Friday, May 27, 2016

बोथट सुखाची धार आहे


मागणी दु:खास हल्ली फार आहे
जाहली बोथट सुखाची धार आहे

घे परिक्षा, दु:ख दे वाटेल तितके
कोण करते वेदने! तक्रार आहे

ठीक आहे! तारका देईन म्हणतो
पण खरे तर प्रेमही व्यवहार आहे

उच्चभ्रू वस्तीत नांदे संपदा पण
शांत झोपेचीच मारामार आहे

संपले शिक्षण, न दिसती भव्य स्वप्ने
खानदानी "नोकरी" संस्कार आहे

गर्व तेजाचा दिव्या! करतोस का तू?
नांदतो खाली तुझ्या अंधार आहे

बांधुनी भिंती मनाला कोंडले पण
चाहूलीने पाडले खिंडार आहे

माय गेली टाकुनी, त्या बालकाला
न्याय देणारा कुठे दरबार आहे?

धिंड का "निशिकांत" निघते सदगुणांची?
दुर्गुणी सिंहासनी सरकार आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment