निर्जळी आहे असे सांगून आलो
अन् गरीबीला जरा झाकून आलो
व्हायचे ते होत असते पण तरीही
भिक्षुकांना कुंडली दावून आलो
यत्न करुनी गावले नाही कुठेही
शोध क्षितिजाचा जगी घेऊन आलो
शांत जगणे जाहले कंटाळवाणे
आरशासी शेवटी भांडून आलो
ना दिसे ईमान कोठे औषधाला
राज्यकर्त्यांशी जरा जुळवून आलो
चालकांना मंदिरांच्या, मस्जिदीच्या
दे सुबुध्दी नेहमी प्रार्थून आलो
ध्यास होता पाडसांना पाहण्याचा
भेटलो अन् आतुनी उसवून आलो
का असे मृत्त्यूस भीता पामरांनो?
परतुनी जाण्यास तर जन्मून आलो
भक्तिमार्गी काय तू " निशिकांत" केले?
विठ्ठलाशी तार मी जुळवून आलो
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागाX३