नको चर्चा कुणाचा धर्म आहे चांगला याची
छळोनी माणसांना वाहवा का धर्मग्रंथाची?
उगा गुरुमंत्र का घ्यावा? कशाला दक्षिणा द्यावी?
तुझे तू भाग्य बनवाया छनी घे शिल्पकाराची
नको काशी, नको काबा, कशाला चर्चला जावे?
धरावे पाय आईचे, खरी ती खाण पुण्याची
विकावी लागली शेती जरी दुष्काळ पडल्याने
उसासे देत प्रत बघतो जुनेर्या सात-बार्याची
कधी व्रत मौन पाळावे, कधी जोरात भुंकावे
प्रतिक्षा खासदारांना, वरिष्ठांच्या इशार्याची
चला गोमास बंदी जाहली हे चांगले झाले!
कशा गाई अता जगवू? समस्या तिव्र चार्याची
त्वरेने घ्यावया निर्णय कि टाळायास तो बसला?
मनी हा केवढा संभ्रम! तर्हा बघुनी लवादाची
कुणी रडते, कुणी हसते, असू दे दु:ख वाट्याला
खरे तर जीवनी असते समस्या ही सरावाची
असे "निशिकांत"ला का वाटले वाचून घटनेला?
तुतारी बंद करतिल राज्यकर्ते रामराज्याची
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment