Sunday, November 3, 2013

बहरायला सुरवात केली ( तरही )


दरवळाने मुग्धतेवर मात केली
तू कधी बहरायला सुरवात केली?

मी तुला माझी खुशी निर्यात केली
वेदना तू धाडल्या, आयात केली

लावली कुलुपे घराला, आत मी पण
तू मनाची लूट हातोहात केली

जाणले श्वसात तुजविन अर्थ नाही
जीवनाची सांगता प्याल्यात केली

"आम जनतेचे भले"  हा देत नारा
राज्यकर्त्यांनीच वाताहात केली

स्थान इतिहासात नाही मज म्हणोनी
नोंद नावाची गझल मक्त्यात केली

थुंकलो तोंडावरी प्रस्थापितांच्या
बंडखोरीची जरा रुजुवात केली

जो बळी तो कान पळतो सत्त्य हे पण
व्यर्थ मी तक्रार दरबारात केली

शांतता "निशिकांत"ला कोठे मिळेना
सोय त्याची शेवटी थडग्यात केली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




No comments:

Post a Comment