Monday, January 17, 2022

काय करावे?

 

अशाश्वतावर लोक भाळले, काय करावे?

चंगळवादी विश्व जाहले, काय करावे?


मनी आडवी आली अन् अपशकून झाला!

म्हणून पुढचे काम थांबले, काय करावे?


शेतकरी पण फसले पाहुन नभ वांझोटे 

कैक मोरही नाचनाचले, काय करावे?


वार जाहले पाठीवरती, वळून बघता

आपुलेच ते सारे दिसले, काय करावे?


विठू! सोडली आर्धी वारी आणि परतलो

तुझे रूप भक्तात भेटले, काय करावे?


ढासळत्या मुल्ल्यांना बघतो निमूट हल्ली

आक्रोशाचे पर्व संपले, काय करावे?


धर्माचे ते प्रतीक असुनी, पाच जणांनी

पणास तिजला तरी लावले, काय करावे?


सोडुन आलो अंगण अन् चौसोपी वाडा

मुलांस कबुतरखाने रुचले, काय करावे?


भयाण शांती तुझ्या घरी " निशिकांत" अशी का?

मुलांविना संभाषण सरले, काय करावे?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--अनलज्वाला

मात्रा--८+८+८=२४

No comments:

Post a Comment