Wednesday, June 3, 2020

बिना ओढता पाय मागे कुणाचा

चला खेळ खेळू पुढे जावयाचा
बिना ओढता पाय मागे कुणाचा

उभारी  मनाला अशी द्यावयाची
असो ध्यास सर्वांस जिंकावयाचा

तिला पंख आहेत, माहीत नव्हते
कळाले, जसा ध्यास धरला नभाचा

म्हणे दोन केल्यास वार्‍या हरीच्या
फिरे हात पाठीवरी विठ्ठलाचा

किती काळजी काळजाची करावी?
तिथे त्रास आहे जुन्या आठवाचा

सखी माप ओलांडुनी आत येता
कवडसा घरी एक आला सुखाचा

पुरे ताक फुंकून आयुष्य जगणे
करावा कधी सामना वादळाचा

वळूनी कशाला बघू सांजवेळी?
पुढे मार्ग माझा असे एकट्याचा

तुला काय "निशिकांत " पर्वा कुणाची?
कलंदर प्रवासी तुझ्या तू जगाचा


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment