मृगजळामागे पळालो पाय थकले शेवटी
सर्व गेले वंचनांचे झुंड उरले शेवटी
द्यावया खांदा न कोणी, प्रेत यात्रा संपल्या
शोधली शववाहिका अन् प्रश्न सुटले शेवटी
त्रासुनी देवा असा का माणसांना झुकवसी?
फक्त तू शरणागतांचा, हे उमगले शेवटी
घातल्या खेपा हजारो, तारखावर तारखा
लाच आहूतीत देता, काम जमले शेवटी
चूक झाली, पाय वळले नेमके शहराकडे
एकटा गर्दीत येथे, गाव स्मरले शेवटी
चंद्र का देतो समुद्राला अशी हुलकावणी?
सागराचे एकतर्फी प्रेम ठरले शेवटी
भोगलेले दु:ख होते सोबती अंतःक्षणी
आठवावे चांगले ते का विसरले शेवटी?
घेतली आरामखुर्ची सांज येता जीवनी
वेदनांनी कातळालाही हरवले शेवाटी
भक्तिमार्गी जायचे ठरवूनही "निशिकांत"ला
सोडवेना मोहमाया, श्वास सरले शेवटी
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment