Monday, July 13, 2020

रंगलो नसूनही


मैफिलीत मी कधीच रंगलो नसूनही
सांगतो न होश हरवले कधी पिऊनही

शांत शांत जीवनात तोच तोपणा किती!
वाटते कधी कधी बघूत वादळूनही

एक दु:ख अंतरी किती जिवास काचते!
आपुले दुरावलेत, आपुले म्हणूनही

वासनांध या जगात काळजी सदैव घे
चार हात ठेव दूर, बाप तो असूनही

नोंद दोनदाच नगरपालिकेत जाहली
जन्मलो, निवर्तलो! विठूसवे जुडूनही

स्वर्ग लाभला तरी मुले मजेत पाहुनी
दोन आसवे खुशीत गाळतो वरूनही

चालतो अगम्य वाट कैक साल जाहले
अर्थ जीवना तुझा कधीच ना कळूनही

निश्चये बनेन शिल्पकार मीच आपुला
प्राक्तनास, ठरवले पुरायचे उरूनही

वाढलो जसा जसा कळावयास लागले
आत सर्व श्वापदेच एवढे शिकूनही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३


No comments:

Post a Comment