माझ्या सभोवताली जो तो त्रयस्थ आहे
कोषात बंद जगण्या जो तो व्रतस्थ आहे
बोलू नये कुणाशी संकेत आज इथला
शेजार धर्म गेला होऊन अस्त आहे
संकूल मम घराचे वस्ती हजार आहे
येथे स्मशान शांती घालीत गस्त आहे
संवाद, हास्य नसता सांगा कसे जगावे ?
जो तो मुकेपणाने दिसतोय त्रस्त आहे
संकेत लिफ्ट मधला पंख्याकडे बघावे
परिचय नको म्हणूनी करतो शिकस्त आहे
जाणीव, कळवळा हे नाहीत शब्द येथे
रुतबा, अमीर असणे याचेच प्रस्थ आहे
मदतीस धावता मी तोडून कायद्याला
हिणवून सर्व म्हणती मी "एड ग्रस्त" आहे
फुरसत कुणास आहे ? देण्या मृतास खांदा
म्हणुनीच "स्वर्ग रथ" हा पर्याय मस्त आहे
"निशिकांत" सोड इथले श्रीमंत ते खुराडे
खळखळ हसून बोलू जग हे प्रशस्त आहे.
निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
e Mail:-- nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा
No comments:
Post a Comment