Wednesday, March 4, 2020

चंद्र आणिक चांदण्यांची

चंद्र आणिक चांदण्यांची

लागता चाहूल तिचिया पैंजणांची
रात्र झाली चंद्र आणिक चांदण्यांची

थांबता घरट्यातली किलबिल पिलांची
जाहली बरसात होती आसवांची

बोळवण केली खुशीने मी सुखांची
प्राक्तनाने भेट देता वेदनांची

व्हायचे वाईट ते होऊन गेले
काळजी आता कशाला संकटांची

निर्भयाची वाचली जी डायरी मी
नोंद होती त्यात नुसत्या वादळांची

लागल्या जर का स्त्रिया बोलावयाला
चेहरे पडतील उघडी लंपटांची

एक दावा सर्व गरजा भागलेला
भीक मागे सूर्यही पण सावल्यांची

भेटता वृध्दाश्रमीच्या अश्रितांना
ऐकली होती कहाणी ओघळांची

जोड तू "निशिकांत"नाते ईश्वराशी
सोड गर्दी भोवतीच्या माणसांची


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३





No comments:

Post a Comment