Saturday, July 18, 2020

लपवून जगलो मी


मला लपवायचे नव्हते, तरी लपवून जगलो मी
मनाला बोच पापांची, जिला झाकून जगलो मी

मला माझी मते आहेत पण दडवून जगलो मी
असावी लीनता म्हणुनी कणा झुकवून जगलो मी

मना विस्तारले होते सखीच्या आठवांसाठी
कशी ही वंचना माझी! तिला गमवून जगलो मी

अरेरावी मनावरती, किती खच्चीकरण त्याचे
खरे तर चांगले होण्या, मला मारून जगलो मी

सुखी होण्यास आयुष्यी, जपावी अल्पसंतुष्टी
कवडशाला रवी आहे असे समजून जगलो मी

कधी सौदा न केला जीवनाचा ना कधी विकलो
सदा तत्वास माझ्या घट्ट कवटाळून जगलो मी

खरे तर प्रश्नचिन्हांकित तुझे अस्तित्व करताना
सहारा तूच दीनांचा, प्रभू मानून जगलो मी

उद्याची का बघावी व्यर्थ स्वप्ने "आज "जगताना "
क्षणांना आजच्या चिमटीमधे पकडून जगलो मी

तसे "निशिकांत"चे जीवन कहाणी भागदौडीची
गलित गात्रात होता कैद कंटाळून जगलो मी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment