प्राक्तनी नसली जरी ती पोर्णिमा रेखूत का?
आवसेला पांढरासा रंग चल देऊत का /
का उगा कष्टी असावे? साथ दु:खाची सदा
वाहू दे डोळ्यास, ओठी हास्य चल फुलवूत का?
गोठले आयुष्य सारे थंड निपचित देह हा
उष्ण झरत्या आसवांचा शेक चल घेऊत का?
भोवती सारेच दिसती कोळसे काळे किती?
त्या मधे चमचम चमकत्या हिरकण्या शोधूत का?
आरसा भेसूर वास्तव का जगाला दावतो?
झूठ पण मंगल जरासे दावण्या शिकऊत का?
ही कशी श्रीमंत वस्ती? राहती बहिरे मुके
चौकटीना किलबिलीची तोरणे बांधूत का?
भात पिठले भाकरीचा स्वाद झाला पारखा
उच्चभ्रू झालोत आपण चल पिझा खाऊत का?
धर्मभास्कर सांगती हो पारदर्शी मानवा
बिन्ग फुटता एक त्यांचे उखडले ताबूत का?
भूक करवी आत्महत्त्या राज्यकर्त्यांचा गुन्हा
रक्तरंजित हात त्यांचे राहिले शाबूत का?
आयचा घो या जगाच्या वार दिधले मज किती?
चल जगूनी गारद्यांचे मनसुबे उधळूत का?
सोड तू "निशिकांत" चिंता काय म्हणते जग तुला
बेरका हो या जगाला वाकुल्या दाऊत का?
निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail nishides1944@yqhoo.com
प्रतीसादाची प्रतिक्षा
http://nsd-marathigazals.blogspot.com/
No comments:
Post a Comment