बरोबर चालले होते
कुणी आले कुणी गेले, बरोबर चालले थोडे
म्हणावे आपले ज्यांना , तसेही भेटले थोडे
हुशारी पाहुनी हल्ली मुलांची, खंत जाणवते
जन्मलो का अधी इतका? मनाला वाटले थोडे
मुलांना पोसण्याची एकमार्गी वाट नसल्याने
कधी रागावलो त्यांना, कधी चुचकारले थोडे
उशाला घेतली होती चवड मी कैक स्वप्नांची
कवडसे त्यात जगण्याचे अचानक गावले थोडे
मिळाले काम सरकारी म्हणोनी नाटके केली
बदलली जात केंव्हा तर, कमी वय दावले थोडे
कुणी वंदा कुणी निंंदा मनाला हे शिकवल्याने
खुशी होती जरी मी शोधलेले शिंपले थोडे
कशाला एवढी धडपड उगा काळ्या धनासाठी
कमवले भारकाभर, त्यातले पण भोगले थोडे
नभांना पाहुनी काळ्या , जरी ते शुष्क वांझोटे
बिचारे मोर हर्षाने तरीही नाचले थोडे
जरी "निशिकांत"ला फसवून गेले आपले सारे
कसा असतो जगाचा न्याय हेही समजले थोडे
निशिकांत देशपांडे,पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X ३
No comments:
Post a Comment