Saturday, June 11, 2016

दोघांनीही प्रवास केला


रेल्वे पटरी समान होता दोघांनीही प्रवास केला
एकच रस्ता तरी कुणी ना जवळ यायचा प्रयास केला

सोबत असुनी, दोन किनारे जणू नदीचे वेगवेगळे
तरी उभयता सांगत असतो "प्रपंच आम्ही झकास केला"

सर्वांपेक्षा ऊंच असावे या जिद्दीने उडता उडता
मित्र न उरती शिखरावरती, तरी वाटते विकास केला

कणा असोनी झुकावयाचे विनम्र धोरण होते माझे
कायरता माझ्यात असावी, सहकार्‍यांनी कयास केला

नसून पाउस मृदुगंधाची झुळूक आली कशी? जाणण्या
ओघळणार्‍या आसवात भिजली धरती का? तपास केला

कशास खाते सुखदु:खाचे लिहावयाचे अंतक्षणाला?
जे जे जगलो त्यास म्हणावे "बेफिकिरीने विलास केला"

तुझाच वावर जागोजागी सखे पाहतो डायरीत मी
रेघ मारुनी उभी लिहाया माझ्याविषयी, समास केला

समाजाविना जगावयाचे पोकळीत का जमले असते?
म्हणून जळण्याअधी चितेवर सलाम सार्‍या जगास केला

कुणी नसे "निशिकांत" भोवती, कोसतोस का व्यर्थ स्वतःला?
काल माणसे जोडायाचा यत्न वेडसर कशास केला?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment