Thursday, August 26, 2010

म्रुत (MRUT) जनानी घेरले

का इथे पडलोय सांगा? का उगी मज गाडले?
शेकडो दिसतात कबरी म्रुत (MRUT) जनानी घेरले
या तुम्हाला दावतो मी शील ते थडग्यातले
अश्लिलाने जिंदगीभर खूप त्याला झोडले
एक थडगे स्त्री भ्रुणाचे रोज भरती त्यामधे
जीव जे मेले कुणाचे जाहले ना लाडले
रामशास्त्री आजचे बघ पहुडले कबरीत त्या
राज्यकर्त्यांनी तयांचे सत्य खोटे पाडले
धाडसी ती पत्रकारी छपली लफडी किती !
मान त्यांचा छान केला स्वर्गलोकी धाडले
सत्य झाले पोरके का? ना कळे सत्यास ही
सत्यवचने छापलेल्या कागदांना फाडले
तो रडे कबरीत सुद्धा दु:ख त्याचे वेगळे
पोटच्यांनी बंध सारे का तटातट तोडले
संपता सत्संग केले तोंड काळे तिजसवे
सावलीनेही तयाच्या भय मनीचे वाढले
मायही आता नकोशी जाहली आहे जगा
ती म्हणाली "हाय सुटले" प्राण जेव्हा सोडले
पुण्य घाली मान खाली पाप ते सिंहासनी
पुण्यवंतांचे जगाने भाव खाली पाडले
अंध हो "निशिकान्त" जगती काय बघण्या सारखे?
वस्त्र अपुल्या कंबरेचे माणसाने फेडले

निशिकांत देशपान्डे मो.नं. 98907 99023
E MAIL: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

No comments:

Post a Comment