Wednesday, October 27, 2010

आसवांना गाळले

शुद्ध अन बावनकशी मी आसवांना गाळले
मी कसोटीवर तयांना घासले अजमावले

आसवांच्या दागिन्यांची मांडली आरास मी
शेकडो आले बघाया अंतरी झंकारले

वस्त्र माझ्या जीवनाचे आज दिसते शुभ्र का ?
डाग हटवादी सुखाचे आसवांनी काढले

बोलबाला आसवांचा जाहला इतका जगी
वळचणीमध्ये सुखाचे श्वासही मंदावले

या सुखांनो या बघाया थाट माझा जीवनी
राव मुठभर, तेच डबके विश्व तुमचे जाहले

द्रॉपदी, सीता, अहिल्या आसवांना पुरविती
शायरांनी स्त्रीभ्रुणाचे दुःखही कुरवाळले

फाटले आकाश वरती मी कशाला घाबरू ?
काळजी वाटे तयांना जे सुखी उंडारले

आसवे आपोशनाला आसवे चित्रावती
आसवे नॅवेद्य सुद्धा देव ही वॅतागले

आज का "निशिकांत" तुजला राव येउन भेटले?
आसवांचे चार वरवे आज त्यांनी लावले

निशिकांत देशपांडे मों, न. ९८९०७ ९९०२३
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा

Sunday, October 24, 2010

मी जरा धास्तावलो

सोवळे ना पाळले मी सदगुणावर भाळलो
कर्मकाण्डाला बघूनी मी जरा धास्तावलो

हम करेसो कायदा ही धर्म व्याख्या जाहली
तालिबानी नाच नंगा पाहता पाणावलो

चार बाबा मॉलवींना हक्क तो कोणी दिला ?
फैसले ऐकून त्यांचे मी जरा चक्रावलो

धर्म कोणी जाणला का ? अर्थ कोणा समजला ?
पाहता त्यांच्या लढाया अंतरी रक्ताळलो

स्त्रीस देवी मानती अन स्त्री भ्रुणाला मारती
कोंडती बुरख्यात का हे मी कधी ना समजलो

प्रेम अथवा लग्न करण्या का हव्या पंचायती ?
मूग गिळती राज्यकर्ते मी मनी चॉताळलो

नरबळी हुंडाबळीने रान का ना पेटले ?
षंढ या वस्तीत मी ही शांत आहे झोपलो

वाघ वाघाशी न भांडे धर्म नाही त्या जगी
जन्म घेउन माणसाचा मी आहे पस्तावलो

शायराला राग इतका शोभतो "निशिकांत"का ?
कागदाचा वाघ आहे मीच मज ना भावलो

निशिकांत देशपांडे मों. न. ९८९०७ ९९०२
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा

Monday, October 18, 2010

चेहरा तसवीर होता

नोट:- या गजलेतील पहिली ओळ गजलकार सुरेश भटांच्या गजलेच्या मतल्याची पहिली ओळ आहे


ऍन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता
भोगल्या लाखो व्यथांचा चेहरा तसवीर होता

प्रेम गाणे गावयाचे वय तयाचे पण तरीही
शख्स तो मशिदीत गेला सांगण्या तकरीर होता

कष्ट केल्याविन कधी का भाग्य खुलते माणसाचे ?
ना कुणी आला जगी या घेउनी तकदीर होता

धुंद जगणे अन् बिघडणे शाप हा नवख्या पिढीला
स्पष्ट माझा तो इशारा वाटला किरकीर होता

मी विदर्भाला निघालो तीर्थ पावन क्षेत्र बघण्या
चालवी "आनंद वन" जो तोच हाजी पीर होता

विश्व सारे हिंडल्यावर उमगले मजला असे की
खान होता सर्व साक्षी तर कुठे जसबीर होता

सभ्य तो रुद्राक्षधारी रात्र मयखान्यात काढी
त्या पुजा-याचा ठिकाना गावचे मंदीर होता

पाक देशी राज्य आहे पक्षपाती कायद्यांचे
ज्यास छळले त्रासले तो एक मोहाजीर होता

शोध घे "निशिकांत" आता मर्द कणखर चेह-यांचा
मर्द कसले ! मारलेला तो नथीतुन तीर होता

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo,com
प्रतिसादाची प्रतिक्षा

Saturday, October 16, 2010

आल्यावरती

दुःखच दिसले जगती जन्मून आल्यावरती
माझे घर अश्रूच्या बहत्या नाल्यावरती

शेणा मधले दाणे धुतले ढेकर आली
दुष्काळी तर जगतो आम्ही पाल्यावरती

अपमनाचे जीवन होते त्याचे इतके
लपला कबरीखाली , जगणे झाल्यावरती

स्वार्था साठी प्रेम करावे न्याय जगीचा
गायीलाही हिरवा चारा व्याल्यावरती

इतके पीतो लाज न उरली आता कसली
नाव लिही तू माझे साकी प्याल्यावरती

भटकून वळले सन्मार्गी जे मुजरा त्यांना
राम दिसेना श्रद्धा ज्यांची वाल्यावरती

गोपीमध्ये विश्व बुडाले कृष्ण हरवला
नजर कुणाची गोपाळांच्या काल्यावरती ?

आज शरीयत अमलाखाली अबला रडती
सुटका बघती त्या दगडांच्या घाल्यावरती

"निशिकांताला" आज कळाले जगता जगता
प्रेम करावे हातावरच्या छाल्यावरती

निशिकंत देष्पांडे मों. न. ९८९०७ ९९०२३
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा

Saturday, October 9, 2010

ओळखीचे वाटले

पॅंजणाचे वाजणे मज ओळखीचे वाटले
वायदा तू तोडणे मज ओळखीचे वाटले

मोगरा फुलला असावा सांगतो मज गारवा
मंद तव गंधाळणे मज ओळखीचे वाटले

रंग चढला मॅफिलीला धुंद मी असलो तरी
चेह-याला झाकणे तव ओळखीचे वाटले

माझिया गजलेस गाता भाववश होणे तुझे
दोन अष्रू ढाळणे मज ओळखीचे वाटले

फूल हसरे तू, परंतू राहसी काट्यात का?
रोज काटे बोचणे मज ओळखीचे वाटले

मखमली नाते जिव्हाळा भूतकाळी हरवले
रेशमाचे काचणे मज ओळखीचे वाटले

मांड सारीपाट आता सोंगट्या खेळू जरा
कटघरी तू मारणे मज ओळखीचे वाटले

काळीमा प्रेमास कोणी फासली ते सांग ना?
प्रश्न अवघड टाळणे मज ओळखीचे वाटले

वाटते "निशिकांत" लज्जा प्रेम बोलुन दावण्या
मॉन ओठी पाळणे मज ओळखीचे वाटले

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

Tuesday, October 5, 2010

मीच मज ना गवसलो

मान तू वेळावली अन् त्या क्षणी मी हरवलो
हरवलो इतका असा की मीच मज ना गवसलो

ब्रह्मकमळासम तुझे ते एक रात्री उमलणे
भास्कराला वाटले का मी प्रभाती उगवलो

तुजविना अंधार सारा सापडेना झोप ही
एकलेपण मी उशाला घेतले अन् पहुडलो

चांदणे जेंव्हा झिरपते याद येते मज तुझी
आठवांच्या वादळाशी नेहमी मी झगडलो

दोष हा माझाच आहे मी न ओळखले तुला
काय समजू मी तुला जर मीच मज ना समजलो

मज नको प्याल्यात मदिरा दु:ख आहे ओतले
दु:ख पीता लोक म्हणती मी जरासा बहकलो

सांग सटवाई कशाला भाग्य लिहिण्याला हवी?
कष्ट माझे हात माझे मी असा हा उमललो

सावलीला काल होतो राज्यकर्त्यांच्या जरा
सभ्यतेचा मार्ग माझा वाटले मी विसरलो

जा गडे "निशिकांत" मज तू जाणले नाही कधी!
चोपड्या या बोलण्याने जीवनी मी घसरलो

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

Monday, October 4, 2010

छाया मावळतीची

छाया माझ्या मावळतीची सांगत आहे
"लांब जरी मी तुजला आता सोडत आहे"

मावळतीला मुजरा करणे रीत नसावी
परमेश्वरही पूर्व दिशेला पावत आहे

खांद्यावर माझ्या गठोडे वॅफल्याचे
त्यातच दुख-या आठवणींना शोधत आहे

हिरवा मी बहरात असेतो झाड सजवले
पिकली पाने झाडच खाली फेकत आहे

ताज्या ताज्या सर्व फुलांचा दरवळ गेला
निर्माल्याचे जीवन जगणे शाश्वत आहे

एका जाणे एका उरणे अटळ जरी हे
एकांताची चाहूल मजला काचत आहे

घुसळण करता आयुष्याची झाल्या जखमा
दु:ख पचवणे लटके हसणे आदत आहे

गोंधळ का मी मांडत आहे व्रध्दत्वाचा?
संकट हरिणी तूच जगाची जाणत आहे

ओले डोळे सांज सकाळी का "निशिकांता"?
वाढुन आले ताट जसे ती दावत आहे

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail. nishides1944@yahoo.co
प्रतिसादाची प्रतिक्षा