Wednesday, February 5, 2020

तिथे नाव नव्हते

तिथे नाव नव्हते

नकाशात माझे कुठे गाव नव्हते
हरवले असे की तिथे नाव नव्हते

गिळायास खेडे शहर काय आले!
जमीनी वगळता चढे भाव नव्हते

मुलांना वरण भात अन् तूप पोळी
पिझा, कोक, बर्गर, वडा पाव नव्हते

जसा पोंचलो आश्रमी दर्शनाला
दिसायास साधू, कुणी साव नव्हते

गरीबीत संस्कार श्रीमंत झाले
बरे जाहले भोवती राव नव्हते

सुखे राहिलो सर्व एकत्र आम्ही
दिले आपुल्यांनी कधी घाव नव्हते

भरायास खळगी शरीरास विकले
लगट साजरी पण मनी भाव नव्हते

कुठे हार अन् जीत आप्तात असते?
यशास्तव कधी खेळले डाव नव्हते

जरी प्राक्तनी भोग "निशिकांत" होते
पुढे चालणे भाग, घुमजाव नव्हते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment