Wednesday, April 23, 2014

इभ्रतीची लक्तरे


काय लपवायास उरले? वापरू का चेहरे?
चावडीवर टांगलेली इभ्रतीची लक्तरे

चेहरा डागाळलेला, आरसा पुसतो तरी
सत्त्य लपलेले प्रकटता, का भरावे कापरे?

जीत माझी ! हारल्यावर पोषणाचा दोष तो
मायबापांच्याच माथी फोडता का खापरे?

वाकली पेलून जनता यक्षप्रश्नांना शिरी
गोठल्या नजरा बघोनी मृगजळी सत्तांतरे

का अपेक्षा बाळगावी? मार्ग दावावा कुणी
निर्मितो प्रश्नास अन् मी शोधतोही उत्तरे

का उद्याच्या काळजीने "आज" गमवावा उगा?
सांजवेळी काळजीविन शांत निजती पाखरे

कायदा फसवा करोनी हक्क अन्नाचा दिला
तरतुदीतुन चोर खाती तूप, साखर, खोबरे

शोधता आदर्श विभुती, भेटला अंधार का?
पुस्ताकातिल माणसांची तळपली संवत्सरे

वेदनांशी गाढ मैत्री केवढी "निशिकांत"ची?
पाहुनी दु:खोत्सवाला, लोक म्हणती "बाप रे!"


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, April 19, 2014

उत्सव करावा वेदनांचा


साजरा उत्सव करावा वेदनांचा
मार्ग चालावा खुशीने कंटकांचा

दूर जाणे आपुल्यांचे पचवले मी
कीस पाडावा उगा का कारणांचा?

दु:ख वठल्याचे कधी झाडास नव्हते
खिन्न गेल्याने थवा तो पाखरांचा

स्वप्न जो बघतो तयाला ध्येय दिसते
का करावा रोज पिच्छा मृगजळांचा?

चांगले क्षण कोंदले ह्रदयात माझ्या
वाचतो केंव्हा न पाढा वंचनांचा

भेदरावे का तिने गर्दीत दिवसा?
त्रास आहे माणसातिल श्वापदांचा

जो बळी तो कान पिळतो, न्याय इथला
रान पेटेना, जमाना भेकडांचा

देह केला दान मी का? काय सांगू?
खर्च कोणा परवडेना लाकडांचा

गुंतणे "निशिकांत"ला जमले न केंव्हा
प्रेमही व्यवहार येथे बेरजांचा


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, April 17, 2014

जाहला अतिरेक आहे


जीवनी नाना कळांचा जाहला अतिरेक आहे
ठसठशीला थांबवाया, वेदनांचा शेक आहे

श्रीगणेशालाच अश्रू दु:ख येता का गळावे?
भोगले तो खेळ नाही, फक्त नाणेफेक आहे

सभ्यतेच्या मुखवट्याला सोडता सारे म्हणाले
आज जो पदभ्रष्ट दिसतो, कालचा तो नेक आहे

आगतिकता माणसाला कुरतडोनी षंढ करते
मी जरी स्थितप्रज्ञ दिसतो, अंतरी उद्रेक आहे

काय म्हणतिल लोक याची काळजी मी सोडल्याने
कोंडलेला श्वास आता मोकळा एकेक आहे

पीक का आश्वासनांचे पाच सालाबाद येते?
कार्यवाहीची न चर्चा, फक्त फेकाफेक आहे

पाहिले लाखो लुटारू अन् लुटारूंचे लुटारू
पक्ष त्यांचे वेगळे पण ध्येय "चरणे" एक आहे

माय ल्योकाची शिजेना दाळ हल्ली फारशी अन्
राजकारण सावराया येत घरची लेक आहे***

चीड "निशिकांता"स आहे राज्यकर्त्या श्वापदांची
लाळघोट्यांचा तयांना रोजचा अभिषेक आहे


***हा शेर सध्याची राजकीय परिस्थिती सांगणारा आहे. माझा इशारा कोणाकडे आहे हे सूज्ञ श्रोत्यांनी ओळखून घ्यावे.


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com







Wednesday, April 16, 2014

व्हायचे होऊन गेले


कोण डोकाऊन गेले?
आत गंधाळून गेले

फक्त भासाने सखीच्या
चांदणे बरसून गेले

पैंजणाच्या चाहुलीने
अंग रोमांचून गेले

एकट्या वेड्या मनाला
स्वप्न चुचकारून गेले

काचणार्‍या काळजाला
कोण झंकारून गेले?

आपुले जे काल होते
आज का टाळून गेले?

आठवांचे झुंड सारे
एकदम सोडून गेले

वास्तवाच्या वेष्टनावर
लोक का भुरळून गेले?

का असे "निशिकांत" अश्रू?
व्हायचे होऊन गेले


निशिकांत देशपांडे.मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, April 15, 2014

मी सरणारा नाही


खेळ जीवना खेळ तुझे , मी घाबरणारा नाही
संकटातही उरेन पुरुनी, मी सरणारा नाही

खाचा, खळगे, अंथर काटे जीवनमार्गी माझ्या
ध्येयदिशेने चालत असतो, मी थकणारा नाही

आयुष्याचे ओझे पेलत आनंदाने जगतो
भार तुझा तू टाक जीवना, मी झुकणारा नाही

घाव छनीचे मीच मारतो भाग्य घडवण्या माझे
जन्मकुंडली, ग्रहतार्‍यांना मी बघणारा नाही

गाज भयंकर, असो त्सुनामी सागरास मी भिडतो
घेत काळजी किनार्‍यावरी वावरणारा नाही

मैफिल माझी, गायन माझे, सूर, सुरावट माझी
साथ द्यावया सारंगी मी वाजवणारा नाही

शाश्वत असती फक्त वेदना, मैत्री त्यांच्यासंगे
क्षणभंगुरशा सुखात केंव्हा मी रमणारा नाही

तू पारांगत जरी जीवना द्यूत खेळण्यामधला
मीच जिंकतो, कधी हारता डगमगणारा नाही

"निशिकांता"ची जिद्द केवढी! पुढे पुढे जाण्याची
समोरच्याला ठेच, शहाणा मी बनणारा नाही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com






Saturday, April 5, 2014

पडझड झाली


बघता बघता आयुष्याची पडझड झाली
उरलेली का वाट एवढी अवघड झाली?

पांथस्थांचा वृक्षतळीचा वावर सरला
जशी हरवली छाया जेंव्हा पतझड झाली

भेट न होता श्रावण गेले कैक कोरडे
आठवणींची पुरचुंडीही अवजड झाली

शब्द पडू तू दिलास नव्हता खाली केंव्हा
कुजबुज माझी आज तुला का बडबड झाली?

सोडलीस तू साथ होवुनी निर्विकार, पण
माझ्या ह्रदयी ठोके चुकले, धडधड झाली

नको उधारी, नकोच आता हिशोब कसले
सैल केवढी आपुल्यातली सांगड झाली !

तारेवरची कसरत असते जीवन जगणे
पाय कुठे अन् कसा घसरला ! गडबड झाली

नेत्यासम ढग करून गेले फक्त वल्गना
टिपूस ना पाण्याचा, नुसती गडगड झाली

घरचे सोडुन, नवीन कुरणे चरता चरता
"निशिकांता"च्या आयुष्याची परवड झाली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Thursday, April 3, 2014

अवघड असते


दार मनाचे बंद ठेवणे अवघड  असते
कुणी आपुले नसता जगणे अवघड असते

रोज मुखवटे वेगवेगळे लावुन जगता
आरशासही सत्त्य उमगणे अवघड असते

लाख करू दे कैद पापण्यामधे तरीही
निरोप घेता ना ओघळणे अवघड असते

हवे नको ते आत्मचरित्री ठरवुन लिहिता
वास्तवदर्शी चित्र रंगणे अवघड असते

सॉक्रेटिसचे निर्मणुष्य बेटावर जगणे
वाचायाला मस्त, भोगणे अवघड असते

शब्द बेगडी भुरळ पाडती जिवास इतकी!
काय चालले मनात कळणे अवघड असते

डेरेदाखल जरी जाहल्या पुन्हा वेदना
हसत जगावे, सदैव रडणे अवघड असते

निवडणुकांचे घमासान चालू असताना
कोण मित्र, शत्रू ओळखणे अवघड असते

बोट मधाचे, जाहिरनामे भुरळ घालती
पिऊन मृगजळ तहान शमणे अवघड असते

गेल्यावरती सखी कळाले "निशिकांता"ला
मनास हळ्व्या किती रिझवणे अवघड असते


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com