Sunday, October 7, 2018

बदलायला नको का?


( तरही गझल. मतल्याचा सानी मिसरा प्रसिध्द गझलकार श्री भूषण कटककर "बेफिकीर" यांचा. )

तिज दार मंदिराचे उघडायला नको का?
काळानुसार आपण बदलायला नको का?

पत्नीमुळेच दरवळ अन् जीवनात हिरवळ
हे गूज लाडकीला सांगायला नको का?

लिहिण्या जहाल वास्तव काव्यातुनी कवींनी
प्राजक्त, प्रेम, तारे वगळायला नको का?

जर भेटले कुणी तर, का मख्ख लिफ्ट मध्ये?
पंख्याकडेच बघता, बोलायला नको का?

बाजार मांडलेला ज्यांनी रुढी, प्रथांचा
त्यांना विवस्त्र करुनी मिरवायला नको का?

जो चेहरेच दावी, लपवीत वास्तवाला
तो आरसा कधी तर भंगायला नको का?

म्हणतील काय सारे, याची सदैव चिंता
अपुल्या मनाप्रमाणे, बहकायला नको का?

बस एक बाळ झाले, माता पित्यास वाटे
भाऊ, बहीण दुसरी खेळायला नको का?

"निशिकांत" प्राक्तनाला ललकारुनी जगावे
मानेवरील जोखड फेकायला नको का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, October 5, 2018

एकलेपण सोसले


माणसे जोडावयाचे स्वप्न माझे भंगले
भोवती गर्दी असोनी एकलेपण सोसले

आदिमाया, आदिशक्ती फक्त लिहिण्या, वाचण्या
चौकटी करुनी प्रथांच्या आत स्त्रीला डांबले

मी नियोजनबध्द जगलो, ठरवुनी पण ईश्वरा!
का तिकिट परतावयाचे तारखेविन छापले?

चंद्र शीतळ पण सखीच्या आठवाने कैकदा
वाढली तगमग, पिठोरी चांदणेही पोळले

शेतमजुरांच्या ललाटी फक्त असते राबणे
सात बारावर कधी ना नाव त्याचे लागले

जिंकण्याची शतपटीने वाढते तेंव्हा मजा
हार झालेली बघाया लोक असता थांबले

का कुणी धरतो अबोला चार भिंतीशी कधी?
सुरकुत्यांनी कोपर्‍यांशी फक्त नाते ठेवले

पाप-पुण्याची न धास्ती नास्तिकांना वाटते
तेच चिंताग्रस्त जे जे मंदिरी भक्ताळले

वावडे "निशिकांत" आहे का सुखांचे एवढे?
दु:ख माझ्या अंगणी मनसोक्त होते नांदले


निशिकांत देशपांडे. मो,क्र. ९८९०७ ९९०२३