Monday, May 16, 2022

ओझरते बघताना

 

यत्न करोनी मनास भक्ती मार्गाला नेताना

शहारलो पण आज सखीला ओझरते बघताना


नकोनकोशी जरी वाटली जन्म तिचा होताना

बांध फुटे का अश्रूंचा ती सासरास निघताना?


वेग वाढतो सायंकाळी घराकडे जाताना

मूर्तिमंत मी प्रेम पाहिले धेनू हंबरताना


अंगत पंगत सुखदु:खाची केली होती आम्ही

झरझरतो का श्रावण नेत्री सारे आठवताना?


हात टेकले देवा पुढती नतमस्तकही झालो

जन्म संपला! कधी न दिसला प्रसन्न तो होताना


सुद्राक्षाची  माळ घतली, टिळा लावला भाळी

पुण्य कशाचे! खळगी भरली ढोंग सोंग करताना


असाल मोठे! बडेजाव का उगा मिरवशी मित्रा? 

दिवाही तसा मोठा होतो, क्षणेक मालवताना


मुल्यांकनही होते कोठे अंतरजालावरती?

फेसबुकवरी फक्त अंगठे! थकतो मी बघताना


डोळे का "निशिकांत" जाहले ओले अंत क्षणाला?

हास्य असू दे ओठावरती पुनर्जन्म घेताना



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. नं. ९८९०७ ९९०२३

वृत्त--लवंगलता

मात्रा--८+८+८+४=२८

No comments:

Post a Comment