जन्मापासुन भटकंती अन् नुसती वणवण
जीवन जगण्याला का असते कुठले कारण?
शांत जीवनी वलय कशाला आठवणींचे?
तलावात का समिंदराचे उधाणलेपण?
घाबरशी का? तुला द्यावया पूर्ण सुरक्षा
तुझ्याकडे मी मला ठेवले आहे तारण
खर्या चेहर्याने ये सखये मिरवू आपण
नको मुलामा, नको सभ्यता, नको आवरण
अर्ध्या जागांसाठी खटपट आणिक स्पर्धा
उरल्या अर्ध्या नोकर्यास आहे आरक्षण
वठल्या झाडावरचे पक्षी उडून गेले
वाट पाहतो अता व्हावयाची तो सरपण
टाळाया नैराश्य असावे ध्येय वाजवी
मृगजळ पीण्या कशास फिरता उन्हात रणरण?
यत्न करावा पांग फेडण्याचा पोरांनी
देव न फेडू शकला अपुल्या आईचे ऋण
यशशिखरांवर गर्व नको "निशिकांत" करू तू
खरी परिक्षा पुढेच आहे येता उतरण
निशिकांत देशपांडे. पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment