Thursday, January 26, 2012

मी वाजवू कशाला?

माझी जगात टिमकी मी वाजवू कशाला?
अंधार मस्त, दिवटी मी पेटवू कशाला?

आयुष्य घेतले मी देवाकडून उसणे
मग मालकी तयावर मी दाखवू कशाला?

बोलून आपुल्यांशी वाटे मनास हलके
डोळ्यात आसवांना मी साठवू कशाला?

देऊन लाख जखमा गेली कधी न कळले
खपली निघेल! तिजला मी आठवू कशाला?

जाणून पायरी मी जगणे जगात शिकलो
वेड्या मनास माझ्या मी नाचवू कशाला?

गळताच पान पिकले नवपर्ण जन्म घेती
वृध्दास प्रश्न का मग "मी मालवू कशाला?"

ठेवून भान जगता मज यातनाच होती
बेधुंद पीत जगणे मी थांबवू कशाला?

"पक्षात आमुच्या या" आली निमंत्रणे पण
माझ्या पवित्र देहा मी बाटवू कशाला?

"निशिकांत" स्वागताला हो सज्ज नवपिढीच्या
गत काळच्या सुरांना मी आळवू कशाला?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment