जगावे हास्य लेऊनी, कुणा का दु:ख सांगावे?
जगी या वेष्टनाच्या मी, कसे कोणास जाणावे?
नभी स्वच्छंद उडताना, किती उन्मुक्त ते रावे!
तयांना काळजी नसते, उद्याला काय जेवावे?
जगाया एकटे उरणे किती अवघड मला ठावे
कधी मी गोष्ट सांगावी, कधी हुंकार पण द्यावे
गराडा भोवती देवा, किती तो याचकांचा रे!
बिचार्या भक्त लोकांनी, दुरूनी हात जोडावे
लिहाया केवढा महिमा, कैक कविता तिच्यावरती!
प्रश्न पडतोच भावांना, कुणी आईस पोसावे
जगामध्ये किती या मुखवट्यांच्या मयसभा दिसती
इथे दिसते तसे नसते, भ्रमांचे सर्व देखावे
किती असतात कामे पक्षश्रेष्ठींना महत्वाची!
कधी कोणास हटवावे, कधी कोणास बसवावे
विवशता सर्व घरच्यांची, म्हणोनी जन्मली होती
जुळ्या गर्भात मुलगाही! कसे कन्येस मारावे?
व्यथा "निशिकांत "का छळते, बदलते रंग बघताना?
कधी नेते जनुवधारी, कधी अल्लास प्रर्थावे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--लगागागा X ४
No comments:
Post a Comment