Tuesday, September 14, 2021

तरी का प्राक्तनाने डांबले आहे?

 

जरी मी कर्ज सारे फेडले आहे

तरी का प्राक्तनाने डांबले आहे?


नको मुक्ती, प्रभो तू येरझारा दे

खरे सुख आपुल्यातच लाभले आहे


नमस्कारास माझ्या पात्र दु:खी ते

जयांनी हास्य ओठी गोंदले आहे


खयाली आवडे का एवढी दुनिया?

नकोसे आज वास्तव जाहले आहे


मृतात्मे का असे मुक्तीविना फिरती?

मुलांचे प्रेम त्यांना बाधले आहे


जरा मतभेद टाळा, भांडल्याने का

कुणाचे जाहलेले चांगले आहे?


नेहमी व्यक्त झाल्यावर कळाले की

मनाचे दु:ख हलके जाहले आहे


सदा मक्त्यात मी, गझलेत ती असते

असे असणेच आम्हा भावले आहे


नको "निशिकांत" दगदग सांजवेळेला

मनी जे ध्येय होते, गाठले आहे



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वृत्त--प्रसूनांगी

लगावली--ल्गागागा X ३

No comments:

Post a Comment