मनाचे दार जेंव्हा मी उघडतो
मला मी वेगळासा खूप दिसतो
जसे उडतात आकाशात रावे
उडायाचे लगेचच स्वप्न बघतो
रुढी आणिक प्रथांचे स्तोम इतके!
बघूनी आडवे मांजर, परततो
कशी चमचेगिरी कामास आली!
म्हणोनी आपला जो तो समजतो
अमर ताना नि चीजा कालच्याही
जुन्या लहज्यात मी मैफिल सजवतो
किती गर्दी मनी ती आठवांची!
सखी गेली तरी संगेच असतो
उसास्याला अता धरबंध नाही
जरी दाबून धरला, तो उसळतो
कशाला वाद करता तर्कटांनो?
प्रभूला अंधश्रध्दाळूच बघतो
कुठे "निशिकांत" तू हरवून जाशी?
सखीविन मी कधी माझ्यात नसतो
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मृगाक्षी
लगावली--लगागागा लगागागा लगागा
No comments:
Post a Comment