनेरी वाळवी आहेस बहुधा

तुझे बुजणे बघोनी वाटते की
घरी या तू नवी आहेस बहुधा

यमक नाही कुठे, ना वृत्त मात्रा
उद्याचा नवकवी आहेस बहुधा

मनाला वाटते तू गोड हसता
टपकती काकवी आहेस बहुधा

रियाजाने गळ्याला घडवताना
सजवली भैरवी आहेस बहुधा

कसा गंधाळतो 'निशिकांत' इतका?
कळी तू शैशवी आहेस बहुधा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Friday, November 3, 2017

गुणगुणावया गझल


झोपडीत तुजसवेच भोगलाय मी महल
लागलो तुझ्यामुळेच गुणगुणावया गझल

ब्रह्मगाठ दाबताच दूर भूत जायचे
आज जानव्या! तुझीच संपली चहल  पहल

पायपीट खूप खूप शोधण्या सुखास मी
झोपडी जुनी बघून, शोध जाहला सफल

आत्मसात तंत्र मंत्र जाहले, गझल तरी
वाटली जरी कठीण, मारलीच मी मजल

मौन आपुल्यांसवेच, काचते किती गळा!
अंतरात बघ कळेल, प्रश्न तू नि तू उकल

हात खडबडीत आज, कालच्या श्रमांमुळे
सांज पांगळी सुखात, दु:ख आठवे धवल

तोच कालचा असून, आज का नगण्य मी?
वृध्द मी स्वतःतुनीच जाहलोय बेदखल

वादळास मागतोस का भिकेत शांतता?
झुंज देउनी मिळेल, जे हवे तुला सकल

वृत्त, काफिया, रदीफ यात गुंतल्यामुळे
सूर जीवना! खरेच जाहला किती तरल!


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवराज
लगावली---गाल गाल गाल गाल-गाल गाल गाल गा

Tuesday, October 17, 2017

अशी सोच आहे


असो सावली, ऊन जगतोच आहे
सदा खुश असावे अशी सोच आहे

कशाला करावी फिकिर वादळाची?
तसा आतल्याआत खचतोच आहे

उधारीत का सुख, नि नगदीत दु:खे?
जगावे कसे? प्रश्न उरतोच आहे

जरी प्रश्नचिन्हात अस्तिस्त्व देवा
तुझी आरती रोज करतोच आहे

जुनी कागदी नाव भिजलीच नाही
तरी बालपण रोज स्मरतोच आहे

न करताच पापे घडा का भरावा?
अशी चित्रगुप्ता! मनी बोच आहे

कसा कावळा आज पिंडास शिवला?
जरी आपुल्यांच्यात फसलोच आहे

अता काय झाकू? जगापासुनी या
नको मी तसा आज दिसलोच आहे

हवे ते तसे का कधी होत नाही?
तुझे प्राक्तना खेळ बघतोच आहे

तुला एवढी काय "निशिकांत" चिंता?
प्रभू अन्न देतो जिथे चोच आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, October 15, 2017

आसवे गळती किती?


दोन पुतळे, म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू, संगमरमर आसवे गळती किती?

एक गांधी त्यात होते, सांगती दुसर्‍यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?

भोवताली मद्य विक्री मासही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? वेदना सलती किती?

देउळे, मशिदी उगा का भांडती हे ना कळे
पाठ माझे अंहिसेचे खिजउनी हसती किती?

संसदेमध्ये कशाला टांगली तसवीर हो?
भूल, थापा, घोषणांची भोवती चलती किती?

लागले अंबेडकरही दु:ख अपुले सांगण्या
खूप पुतळे गाव, शहरी, लोक ते बघती किती?

जाहलो मी अडथळा का? वर्दळीमध्ये असा
नाळ जुडलेली धुळीशी श्वास अडखळती किती?

व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते
हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती

छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी
डोंब उसळे दंगलीचा, झोपड्या जळती किती?

का मला ठाऊक नाही? कोण वापरते मला
शांत बघतो, निर्बलांना धेंड कुरतडती किती?

चल जरासे विठ्ठलासम, वीट घे! राहू उभे
निर्विकारी शांत असता लोकही भजती किती?

हे बरे "निशिकांत" केले राखला छोटेपणा
स्वर्गवासी होउनीही यातना छळती किती?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३









Tuesday, October 3, 2017

चाहुल हल्ली लागत नाही


पायामधले पैंजण आता वाजत नाही
सख्यास माझ्या चाहुल  हल्ली लागत नाही

एक जखम जी दिली सख्याने विचित्र इतकी!
खपली बसते वरून, हृदयी वाळत नाही

पूजा, अर्चा, फुले वाहता देव तुष्टतो
निर्माल्याला पण तो केंव्हा पावत नाही

जगून जीवन होरपळीचे, मृत्यू येता
सुटका झाली, अता चिताही पोळत नाही

नका न्याहळू क्षणोक्षणी मी कसा वागतो
ठेवत माझ्यावरती मीही पाळत नाही

"मागे बघुनी पुढे जायचे" कोण म्हणाले?
इतिहासाचे पान कधी मी चाळत नाही

जशी उसवली घट्ट वीण माझी माझ्याशी
भय कसलेही पैलतिराचे वाटत नाही

संसर्गाची खूप काळजी सदैव घेतो
म्हणून गझला इतरांच्या मी वाचत नाही

ध्यान असूद्या दुरावलेल्या आप्तेष्टांनो
स्पष्ट बोलतो, कधी अंतरी साचत नाही

नकोस तू "निशिकांत" घाबरू, मावळतीला
मनी रितेपण तरी उदासी मावत नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३



Friday, September 1, 2017

खाते माझ्या आयुष्याचे


पाने चाळा, असेल जर का वाचायाचे
दिवाळखोरी खाते माझ्या आयुष्याचे

सायंकाळी कशास मागे बघावयाचे?
घडून गेले जे जे होते घडावयाचे

दुर्मिळ झाली आज, तरी का कण्हावयाचे?
गोंगाटाला निरव शांतता म्हणावयाचे

पाप असो की पुण्य, जगावे मनाजोगते
कीर्तिरुपाने कुणास आहे उरावयाचे?

चिऊ शिकविते उडावयाचे, माहित असुनी
पिलास असते दूर जाउनी वसावयाचे

नको समिक्षा आयुष्याची दिशा ठरवण्या
पडावयाचे, उठावयाचे, चालायाचे

बंद घराच्या आत पोसती किती जळमटे !
दार मनाचे जरा किलकिले उघडायाचे

बहारायची आस केवढी मनात असते !
स्वप्न मनी निर्माल्याच्याही फुलावयाचे

कुणास तू "निशिकांत" शोधसी अंतक्षणाला?
गूढ प्रवासी तुलाच आहे निघावयाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Monday, August 7, 2017

निर्झरावी शायरी


दु:ख का सांगावयाला पहिजे पारावरी?
व्यक्त व्हाया आसवांची निर्झरावी शायरी

सर्व सुखसोयी, सुबत्ता नांदती ज्या ज्या घरी
वानवा संभाषणाची, टोच असते अंतरी

का दवंडी व्यर्थ पिटता नार रात्री बाटली
तो गुन्हा लपवीत दिवसा सांगतो ज्ञानेश्वरी

व्हायचे ते जाहले, विसरून चल जाऊ पुढे
दोष माझा की तुझा, चर्चा करू केंव्हा तरी

भोगला वनवास ज्यांनी राम नसुनी जन्मभर
तीच जनता रावणांना सोसते नानापरी

आय जुजबी, पण तरी चैनीत नेते राहती
थाट त्यांचा चालतो आहे कसा वरच्यावरी

वाहते आतूरतेने ध्येय, सरिता, ठेउनी
पण तिचे असणेच मिटते, आहुतीने सागरी

गुंफली शब्दात माझ्या जीवनाची मी कथा
वाचकांना वाटले आहे जणू कादंबरी

का असे "निशिकांत"ला द्यावेस परतीचे तिकिट?
सांग देवा ना तिथी ना वेळ आहे ज्यावरी


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, August 1, 2017

अधूर्‍या कैक स्वप्नांचा


मनी जोपासला होता थवा लाखो इराद्यांचा
प्रवासी का तरी झालो अधूर्‍या कैक स्वप्नांचा ?

जरी भोगून झाली सर्व दु:खे सात जन्मांची
सदा कबरीत का असतो तरी वावर उसास्यांचा?

किती अंधार बघुनी शोधली जागा लपायाला!
कवडसा आठवांचा दावतो आलेख शल्यांचा

मना मारून जगलो, मीच जुळते घेत सर्वांशी
कसा सोडू थवा हा स्वार्थसाधू सर्व आप्तांचा?

जसा झालो तसा झालो, शिकायत ना कधी केली
घडवले मीच मजला, दोष नाही भाग्यरेषांचा

मला जग चांगले म्हणते, मनी पण शल्य कायमचे
प्रयत्ने लपविला इतिहास आहे कृष्णकृत्त्यांचा

पुरेसा काजवा होतो कराया दूर तिमिराला
मनी अंधारल्यावर लागतो कस कैक सुर्यांचा

जरी निष्पर्ण आहे वृक्ष वठलेला, कधी काळी
स्वतःची देत छाया, लाडका होता प्रवाशांचा

अनाथाचेच जगणे, ना कुठे घर चार भिंतींचे
निवारा भेटला "निशिकांत"ला मक्त्यात गझलांच्या


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, July 14, 2017

पुन्हा नव्याने फुलून आलो---

(तरही. मतल्यातील सानी मिसरा गझलकार श्री भूषण कटककर--"बेफिकीर" यांचा. )

विरान रस्ता, रटाळ जीवन असेच कांही जगून आलो
नशा गझलची जशी कळाली, पुन्हा नव्याने फुलून आलो

जळावयाला तयार असते शमा बिचारी मुशायर्‍यातिल
तृषा तिची चांगल्या गझलची, जरा जरा शांतवून आलो

घडायचे ते घडून जाते, नशीब हाती कधीच नसते
करू नये त्या किती अपेक्षा! मनी निराशा, हरून आलो

घरास अंगण अता न उरले, कुठे न दिसती फुले सुगंधी
तिला सजवण्या निलांबरातिल मुठीत तारे भरून आलो

तशी खरे तर मरावयाची मनात इच्छा असून सुध्दा
असून नसल्यासमान खडतर जगावयाचे शिकून आलो

कधी विठू धावलास वेगे, असे न घडले तरी परंतू
तुझी पताका धरून हाती, पवित्र वारी करून आलो

अतीत माझे विचित्र होते, कळून आले वळून बघता
नवे उसासे जुनाट कबरीमधे जरा दाखवून आलो

कशास नाते विणावयाचे? गळ्यास धागे करकचणारे
पुढे नि मागे कुणीच नसते, उतार येता खचून आलो

कशास "निशिकांत" धाव घेशी उन्हाकडे सावली त्यजूनी
भणंग म्हणतो उन्हातही मी, भिजावयाचे म्हणून आलो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३










Tuesday, June 27, 2017

रंग भरले आजवर


प्रक्तनाने वार केले, घाव अजुनी ओलसर
मीच संसारात सारे रंग भरले आजवर

स्वप्न होते पाहिले मी मृगजळांचे जन्मभर
वेदनांनी आजही पण सोडला नाही पदर

कष्ट करुनी पूर्ण थकते,चैन ना रात्रीसही
वाट बघतो तो तिची अन् देह शैय्येला हजर

सागराशी भेटण्याला वाहती सार्‍या नद्या
हरवते अस्तित्व, त्यांना ही कुठे असते खबर?

वाकुनी चढता यशाच्या टेकड्या कौतुक किती!
उतरताना ताठ असुनी, सुरकुत्यांची ना कदर

भक्तिभावाचा भुकेला तो नसावा वाटते
विठ्ठलाशी जाहली नाही कधी नजरानजर

सोडताना काळजी घ्या आपुल्या पाउलखुणा
खोडण्या इतिहास नाही या जगी कुठले रबर

एवढे आम्ही उभयता कालचे आहोत की;
आत्मवृत्ताला मुले म्हणतात थेट्टेने बखर

आपले असतात अपुले वाटते "निशिकांत" का?
पोंचण्याआधीच तू, का खोदली त्यांनी कबर?


निशिकांत देशपांडे.मोक्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, June 22, 2017

घेउन येते ओला श्रावण


नसताना ती शुष्क जीवनी रखरखलेपण
येते तेंव्हा घेउन येते ओला श्रावण

जरा तुझी चाहूल लागता आठवातुनी
रोमांचांना फुलावयाची आस विलक्षण

तुलाच ठावे अमाप माझ्या दु:खावरती
कसे करावे आनंदाचे प्रत्त्यारोपण

विशेषता अपुल्या नात्याची अशी असे की,
वीण असोनी जुनी, कुठेही नाही उसवण

तू आल्याने मीपण माझे निघून गेले
दुजा भाव गेला अन् उरले फक्त समर्पण

सर्व चांगले अनुभवलेले नोंद करू या
दु:ख भोगले त्याचे आता नको समिक्षण

अंतरात मी बघता दिसतो तुझाच वावर
अशक्य आहे करणे आता आत्मनिरिक्षण

कधीच नसते सत्वपरिक्षा प्रेमामध्ये
काकण हातीचे बघण्याला कशास दर्पण?

मनी कसा "निशिकांत" नांदतो वसंत अजुनी?
कलंदराला वावर्धक्याचे नसते दडपण


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Sunday, June 4, 2017

एकदा माझ्या घरी


विनवण्या केल्या किती नानापरी?
या सुखांनो एकदा माझ्या घरी

वस्त्र विरले जीवनाचे, काल जे
खूप शोभीवंत होते भरजरी

गतसुखांनो दावता का वाकुल्या?
आठवांनीही दिवाळी साजरी

पोळते संभाषणांची वानवा
संस्कृती नवखी, विना श्रावणसरी

चाल आभासी जगाची वेगळी
येथ येते मृगजळांनी तरतरी

तंग कपडे, ना पदर ना ओढणी
लुप्त झाली आज राधा बावरी

सोडवावे तूच प्रश्नांना तुझ्या
का विसंबावे उगा देवावरी?

एक ठिणगी पेटवायाला पुरे
ज्ञात असुनी पाडली का बाबरी?

हौस नाही बंगल्याची या जिवा
पामरा दे मंदिराची पायरी

बोलण्याने दूर गेले आप्तही
चांगला "निशिकांत" हो तू वैखरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Thursday, June 1, 2017

तुझ्या आत आहे

झुकावे असे काय दगडात आहे?
तुझा देव मित्रा तुझ्या आत आहे

हरी पावतो संकटी भक्त  असता
असे फक्त लिहिले पुराणात आहे

उधारीत सुख आणि नगदीत दु:खे
प्रभूही हिशोबात निष्णात आहे

खुले दार, खिडक्या, हवा खेळते पण
किती कुंद गुदमर उसास्यात आहे!

कसेही असूद्या खुराडे घराचे
समाधान तिथल्या उबार्‍यात आहे

न कचरा न प्लॅस्टिक, हवा शुध्द जेथे
असे गाव कुठल्या नकाशात आहे?

मना वाटते संपवावीच यात्रा
कुठे राम उरला विरामात आहे?

जरी पोट भरतोस सांगून भाकित
उद्या का स्वतःचा तुला ज्ञात आहे?

कुणाला खबर कोण "निशिकांत" कुठला?
तरी गुंफतो नाव मक्त्यात आहे


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३


Wednesday, March 22, 2017

अदलाबदल


झोपडीचे स्वप्न होते, भोगतो आहे महल
भाग्यरेषांची कुणी केली अशी अदलाबदल?

सत्यवादी मी इरादे व्यक्त केले ज्या क्षणी
राज्यकर्त्यांनी समूहातून केले बेदखल

वाहुनी येतात खळखळ वेदना माझ्याकडे
राहतो मी ज्या ठिकाणी, भाग तो आहे सखल

कष्ट करतो वेगळा पण, सातबारावर तरी
शेत नाही पाहिले त्या मालकाचा का अमल?

काल मी होतो कुठे अन् आज मी आहे कुठे?
प्रश्न पडतो जीवनाची योजिली कोणी सहल?

भोगुनी लाखो सुखांना, दु:ख जेंव्हा भेटते
वाटते सारेच जीवन का असे झाले विफल?

गोठलेले भाव जेंव्हा वाहती डोळ्यातुनी
नेमकी साकारते कलमेतुनी माझ्या गझल

क्लेशदायी एकटेपण सांजवेळी टाळण्या
जीवघेण्या आठवांना लागते द्यावी बगल

उत्तरे ना गावल्याचे शल्य का "निशिकांत"ला?
होत असते का कधी सार्‍याच प्रश्नांची उकल?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३