Tuesday, April 26, 2022

मैफिल सरता सरता


उत्तररात्री सूर लागला मैफिल सरता सरता

शेवटचे क्षण आयुष्याचे हसेन जगता जगता


वेळ कधी का मागे जाते? प्रवास करते पुढचा

मीच कशाला दु:ख आठवू? आज मितीला नसता


सर्वाचे मी जरी फेडले ऋण पैसा अन् पैसा

हिशोब आईच्या देण्याचा कसा करावा चुकता?


आनंदाश्रू माय ढाळते, बाळ प्रथम उडताना

बाळ न येता जीवन सरते अश्रू पुसता पुसता


बनवायाची पक्वान्नाचे जेवण माय खुशीने

चितळेंचा* शिरकाव जाहला घरात बघता बघता


असून नास्तिक, गुडघ्याच्या व्याधीने आस्तिक झालो

आठवतो मी परमेशाला सदैव उठता बसता


जन्मावेळी नकोनकोशी, हवी हवीशी नंतर

उपभोगाचे साधन झाली विना शिकायत करता


बघावयाला वळून मागे कांही घडले नाही

अंधाराचा एक कवडसा विरला दिसता दिसता


कसा तुला "निशिकांत" कळेना हिशोब इतका साधा?

ओलावा दु:खाचा दे तू, अश्रू गळता गळता



*पुण्यातील प्रसिध्द मिठाईवाले



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--लवंगलता

मात्रा--८+८+८+४=२८ 



Tuesday, April 19, 2022

खंतवजा तक्रार कशाला?

लग्नाविन मस्तीत नांदलो, खंतवजा तक्रार कशाला?

उभार गेला तारुण्याचा, हवा मनी झंकार कशाला?


वर्दळ ज्यांची खूप मंदिरी, याचकांस त्या देव पावतो

ईशकृपेचा भक्त भुकेला, अन्य हवा सत्कार कशाला?


सासू म्हणते मला वाटते सूनही जणू लेक पोटची

मुलगी निघता तिच्या सासरी, निर्झरतो मल्हार कशाला?


या गावाहुन त्या गावाला भटाकायाचे पोट भराया

नवीन गावी तरी चौकशी "आहे का सोनार?" कशाला


सामान्याचे दु:ख मांडण्या माणुसकीची टोच असावी

वृत्त, काफिया, अलामतीचा व्यर्थ हवा भडिमार कशाला?


दान, धर्म, सत्कर्मे केली, सुखी व्हावया पुढील जन्मी

नगदीमध्ये पुण्य ईश्वरा, उधारीत उध्दार कशाला?


"सन्मार्गी लागले सुधारुन" बाल कथांचे सार असावे

पुराणातल्या कथेत असतो दैत्यांचा संहार कशाला?


नवजीवन अन् नवीन मुल्यें किती बदलली बघता बघता

पाप किती मग्रूर जाहले! पुण्य असे लाचार कशाला?


जसे हवे मी तसेच जगलो, खंत न  उरली "निशिकांता"ला

जगेन चुचकारत आयुष्या, शेवटास एल्गार कशाला?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३ 

वृत्त--वनहरिणी

मात्रा--८+८=८=८=३२