वाट बघुनी शेवटी क्रत्रिम ढगांना पेरले
पाहुनी नकली ढगांना, मोर फसुनी नाचले
सासरा सासूस होते ईश्वरासम मानले
देव आला भेटण्या पण ते मला ना पावले
भोवताली केवढा तो आपुल्यांचा घोळका!
एकट्याला सांजवेळी कालच्यांनी सोडले
"दे हरी बाजेवरी" का नव पिढीला सांगता?
कष्ट ना करताच देवाला नवस मी बोलले
पुस्तकीच्या थोर विभुती आज ना दिसती कुठे?
नोंद इतिहासात करण्या ना कुणीही गावले
डायरी लिहिता उमजले "काय लिहिण्या सारखे"?
तेच ते आयुष्य जगलो आणि जगणे संपले
का उगा खुनशीपणा नात्यात दोघांच्या असा?
गौण असतो प्रश्न येथे कोण आधी बोलले
कागदाची नाव होती सोडली मी तुजसवे
ती न आली जीवनी, मृगजळ तरी का भावले
आरशासी बोलणे "निशिकांत" आता बंद कर
वास्तवाला आतल्या त्याने कधी ना दावले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवप्रिया
लगावली--(गालगागा) X३+ गालगा