Friday, August 6, 2010

शब्द तू जुळवून दे

तान माझी हरवलेली तू जरा शोधून दे
गीत मी आता विसरलो शब्द तू जुळवून दे
लय हरवली तार तुटली मूक वीणा जाहली
छेडण्या झंकार ह्रदयी तार तू जोडून दे
जळमटे ही आठवांची अडकलो मी का असा?
छानशी स्वप्ने उद्याची तू मला दावून दे
पाहिले मजला न कोणी मी तळागाळातला
काढण्या चिखलातुनी मज हात तू वाकून दे
सावल्यांचा खेळ खेळू मी न शकलो जीवनी
ऊन का राशीत माझ्या? कुंडली बदलून दे
ताट माझे का रिकामे? भूक पोटी पेटली
दु:खही चालेल मजला तू जरा वाढून दे
देवही विटला असावा पाहतो ना मजकडे
तूच आळव त्यास आता दु:ख मम सांगून दे
मी असा हा बहकलेला लत नशेची ना सुटे
सावरावे तूच मजला आसरा बाहूत दे
पिंड शिवण्या कावळाही येत का नाही इथे?
पाचवीला दु:ख माझ्या जा मला सोडून दे
गर्द अंधारात जगलो पाहिले ना कवडसे
एकदा कबरीवरी मम दीप तू लावून दे
लेखणी "निशिकांत" का रे दु:ख इतके ओतते?
चांगल्या हसर-या जगाशी ओळखी करवून दे

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

1 comment: