स्पर्शणारे चित्र होते काढले कोणी तरी
चित्रकाराच्या मनी रेंगाळले कोणी तरी
भीक का देशी कृपेची, घे परिक्षा ईश्वरा
स्वाभिमानी, तूच म्हणशिल, भेटले कोणी तरी
आठवांच्या जळमटांशी, सामना केल्या क्षणी
अंतरी माझ्या हळू डोकावले कोणी तरी
घेतल्यावर भैरवी गाण्यास, फर्माइश कशी?
मैफिलीमध्ये अनाडी पोंचले कोणी तरी
पोट भरण्याला निघाले केवढे शहराकडे!
अर्थकारण पार फसले, बोलले कोणी तरी
सत्यवादी शांत, अन्यायास सारे भोगती
पण लढाया, पाहिजे ना पेटले कोणी तरी!
वेस होती गाव होता, मारुती रक्षावया
मॉल बघुनी तेथला, पाणावले कोणी तरी
रथ जगन्नाथा! तुझाही शक्तिशाली तू तरी
माणसांना ओढण्या तो, जुंपले कोणी तरी
सूर विरही पण असा " निशिकांत " तू रमलास का?
वाहता जखमा, मनी गंधाळले कोणी तरी
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त---देवप्रिया
लगावली---गालगागा X ३ + गालगा
No comments:
Post a Comment