Saturday, October 19, 2013

ओरडावे लागते (तरही )


शस्त्रसंधी जर हवी तर युध्द व्हावे लागते
"शांतता पाळा" असे का ओरडावे लागते?

दानपेटीतून ईश्वर राव लोका पावतो
आम जनतेलाच खडतर तप करावे लागते

सूर दोघांचा न जमता नांदले एकत्र का?
संस्कृती आहे अशी की गुदमरावे लागते

संपला वनवास जेंव्हा, राम करतो राज्य अन्
जानकीला अग्निदिव्यातून जावे लागते

हे धनाढ्यांनो ! सुखाची जाणण्या किंमत खरी
वेदना अन् आसवांना अनुभवावे लागते

कष्ट करुनी दुर्बलांनी गाठता उंची जरा
टेकडीला त्या हिमालय नाव द्यावे लागते

भंग करण्या तप ऋषीचे मेनकेला धाडले
आज विश्वामित्र कसले ! स्त्रीस भ्यावे लागते

का टिका प्रस्थापितांनो बोचरी करता अशी?
शायराला नवशिक्या समजून घ्यावे लागते

का अशा "निशिकांत" ताना आर्त शेवटच्या क्षणी?
देव पावो वा न पावो आळवावे लागते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides144@yahoo.com



No comments:

Post a Comment