रक्तामधली साखर खाली उतरत नाही
यत्न करोनी जिभेवरी ती फिरकत नाही
जुनीच पध्दत शासकीय कामाची आहे
चिरीमिरीविन कागद पुढती सरकत नाही
काळा पैसा अमाप झाला जिकडे तिकडे
शुभ्र तोकड्या धनास आता बरकत नाही
देव तेहतिस कोटी होते असे सांगती
पुन्हा व्हावया सेन्सस त्यांची, हरकत नाही
गळ्यात माळा रुद्राक्षांच्या, भस्म कपाळी
उगाच कोणी फुले कुणावर उधळत नाही
ओघळणार्या आसवासही तिने रोखले
शल्य मनीचे कधी कुणाला सांगत नाही
आप्तांसाठी जगावयाचे जरी ठरवले
आपुल्यातल्या आज कुणाची सोबत नाही
जरी पेरले क्रत्रिम नभ, अन् भरून आले
मोर तरीही पंख पसरुनी नाचत नाही
काय हवे "निशिकांत" यत्न कर मिळवायाचा
जीवन म्हणजे आत्मसुखाची पंगत नाही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८ =२४