Tuesday, February 25, 2014

हळवा सूर आहे


सोडलेला गाव माझा दूर आहे
लागली हळव्या मना हुरहूर आहे

टेकड्या शहरातल्या हरवून गेल्या
लॉन टिचभर वाटते भरपूर आहे

झोपडीतुन भूक जळते; गोपुरी पण
नांदतो का सोनियाचा धूर आहे?

धूप, चंदन. तेल, काजळ बंद झाले
राखण्या सौंदर्य डव, संतूर आहे

जाहिराती केवढ्या! लपवावयाला
वास्तवाचे चित्र जे भेसूर आहे

वाटते नेत्यांस, आहे शांत जनता !
अंतरी आक्रोशते काहूर आहे

"टाक मत झोळीत" म्हणती सर्व नेते
भीक ग्रहणी मागणे मंजूर आहे

लाचखोरी अश्वमेधाला निघाली
अश्व त्यांचा दौडतो चौखूर आहे

गीत गा "निशिकांत" अंती ईश्वराचे
लागलेला आर्त हळवा सूर आहे


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yqhoo.com



Monday, February 24, 2014

नको तेच आठवते


स्मृतिपटलावर वार्धक्याच्या वेदनाच वावरते
सर्व चांगले विसरुन जाते, नको तेच आठवते

लिहून नुसते भाकरीवरी पोट कधी का भरते?
विद्रोही कविता का लिलया जळत्या भुकेत फुलते?

श्रीमंतांच्या श्वानांनाही खाद्य चांगले मिळते
मुले कुपोषित गरिबांची का? शल्य मनाला छळते

नको पसारा वृत्त, काफिया, लगावली, मात्रांचा
नवकवितेची आशयघनता छंद नसोनी भिडते

काळी लैला का आवडली? मजनूला ते ठावे
तर्क लढवुनी आपण म्हणतो "प्रेम आंधळे असते"

गातो कोकिळ तरी कोकिळा भाव खाउनी जाते
"गान कोकिळा" शब्द कसा मग? विचारायचे नसते

घरात एका अनेक भिंती नात्यानात्यांमधल्या
तिर्‍हाइतासम सर्व नांदती, कोण कुणाला पुसते?

दिली मनीची कपार ओली सखीस माझ्या ह्रदयी
तिथे न बसता बनून श्रावण गझलेतुन रिमझिमते

ताक फुंकुनी पी "निशिकांता" जगात वावरताना
सभ्य मुखवट्याआड श्वापदे लपल्याचे जाणवते


निशिकांत देशपांडे.मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Friday, February 21, 2014

जागायचे कसे?


स्वप्ने अजून बाकी जागायचे कसे?
झोपून रात्र सारी निभवायचे कसे?

मार्गात चालताना हातात हात अपुले
स्वर्थाविना स्वतःला जगवायचे कसे?

स्वप्ने मला उद्याची मृगजळ तरंग झाली
त्या ऊंच अंगुरांना तोडायचे कसे?

भ्रमरास रात्र होता कमळात कैद असते
मधुगंध वेडियाला उठवायचे कसे?

त्या धुंदफुंद रात्री बाहूत चंद्रतारे
दिवसा पुन्हा पुन्हा ते मागायचे कसे?

बोलत असेल सारे जग आपुलीच भाषा
दारास कान लावुन ऐकायचे कसे?

आयुष्य आजवरचे गगनात ऊंच गेले
संधी प्रकाश आला चालायचे कसे?

दरवळ अनेक आता इतिहास आज झाले
दोघे मिळून ठरवू वागायचे कसे?

"निशिकांत" काल होते ते आज सत्य आहे
पळण्या अधी शिकावे रांगायचे कसे?


निशिकांत देशपांडे.मो.के. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Tuesday, February 11, 2014

स्वप्न गुलाबी पडण्यासाठी


जीव तोडुनी राबराबलो जगण्यासाठी
थकून निजलो स्वप्न गुलाबी पडण्यासाठी

शक्य नसे ते करण्यामध्ये झींग आगळी
मृगजळ पुढती, मागे पळतो भिजण्यासाठी

आनंदी क्षण बघता बघता विरून जाती
दु:ख नेहमी कवेत असते धरण्यासाठी

माफक आशा मनात रुजली, शिक्षणातुनी
ज्ञानसाधना हवी नोकरी मिळण्यासाठी

अंधाराला आमंत्रण का उजेड देई?
काय चांगले जगात उरले बघण्यासाठी?

पदर ढाळला का तो ढळला? या शंकेने
अतूर झाले सभ्य मुखवटे गळण्यासाठी

लहान मास्यांनाही ठावे भविष्य त्यांचे
टपून बसले मोठे मासे गिळण्यासाठी

कसे कायदे करती नेते स्वार्थापोटी !
पळवाटांचा सुकाळ, पाणी मुरण्यासाठी

"आम आदमी" अभिमन्यूचा शिष्य असावा
चक्रव्युहाला भेदलेस तू, सरण्यासाठी

"निशिकांता" का हातमिळवणी  काळोखाशी?
करतो आहे पूर्व तयारी विझण्यासाठी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, February 1, 2014

अंकूर एक फुटला


ओसाड भूप्रदेशी अंकूर एक फुटला
येथे कसे जगावे? तो काळजीत दिसला

जे जे समोर येते सोसायचे खुशीने
दिसला जगी कुणी का? मर्जीनुसार जगला

नवख्या पिढीतल्यांनो स्वप्ने बघा हवी ती
सल्ला उगीच देणे वृध्दास छंद जडला

कोर्टात न्याय मिळण्या इतका उशीर झाला !
मरणोपरांत माझा भांड्यात जीव पडला

इतकी कपार ओली! ह्रदयातली जिच्या, ती
आई असेल बहुधा अंदाज सत्य ठरला

मंडीत मुखवट्यांचा भारी उठाव आहे
ईमान कोण घेतो? बाजारभाव घटला

रडकी असून सूरत हसतेय प्रेत त्याचे
खुश तो जगावयाच्या शापामधून सुटला

मुद्यावरून गुद्दे हे राजरोस झाले
फुटतात टोल नाके, दाखल उगाच खटला

"निशिकांत" साकडे तू घालू नकोस देवा
पुरवून मागण्या तो नक्की असेल विटला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com