Sunday, August 31, 2014

वेळ यावी लागते


काळ आला पण तरीही वेळ यावी लागते
काळही मजबूर आहे, वेळ हेही जाणते

का चुनावाच्या अधी नेतृत्व फसवे वाकते?
एकदा निवडून येता, जात ही उंडारते

राहिले फेडावयाचे पाप गतजन्मातले
संकटांची आज गर्दी, कर्ज वापस मागते

आठवाया काल आहे अन् उद्या योजावया
वास्तवाशी आज जुळणे नाळ अवघड वाटते

कालमहिमा एवढाकी कालची तरुणी अता
झाकण्या वय, सुरकुत्यांना केवढी श्रंगारते!

पापक्षालन आपुले आपण करावे, पण तरी
माणसांची जात का गंगेस कोडे घालते ?

काळ घेतो का परिक्षा कास्तकारांची अशी?
शेत असते कंच हिरवे, तर कधी भेगाळते

जे प्रवाही नांदले ते जिंकले असले तरी
कालओघाच्या विरोधी  हार, विजयी भासते

ठेपला येऊन मृत्त्यू पण तरी "निशिकांत"च्या
श्रावणाचे स्वप्न नेत्री का असे रेंगाळते?


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com








Tuesday, August 19, 2014

सापडलेल्या उत्तरातही


प्रश्नच होते सापडलेल्या उत्तरातही
गुंता सारा जीवनातही, काळजातही

अत्म्यांमध्ये देव नांदतो, खरे तरी पण
अता श्वापदे जंगालातली माणसातही

कथनी, करनी मेळ न खाते वाचाळांची
म्हणून हल्ली राम न उरला प्रवचनातही

अन्नसुरक्षा फक्त मिळाली कागदावरी
निलाजरेपण! शासन करते जाहिरातही

जीवन इतके बत्तर जगलो, आर्त उसासे
ऐकू येती स्मशानातल्या गोवर्‍यातही

धोपट मार्गी सदा चालणे बंद करावे
वृक्ष सरळ तो अधी कापती जंगलातही

प्रेमसरी आईच्या सोडुन, बाकी सार्‍या
सोय पाहुनी झरझर झरती, आटतातही

स्वर्थासाठी दंगल करवुन आग लावती
श्रेय लुटाया संधी दिसते, विझवण्यातही

वीण एवढी घट्ट मनाची, पण ती येता
"निशिकांता"ला मजा वाटते उसवण्यातही


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, August 15, 2014

जाहलेला अस्त आहे


राज्यकर्त्या कौरवांचे मस्त आहे
पांडवांचा जाहलेला अस्त आहे

राजकारण खेळणारा बाप ज्याचा
त्या मुलाचा मार्गही आश्वस्त आहे

लोक मोठे वेळ देती व्यग्र असुनी
काम नसणारेच म्हणती "व्यस्त आहे"

तू दिलेल्या आठवांचा त्रास इतका!
नेहमी एकलपणाने ग्रस्त आहे

शेत राखायास मी खुद लावलेल्या
कुंपणाने पीक केले फस्त आहे

लक्तरांनी वेष्टलेला मी दरिद्री
शासनाच्या धोरणांचा दस्त आहे

पीडितांची कड कुणीही घेत नाही
सोय जो तो पाहुनी नेमस्त आहे

पापक्षालन जी करी सार्‍या जगाचे
तीच गंगा गंदगीने त्रस्त आहे

काळजी "निशिकांत"ची का व्यर्थ करता
जाहला केंव्हाच तो उध्वस्त आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, August 7, 2014

निर्माल्य होउन जायचे


का कुणासाठी उगा उमलायचे?
अन् उद्या निर्माल्य होउन जायचे

बंद ज्येष्ठांनो करा सांगायचे
येथुनी पुढती अता ऐकायचे

कासरा हाती दिला आहे तुझ्या
दावल्या वाटेवरी चालायचे

अंध प्रेमाची मजा लुटल्यावरी
व्यर्थ का डोळे अता उघडायचे?

लावला कबरीवरी कोणी दिवा?
चाहुलीने आत झंकारायचे

तत्व तुमचे का कुणावर लादता?
वागतिल ज्यांना जसे वागायचे

जे मना पटते तसे वागावया
लोक म्हणतिल काय हे विसरायाचे

खोदली मोठी कबर माझ्या मनी
आठवांचे खोल क्षण दफनायचे

तंत्र हे कोणी दिले "निशिकांत"ला?
दु:ख, आनंदे कसे सोसायचे


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, August 6, 2014

नुसत्याच चर्चा वादळी

 प्रश्न असुनी एवढे का लुप्त झाल्या चळवळी
चालती टीव्हीवरी नुसत्याच चर्चा वादळी

लाख ह्रदयीच्या कपारी, एक नाही मोकळी
साफ मी करतोच आहे आठवांच्या अडगळी

शोधता दिसला तुला का भक्त एखादा तरी?
माय अंबे, पोट भरण्या कैक झाले गोंधळी

नेसुनी साडी जरीची, दोन वेण्या घालता
मॉड पोरींना दिसे ती एक काकू वेंधळी

मारणार्‍या शिक्षकांनी घडवली अमुची पिढी
आत ते मउशार, वरचा पोत होता कातळी

ऐकली कोल्हेकुई पण लक्ष ना तिकडे दिले
रूढवाद्यांच्या मते मी क्रांतिकारी, वादळी

जा तुला जर जायचे तर, वायदा माझा तुला
मोकळी ठेवीन ह्रदयी जीवघेणी पोकळी

शुभ्र कपडे, हास्य ओठी अन् तरी नेते असे
चेहर्‍यावर भारताच्या फासती का काजळी?

वेग पाण्याचा बघोनी थांबसी "निशिकांत" का?
खळखळाटाच्या नदीला खोल नसते पातळी


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com