चंद्र होता दावला कोणी तरी
खायला होती हवी पण भाकरी
भाळली कृष्णावरी ती जेवढी
आवडे तितकीच त्याची बासरी
पाचवीला पूजलेली वेदना
वाटते आहे जणू ती सोयरी
मी पुणेरी सांगतो मोठेपणा
फ्लॅट जेथे, कालची ती धायरी
वयपरत्वे छंद असती वेगळे
नाव लिहिले तिजसवे रेतीवरी
राज्य आले पँटचे अन् ड्रेसचे
हरवली पदरारूनी कोयरी
सार माझ्या जीवनाचे हेच की
फक्त पोटाचीच केली चाकरी
आणता गजरा फुलांचा एकदा
गंधाळुनी ती रात्र झाली साजरी
वाटते "निशिकांत"लाही हायसे
फक्त स्वप्नी ती कधी आली जरी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. नं. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मेनका
लगावली--गालगागा X २+ गालगा
No comments:
Post a Comment