Friday, July 15, 2022

बरे वाटते

 

आठवणींनी मनास माझ्या बरे वाटते

तुझ्या संगती मृगजळातही पाणी मिळते


तारेवरती पोर चिमुरडी उड्या मारते

मला वाटते, तिला न भीती कधी वाटते


असे दबदबा ज्यांचा त्यांचे राज्य संपले

या घटनेवर कोणी रडते कोणी हसते


क्षितिजावरती आपण नांदू वचन दिले पण

कळेचना आकाश धरेला कुठे भेटते


लक्ष ठेवती राजकारणी एक दुज्यावर

कोण कुणाला कधी, कसे अन् कुठे बोलते


दारांना अन् खिडक्यांनाही पडदे आले

कळू मये नेमके कुणाला काय चालते


"मुलगा माझा परदेशी" ही शान संपली

सायंकाळी एकलपण हे अपार छळते


वादावरती पडदा त्यांच्या जरी टाकला

तडजोडीने मनातले का द्वंद्व संपते?


घाल अता "निशिकांत" गवसणी आभाळाला

कोषामध्ये चित्त तुझे का वेड्या रमते?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. नं. ९८९०७ ९९०२३.

वृत्त--अनलज्वाला

मात्रा--८+८+८=२४


No comments:

Post a Comment