Wednesday, May 12, 2021

जगावयाचे मार्ग आखले

 जगावयाचे मार्ग आखले


उधारीत स्वप्नांना विकले, नगदीमध्ये दु:ख घेतले
शिल्पकार माझा मी झालो, जगावयाचे मार्ग आखले

करीन म्हणतो शेती आता, गावाकडचे वेध लागले
पाणी उगमाकडे निघाले, जरी जगाला अजब वाटले

जरी घशाला कोरड पडली, पुढे जायचे स्वप्न जागले
पिऊन मृगजळ प्रवास पुढचा करेन मी हे मीच ठरवले

रेतीवरती नाव न लिहिता व्यथेस दोघांनी चितारले
घुसलेला तो बाण आणखी भळभळणारे हृदय काढले

अर्ज भराया कुठे जायचे, अंगावरती काटा येतो
" माणुस" लिहिता जात कैकदा, माझ्याकडुनी गुन्हे जाहले

बंदोबस्ताचीच समस्या अवघड दिसते सोडवायला
कित्त्येकांनी गुन्हे करोनी खाकीवरती डाग पाडले

तसा एकटा कधीच नसतो, तुझी आठवण करते संगत
जहाल वास्तव तू नसल्याचे, आठवांमुळे कमी काचले

ठाउक नाही जबाबदारी, कर्तव्याची तमा कुणाला?
टुकार नेते पारित करती, तरी कायदे कुणी वाचले?

काय उगा " निशिकांत " सांगसी आत्मवृत्त हे तुझेच आहे
मजकुरात मी पानोपानी तुझ्या सखीला जरी वाचले


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment