Friday, January 11, 2013
नेमका शुध्दीत मी
दु:ख विसरायास असतो पीत मी
आज आहे नेमका शुध्दीत मी
व्यर्थ आलो उच्चभ्रू वस्तीत मी
वाढलो चाळीमधे मस्तीत मी
तू जशा लिहिल्यास गजला त्या क्षणी
कैद झालो वाळल्या शाईत मी
दे सखे मिसरा तुझ्या गजलेतला
एकटेपण घालविन तरहीत मी
हात तू हातात देवुन बघ जरा
साथ देणे जाणतो यारीत मी
काय पाहुन पावला ईश्वर मला
काढले होते मला मोडीत मी
दु:ख हसण्याआड लपवावे, जुनी
यत्न करुनी पाळतो ही रीत मी
का भुतावळ घालते घिरट्या अशी?
घातले त्यांना कधी ना शीत मी
शल्य "निशिकांता"स भौतिक या जगी
चाललो नाही कधी वारीत मी
निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment