Saturday, June 18, 2022

भाग्याच्या वलयात

 भाग्याच्या वलयात जगावे, पटले नाही

तेलाच्या घाण्यात फिरावे, जमले नाही


मिटल्या डोळ्यावरती जेव्हा ओठ टेकले

स्वप्ना मध्ये स्वप्न कसे हे? कळले नाही


शहारलेली काया आता कुठे हरवली?

बधीरतेचे पांघरूण पण हटले नाही


हातामध्ये हात धरोनी चालत असता

भान जगाचे आणि आपुले उरले नाही


जरी कालचे विसरायाचा निश्चय केला

मनातली जळमटे हटवणे जमले नाही


भाग्यालाही भाग्य न कळले, गूढ एवढे!

तरी कुंडली वाचत जगणे सुटले नाही


"निशिकांता"च्या प्रेमाचे वैशिष्ट्य असे की

जरी दुरावा, कुणी कुणावर रुसले नाही




निशिकांत देशपांडे, पुणे.


No comments:

Post a Comment