Monday, June 25, 2012

कपात माझ्या

वादळ आले आणी विरले कपात माझ्या
कधीच धडधड झाली नाही उरात माझ्या

तुझा हात हातातुन सुटता अजब जाहले
काळ थांबला सरकत नाही घरात माझ्या

कांगारूसम पोटी धरुनी वाढवले पण
दूर जायची आस जागली पिलात माझ्या

खळे संपले तसे उडाले पक्षी सारे
अता सुनेपण वस्तीला वावरात माझ्या

कलियूगी पण दशरथ दिसती पुत्रवियोगी
दु:ख जयांचे लिहितो मी अक्षरात माझ्या

आनंदाने श्रोते देती टाळ्या जेंव्हा
दु:ख मनीचे फुलून येते सुरात माझ्या

भाव घालती आभाळाला जरी गवसणी
रोज गिरावट होतच असते दरात माझ्या

उजाड कोठी, रोज मैफिली, मुजरे, गाणे
हमिदाबाई जुनीच ताजी मनात माझ्या

चारोळ्या अन् नवकाव्याची अशी सुनामी!
कोण वाचतो सुमार गजला जगात माझ्या

"निशिकांता"विन अंधारातच मीही जगले
चंद्र तारका कधीच नव्हत्या नभात माझ्या

निशिकांत देशपांडे मो. क्र ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment